आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निंदकाचे घर असावे शेजारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापुरात स्वच्छ कारभाराची सुरुवात सखुबाईने भाषाशुद्धीपासून केलीय. पण भाषाशुद्धीचा हा विषय संत निंदा प्रतिबंधक कायद्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. कसं ते या लेखात वाचा...

सखुबाई निवांत पेपर वाचत बसली होती. आता निवडून आल्यापासून पेपरबिपर वाचायला तिला फुरसत मिळत नसायची. दिवस बदलले आहेत हे खरं, पण ते अच्छे दिन हयेत की बुरे दिन हयेत, हे सिद्ध करायलापण तिला वेळ नव्हता. कामंच इतकी होती. त्यातला पहिला प्रकल्प होता भाषाशुद्धीचा. ‘नद्याबिद्या शुद्ध करायच्या आहेत, बदलापूर स्वच्छ कारभाराचं करायचं आहे, तर हे मांडण्यासाठी आधी भाषा शुद्ध पाहिजे,’ असं तिला ज्योतिषवाल्या जोशीबुवांनी सांगितलं होतं. त्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे, असा उपायही त्यांनी सांगितला होता. पण बदलापुरात तर पुस्तकांचं एकही दुकान नव्हतं. निदान रोजच्या वृत्तपत्रवाचनाने सुरुवात करू असं सखुबाईनं ठरवलं. आता वृत्तपत्रांमधल्या भाषेनं भाषा सुधारते की बिघडते, याबाबत जोशीबुवांनी काहीही भाष्य केलं नाही. पण सखुबाईच्या शब्दयादीत त्यामुळे अनेकविध शब्दांची भर पडू लागली. बदलापुरात राहायचं म्हणून मराठी, दिल्लीत काम करायचं म्हणून हिंदी आणि इंग्लिश तर समजलंच पाहिजे म्हणून इंग्लिश अशा तीन भाषांमधली वृत्तपत्रं वाचण्यात तिची सकाळ जाऊ लागली. सासू नं. तीन गृहखातं सांभाळू लागली होती. सखुबाई वृत्तपत्रांचं वाचन करत असतानाच तिच्या वाड्यावर कुंथलगिरीकर महाराजांचं आगमन झालं.
सखुबाई म्हणाली, ‘या महाराज. बरं झालं आलात ते. हे पहा या पेपरात काय बातमी आलीय ते.’
‘देशात संतनिंदा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात नाही. हा कायदा लागू करण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असेही मोरेंनी सांगितले. महाराज, जयसिंग मोरे कोण?’
‘ते संत तुकारामांचे वंशज. निंदकाचे घर असावे शेजारी, असं संतांनी म्हणून ठिवलंय सखुबाई आणि ह्ये संतांचे वंशज तर निंदाच नको म्हणून ºहायलेत. असं काय बरं घडलं आसंल? कामुन त्ये आसं म्हणून राह्यलेत?’
‘काय झालंय महाराज, येका लेखकानं संत तुकारामांवर पुस्तक लिहिलं. त्यात म्हणं कायतरी वंगाळ लिहिलं. आता काय वंगाळ हये, त्ये काई म्हाईती नई,’ सखुबाई पुन्हा आपल्या मूळ भाषेवर घरंगळली होती. स्वत:ला सावरत तिनं बोलणं कंटिन्यू क्येलं. ‘तर त्या पुस्तकावर बंदी आणावी म्हणून या जयसिंगरावांनी कोर्टात केस केली. खालच्या कोर्टात ते केस जिंकले. आरोपी वरच्या कोर्टात जाणार म्हणाले. तर या जयसिंगरावांना वाटतंय की, संतांची निंदा करू नये, त्यांच्याविषयी फक्त चांगलं काय तेच लिहावं. म्हणजे काल्पनिक लिहायचं तरी फक्त चांगलंच लिहावं, काल्पनिक वाईट लिहू नये. महापुरुषांकडे देव म्हणूनच पाहावं, माणूस म्हणून पाहू नये. त्यांचा अभ्यास करू नये, चिकित्सा करू नये.’
कुंथलगिरीकर महाराज म्हणाले, ‘लोकांना शॉर्टकट आवडत्येत सखुबाई. आता तुकाराम गाथा कोण वाचतंय आणि ज्ञानेश्वरी तरी कोण वाचतंय? काई काई लोकं तर ह्ये ग्रंथ देवघरात ठिवतात. हळदकुंकू, बेलफुलं वाहत्यात. या येड्यांना काय म्हणावं?’
सखुबाईचा दरबार आता हळूहळू भरू लागला होता. ड्रिंकर टेलर म्हणला, ‘कुनी निंदा कुनी वंदा, कापडं शिवनं हाच आमचा धंदा.’
‘गप ये तुजे सम्दे धंदे म्हाईती हयेत आमाला. दुकानात कमी आन अप्सरा बारमंधी जास्ती ºहातोस तू,’ संकर वायरमन म्हणाला.
‘निंदा करू नका रे एकमेकांची. सवय मोडा आता. उद्या खटल्यात अडकाल. सवय मोडा आता,’ कुंथलगिरीकर महाराज म्हणाले.
प्रभंजनकुमार रणनवरेनं विचारलं, ‘महाराज, संतांनी ईश्वराची निंदा केलीये, विठ्ठलाला शिव्याबिव्या घातल्याहेत, मग या संतांचं काय करायचं? संतांनी बडव्यांची खिल्ली उडवलीये, त्या बडव्यांचं काय करायचं? संतांनी ज्या रोखठोक भूमिका मांडल्यात आणि जी शिकवण दिलीये, ती न वाचता किंवा सोयीपुरतीच वाचून निंदा करू नये असं म्हणणाºयांचं आपण काय करायचं?’
महाराज उत्तरले, ‘संतनिंदा प्रतिबंधक कायदा करण्याआधी ईश्वरनिंदा प्रतिबंधक कायदा करा आणि यापुढे संतसाहित्य प्रकाशित करण्यावर बंदी आणा; जे बाजारात उपलब्ध आहे, त्याचा लगदा करा. नद्यांमध्ये काही बुडवता येईल अशा नद्याच राहिल्या नाहीत, त्यामुळे अजून काही पर्याय शोधा.’
प्रभंजनकुमार म्हणाला, ‘मग हे दोन कायदे झाले की अजून बरेच करता येतील : धर्मगुरू निंदा प्रतिबंधक, पुजारी निंदा प्रतिबंधक, भगत निंदा प्रतिबंधक, मौलवी निंदा प्रतिबंधक, गुरू, महाराज, बुवा, माता निंदा प्रतिबंधक, राजकीय नेते निंदा प्रतिबंधक, शासकीय कर्मचारी निंदा प्रतिबंधक, सामाजिक कार्यकर्ते निंदा प्रतिबंधक, मीडियावाले निंदा प्रतिबंधक, उद्योजक निंदा प्रतिबंधक, व्यापारी निंदा प्रतिबंधक, शिक्षक निंदा प्रतिबंधक, डॉक्टर निंदा प्रतिबंधक, इंजिनिअर निंदा प्रतिबंधक, वकील, न्यायाधीश निंदा प्रतिबंधक, विद्यार्थी निंदा प्रतिबंधक, लेखक, चित्रकार, अभिनेते, नर्तक निंदा प्रतिबंधक कायदादेखील होऊनच जाऊ द्या.’
अस्मिता टीचर हसून म्हणाली, ‘मग सासू निंदा, सून निंदा, सासरा-दीर निंदा, जाऊ-नणंद निंदा, जावई निंदा, बहीण-भाऊ निंदा, आई निंदा, बाप निंदा, असे तमामांची निंदा प्रतिबंधक कायदे हवेतच.’
संभा म्हणाला, ‘मुक्या प्राण्यांनी तरी मग कुणाचं घोडं मारलंय? झुरळपाली, गाढवं-गेंडे-डुकरं, कुत्र्यामांजरांची तर नकोच नको. बैल, गायी, म्हशी, बकºया, कोंबड्या... कुणाचीही निंदा नको.’
‘ह्ये काय चाललंय, त्ये काई मला कळतंच नाई. थोडी चार बुकं जास्ती शिक्लो आस्तो, तर बरं झालं आस्तं. पण मी मूर्ख, येडा, आडाणीच र्‍हायलो,’ ही चर्चा ऐकत गणा गवंडी करवदून म्हणाला.
सखुबाई हसून म्हणाली, ‘गणा, स्व-निंदा प्रतिबंधक कायदासुद्धा केला पाहिजे हं आता तुझ्यासारख्या लोकांसाठी. लिहावाचायला शिकला नाहीस, म्हणून अडाणी थोडीच आहेस? ड्रिंकर टेलरचा अक्षय बघ आता कसा स्वत:ला ड्रेस डिझायनर म्हणून घेतो, तसं आता तूही स्वत:ला गवंडी म्हणण्याऐवजी काँट्रॅक्टर म्हणायला लाग. भाषेपासून बदलाची सुरुवात करावी बघ माणसानं.’
प्रभंजनकुमार बैठकीतून उठून घाईघाईनं निघाला. विचारलं तर म्हणाला, ‘मला आज रात्रीच्या साडेनऊच्या चर्चेसाठी पोल कशावर घ्यावा हे सुचलंय. निंदा या शब्दावरच बंदी आणावी की आणू नये? यावर प्रेक्षकांचा कौल काय मिळतो ते बघूयात आज!’ (क्रमश:)

kavita.mahajan2008@gmail.com