आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येक रेडियो द्या मज आणून!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानच्या रेडिओवाल्या पोस्टरवरून सुरू झालेल्या वादाबद्दल फक्त शहरातच चर्चा रंगल्या असं नाही.
बदलापुरातल्या मंडळींनाही त्याचा अर्थ लावावासा वाटला. श्रीदेवी, आक्षय आणि जोशीबुवा यांचं या विषयावरचं संभाषण भलतंच रंगलं होतं...


‘ते मोदी म्हण्ले ते खरंये बाबा… आदी शौचालय झाले पायजेत परत्येक गावात! आक्षय टेलरकडे बसल्या बसल्या श्रीदेवी हिजड्यानं मत टाकलं. आता ड्रिंकर टेलर तर बिछान्याला खिळला हुता. फातिमा सशि्टरनं त्येची दातखिळी उकलायला निस्तं गालाला बोट लावलं आणि जबडा सरकला. निस्ता जबडा सरकण्यावर निभलं नाही, नंतर पाह्यलं डॉक्टरांनी तर अख्खी आर्धी बॉडीच येका साइडनं सरकली व्हती. थोडक्यात लकवा मारल्यानं ड्रिंकर टेलर आता बिछान्याला खिळला हुता. तर श्रीदेवी हिजड्याचा आणि त्येचा जुना दोस्ताना, त्यामुळं श्रीदेवी आदनंमदनं फुरसत झाली का ड्रिंकरला भेटायला यायचा. अर्दा घंटा त्येच्याजवळ बसून फाइव ष्टार बारमदल्या बातम्या देयाचा. मंग घरासमोरच्या खोलीत थाटलेल्या दुकानात आक्षयजवळ बसून चाय पियाचा.
तर आता त्यानं हा शौचालयाचा विषय काडला. तसं तर बदलापुरात आता बरेच बदल झाले हुते. तरी काई काई लोकायच्या जुन्या आदती जात न्हवत्या. त्यांना मोकळ्यावरच पोट मोकळं करता यियाचं. यात काई बायायबी व्हत्या. सखुबाई समजाऊ-समजाऊ थकली व्हती का, “आसं उघड्यावर बसायला तुम्हाले लाजा नाई का वाटत?”
तर आनसा म्हण्ली का, “लाजा कशाला वाटतील? कोण वळखतंय?”
“का? आख्खं गाव वळखतंय की तुला! वळखत कसं नाई?”
“ते चेहऱ्यानं वळखते. आमी तर रस्त्याकडं पाठ करून बसतोत रुळांवर, त्येबी तोंडावर पदर घिऊन बसायचं. येकदा का माण्साचं तोंड झाकलेलं आस्लं ना सखुबाई, की बाकी कायपण उघडं ऱ्हाऊ द्ये”
सखुबाईनं या युक्तविादापुढे हात टेकले होते.
पण ह्ये अपवाद. श्रीदेवीला मोदीचा पुळका कामून आला आणि येकायेकी शौचालयं कशाला हवी झाली, ह्ये काई आक्षयला कळंना.
श्रीदेवी म्हण्ला, “कोणाचेयबी दविस फिरत्येत बग. इत्का बुरा वक्त कोणावरबी यिऊ नाई.”
आक्षयचं डोकं आता पार भंजाळलं हुतं. तो म्हण्ला, “ए… आता डायलॉक लै झाले. काय झालं, कुणावर बुरा वक्त आला ते सांग आदी. स्टोरीचा नाई पत्ता आणि निस्ती भाषणं करून ऱ्हाईला तू.”
“आता हा इत्का मोठा हीरो. आपला आमिर खान. मला वाटलं होतं का त्येचा चांग्ला बंगलाबिंगला आसंल. दोन – दोन लग्नं क्येली म्हण्जे दोन-दोन बंगले आस्तील. आता त्या रितिक रोशननं नाई का बायलीला निस्ती सोडचिठ्ठी देल्ही तर साडेतीनशे करोड पोटगी देल्ही. तसं या आमिर खानाचं बी लुक्सान झालं आसणारच. काय तरी तोडपाणी करायला पुन्यांदा पयलीवालीकडं ग्येला आसंल आणि दुसरीवालीनं रंगेहाथ पकल्डं आसंल. म्हणून तर आता ती पण त्येला घरात घित नाई. पयलीला यानं दूर लोटलं, दुसरीनं याला दूर लोटलं. दोन बायकांचा दादला झाला की बाप्या आसा धोब्याचा कुत्ता बनतो. ना घरचा ना घाटचा”
“अबे काय सांगून ऱ्हायला तू? ही ष्टोरी कोणी सांगली तुला? आजूक संध्याकाळ व्हयाची हये. तूच टाकायला लागल्यावर गिऱ्हाइकांना दारू वाडनार कोण?” आक्षय काळजीत पल्डा.
“मी टाकली नाई रे बाबा, खरं सांगून ऱ्हायलो मी. बग जोशीबुवा पण आले, इचार त्येंना.” श्रीदेवीनं एकुलत्या खुर्चीतून उठून जोशीबुवा जोतिषवालेंना जागा करून देल्ही.
जोशीबुवा बायकोचे शिवायला टाकलेले ब्लाउज घिऊन जायला आले हुते. आशी बायको आपल्याले मिळंल, ह्ये भविष्य फकस्त आपल्याले कस्काय आदी कळलं नाई, याचं त्येंना आयुष्यभराचं दु:ख हुतं. जगातली कोण्तीबी बायको नवऱ्याले सांगत नसंल, ती सगळी कामं ही महामाया मला सांगते! – असं त्यांनी गावातल्या प्रत्येक नवऱ्याले सांगून पोतंभर सहानुभूती क्याच केली हुती.
“प्रभंजनकुमारनं सांगितलं काय आतल्या गोट्यातलं?” आक्षयनं श्रीदेवीला इचारलं.
“अरे आतल्या गोट्यातलं काय म्हण्तोस रे… आतल्या गोटातलं म्हण! गोट आणि गोट्यांतला फरकही कळेनासा झाला का रे मुलांनो तुमच्या पिढीला?” जोशीबुवा करवादले.
“थांबा हो. आयका आदी. हा सांगून ऱ्हायलाय का आमिर खानच्या दुसऱ्या बायकूनंबी त्येला घरातनं भाईर काल्डा आणि त्यो आता पार रस्त्यावर आलाय म्हून.” आक्षय डाफरला.
“आँ… हे तर मला माहीतच नव्हतं. कोणत्या वृत्तपत्रात आलंय?” जोशीबुवांनी विचारलं.
“पेपरात? समद्या पेपरात फोटु हाईती. तो सकाळला पोट मोकळं करायला निस्ता टावेल गुंडाळून पटरीवर गेल्ता. मोठ्या माणसायचे शौक काई वक्त बदलला तरी कमी व्हत नाईत. सकाळच्या रेडिओ मिरची आयकल्याबगर त्येचं पोट मोकळं व्हत नसणार. तर सोबत चोरबाजारातला मोठ्ठा रेडिओबी घिऊन गेल्ता. कोनी वळखू नये म्हणून त्येनं कमरेचं सोडून तोंडाला बांदलं आस्णार. बदलापुरातल्या बाया तसंच करत्यात. तेवड्यात ह्ये झूमझाम वारा आला आन वाऱ्यानं तोंडावरचा त्यो टावेल उडून ग्येला. हा टावेल पकडायला पटरीवर पळू लाग्ला. तेवड्यात समोरून च्यानलवाले, पेपरवाले आले क्यामेरे घिऊन. त्याचा संतापलेला चेहरा बग… समोर मीडियावाले आस्ले नको थितं का हीरो-हिरवीनींचे चेहरे आशेच हुतेत. मंग यानं लाज जायला नुको म्हणून रेडिओ समोर धरला. कशाचा काउ उप्योग व्हईल केवा सांग्ता येत नाई. आता मीयबी येक रेडिओ घिऊन यिणार हये.” श्रीदेवीनं दणक्यात खुलासा क्येला.

kavita.mahajan2008@gmail.com