आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंथलगिरीकर महाराजांचं आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बदलापुरात आधी सुरू असलेल्या गोंधळात आता कुंथलगिरीकर महाराजांची एंट्री झालीय. महाराजांच्या एंट्रीमुळे बाकी काही होवो अथवा न होवो, गावातल्या दत्तमंदिराचं रूपडं मात्र छान बदललंय एवढं नक्की. कसं ते वाचा या लेखात...'
कुंथलगिरीकर महाराज हे महाराज कशे काय बनले याची येक गोष्ट हये. आता प्रत्येक माण्साची काई ना काई गोष्ट र्‍हातेच. पण महाराज लोकायच्या गोष्टी चमत्काराच्या आसत्यात आसं लोकायले वाटते, म्हणून तर ते महाराजांची चरित्रं, आरत्या आस्लं कायकाय कुणी रचलंय का बघत्यात. यखांद्यानं लगीन क्येलं तर का क्येलं आसं कोणी विचारत नस्तंय. पण नाही क्येलं की मतदारांच्या रांगेसारखी रांग. तिथं मत गुप्त, हितं येकदम ओपन.
‘काऊन बाई क्येलं नसंल?’
‘की झालंच नसलं?’
‘छप्पनय का ग?’
‘मले कसं म्हाइत आसंल, माजा काई नवरा हये का त्यो?’
‘मले वाटलं आसंल बाई म्हाइती... महाराजांच्या नवसानं तर ल्येकरू झालं तुला.’
‘आस्सं का? मंग तुझ्या पदराची गाठ खोलून बगू का, किती खडे बांदून ठिवल्येत?’
‘आगं, तिले लक्षात र्‍हात न्हाई ना, तर गाठी मारते ती.’
‘बराबर हये. शंबर कौरवांची नावं तर त्येंच्या आईच्यायपण लक्षात र्‍हात नस्तीला...’
आसं महाभारत सुरू व्हऊन जातंय. भांडणात कोण कुणाच्या साइडला व्हती, संपताना कुणाच्या साइडला ग्येली कळतच न्हाई. महाराज बदलापुरात अवतरले, तेव्हा खरंतर तंतरलेले हुते. त्यात येक पेदाड बायकोला भर बसस्टँडावर ती बसमधून उतरल्या उतरल्या शिव्या घालायला लागला. रोजचंच नाटक हये म्हणून बदलापूरकर आपापल्या कामात गुंगलेले. मग महाराजांनी भुईभारम्याडमला मदत क्येली आणि भुईभारसायबांना त्यांच्या घरापस्तोर न्येऊन सोल्डं. बार्इंना उपदेश क्येला, का ‘कोपर्‍यातली काठी उचलायची आणि दोन रट्टे हाणायचे.’
बाई गांगरल्या. ‘आसं कसं, आसं कसं,’ म्हणू लागल्या. ‘त्याची ताकद क्येवडी, माझी क्येवडी,’ आशी कंप्यारिझन क्येली त्यायनी.
महाराज म्हणले, ‘मी आहे इथं उभा. बिनधास्त मार. काई नाई होत.’
ड्राम्यातले रोल चेंज झाले. हिरवीन हिरोला बडवून र्‍हायलीय म्हणल्यावर पब्लिक जम्लंच. महाराज शांत चित्तानं हुबे होते. भुईभारसायबांचा खंबा उतरला. आणि पारा चढला. महाराजांनी सांगितलं, ‘तुला बाधा झालीय वत्सा, ती तुझी पुण्यवती धर्मपत्नीच दूर करू शकत होती. तिचे आभार मान.’ भुईभारसायेब कन्फ्युजला. महाराजांनी तिथलंच नारळ उचलून पब्लिकला प्रसाद म्हणून उत्फुल्ल चेहर्‍यानं गुळखोबरं वाटलं.
मग भुईभारसायबाला प्रायव्हेटमदी विचारलं, की ‘का बाबा मारतो बायकोला?’ भुईभारसायेब म्हण्ला, की ‘नोकरीले जाती. काय लफडी करती कोणाले ठावं? इत्क्या लोकांशी हासूनख्येळून बोलती. पुरुषांच्या नजरेला नजर देऊन बोलती. आजूक काय काय करत आसंल कोण जाणं? हाटेलात जात आसंल, सिनेमाले जात आसंल. गळ्यात गळे घालून बसत आसंल. मुकेगिके घ्येत आसंल... आरारारारारा...’
‘तू पाहिलंस का स्वनेत्रांनी?’
‘आं... न्हाई. मी न्हाई पाह्यलं...’
‘मग तुला हे सांगितलं कुणी? म्हणजे ज्यांनी सांगितलं त्यांनी पाहिलं असेलच ना?’
‘न्हाई. रुक्मिणीबाई कुठं कधी बदलापूर सोडून गेलीये? पण मले रुक्मिणीबाईनं सांगितलं. पण तुम्हांले म्हाइती नाई हितं कोणी... नव्ये दिस्ता ना... रुक्मिणीबाई कशी म्हाईती आसंल?’
‘बाई जाडजूड आहे? मोठं कुंकू लावते? केसांना तेल चोपडते? घट्ट ब्लाऊज घालते?’
‘व्हय महाराज... तुम्हांला कसं कळलं?’ भुईभारसायेबाला आजून येक खंबा हाणावा वाटू लागलं.
‘मला सगळं कळतं. अंतर्ज्ञान आहे. ती बाई तुझ्याशी खोटं बोलतेय. तिचं काय करायचं ते माझ्यावर सोड. जी बाई दोन मिनिटं बोलते, तिच्यावर विश्वास. जिला पटवून लग्न करून आणली तिच्यावर अविश्वास?’
‘ह्ये पटवून लग्न केल्याचंपण तुम्हाले कळलं महाराज? माफी करा. पुन्यांदा आशी चूक व्हणार न्हाई.’ भुईभारसायबानं साष्टांग घातला. तो ड्रिंकर ट्येलरनं पाह्यला, म्हण्जे अख्ख्या बदलापुरानंच पाह्यला. रातोरात महाराजांची कीर्ती बदलापुरात पसरली. महाराज मुक्कामाला दत्तमंदिरात थांबले. तेव्हाचं दत्तमंदिर आणि आताचं दत्तमंदिर वळखू येत नाई इत्कं बदलून ग्येलंय. पार दत्ताच्या मूर्तीसगट सगळं बदललं. कुंथलगिरीकर महाराजांची कृपा. महाराजांचं आजोळ बदलापुरात होतं. आणि त्ये बारके आसताना लई बार बदलापुरात यिऊन र्‍हात, ह्ये फक्त महाराजांनाच म्हाइती हुतं. बाकी कोणालेच तवाचा दत्त्या आणि आत्ताचे दत्तारामबुवा कुंथलगिरीकर येकच हाइती, ह्ये म्हाइती आसण्याचं कारणच नव्हतं. तर अशा रीतीनं महाराजांना बदलापुरात भुईभार दांपत्य ह्ये पह्यले दोन जाहीर भक्त मिळाले आणि खासगीत भक्त नंबर तीन रुक्मिणीबाईदेखील!
(kavita.mahajan2008@gmail.com)