आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडवं जाणारं मांजरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलापुरातले लोक संत्या कुळकर्ण्याला "मांजरू' म्हणत्यात. त्याला "बोका' म्हणावं इत्का काई त्यो "दर्द न होनेवाला मर्द' दिसत नाई, ह्ये येक कारण. आणि दुसरं म्हण्जे बोका आडवा गेल्यानं येकांदं काम आडतं की आडत नाई, याचं क्नॉलेज अख्ख्या बदलापुरात कोनालेच नाई. म्हणून संत्या कुळकर्णी मांजरू या नावानंच वळखला जातो.
मांजर आडवं गेल्यावर पूर्ण प्रतिगामी माण्सं मार्ग बदलत्येत. आर्धवट प्रतिगामी माण्सं कपाळावर आठ्या पाडून सात पावलं मागं-मागं चालत जात्येत घाईघाईनं आणि दुप्पट घाइघाईनं पुन्हा समोर चालून येळ कव्हर करत्येत. पुरोगामी माण्सं मांजराकडं लक्ष न द्येता पुढं निघून जात्येत आणि आर्धवट पुरोगामी माण्सं तर लोक आपल्याकडं बघून -हायल्येत का ह्ये बघून पुढं जायाचं का मागं जाऊन पुन्यांदा पुढं येयाचं याचा डिशिजन घ्येत्येत.
आता मांजराबाबत काय काय करायचं आसतंय ह्ये फिक्स हये. मांजर मारली तर काशीला जाऊन आसली मांजराच्या वजनाची सोन्याची मांजर देवाले वाहून यावी लागत्ये, आसं भविष्यवाल्या जोशीबुवांनी सांगल्यापास्नं बदलापुरात कदी कोणी मांजराले दगड माराया धजत नाई. न जाणो चुकूनमाकून बसला त्येच्या बराबर टकु-यात आणि तिथल्या तिथं जीव सोडला मांजरानं तर काय करा?
पण संत्या कुळकर्ण्याला तर मांजरंबी घाबरत्यात. काळं मांजर आसो, पांढरं असो का चट्टेपट्टेवालं आसो... किंवा हिरव्या डोळ्यांचं आसो, घा-या डोळ्यांचं आसो का पिवळ्या डोळ्यांचं, संत्या कुलकर्ण्याचा वास जरी लागला तरी मांजरांचे केस ताठ उभे राहून त्यांचा आकार दीडपट मोठा दिसू लागतो आणि त्यांच्या कातडीचा आणि डोळ्यांचा रंग झपाझपा बदलू लागतो. रस्त्यातनं जाताना आसं एखादं आरबाळल्यागत रंग बदलणारं मांजर दिसलं की दिसलं की, लोक जीव मुठीत घिऊन तिथनं सुसाट पळ काढत्यात... मांजर आडवं गेलं नाईतर आडवं जाईल म्हणून न्हाई काई, तर मांजराचं आसं म्हणता आसं झालंय म्हणल्यावर संत्या कुळकर्णी हितंच आसपास कुटंतरी आसणार याचा आदमास लागल्यामुळं चटाचटा गायब व्हत्यात. कारण जर का संत्या कु़ळकर्णी आडवा ग्येला, तर ते बदलापुरातल्या प्रतिगामी माण्सांनाही परवडत नाई आणि पुरोगामी माण्सांना तर नाईच नाई. आसं कामुन?
तर त्येची येक विशेष गोष्ट हये...
संत्याला भलत्या येळी भलते सवाल विचारण्याची आदत हये. आजची गोष्ट नाई ही, शाळंपासूनचीच हये! यत्ता दुसरीत आसताना संत्याच्या ध्यानात आलं की आपल्या वर्गातल्या समद्या पोरापोरीयले दोन-चार भाऊबह्यणी हयेत, येकुलते येक आपण येकलेच हावो. आदी त्यानं त्यावर गमजा क्येला. मग त्येला धाकले भाऊबह्यणी आसायचे फायदे दिसू लागले. घरात आपल्याहून ल्हान कोणीच न्हाई, तर समदे आपल्यालेच हुकूम सोडत्येत, रागबिग आला तर आपल्यालेच बुकलून काढत्येत, त्येंचं आपल्यावर लई बारीक लक्ष -हातंय येकला म्हणून; आजूक येखांदं भावंड आसतं, तर मामला थोडा डिव्हाईडला आसता ना. त्यानं संध्याकाळच्या आईबापाला येकत्र बसवलं आणि प्रश्न टाकला, "पोरं हुण्यासाठी काय करावं लागते?'
बाप गांगरला, आईनं तोंडाले पदर लावला. मग धीर धरून बापानं इचारलं, "कामून इचारून ऱ्हायला बे?'
संत्या म्हण्ला, "दोन-चार तरी बारके भाऊबह्यनी पायजेत ना आपल्याले या घरात. म्हणून इचारून -हायलो.'
"बगू... इचार करू...' बाप गुळमुळला. आई तडक उठून सयपाकघरात ग्येली.
संत्या म्हणला, "आसं आसं, बगून... मंग इचार केल्यावर पोरं हुत्येत व्हय! बारं... आसा काई आल्तनेटीव आस्तो काय... म्हण्जे तुम्हाले येळ नसंल आणि मी इचार केला, तर हुतील का मले भाऊबह्यणी?'
आईनं चुलीतलं जळतं लाकूड उचलून संत्याच्या पायावर फेकलं, तवापासून संत्या लंगडा मांजरू झाला खरा, पण त्येच्या मनातल्या शंकांना मात्र वाढायला मोकळं रान मिळालं. संत्या दिसला की पळ काढणं फक्त त्येच्या आईबापांनाच शक्य न्हवतं, त्यामुळे त्ये नजर चुकवायचे; बाकी आख्खं बदलापूर पळ काढायचं.
आस्मिता टिचरले त्यानं इचारलं हुतं का, 'तुमचं तोंड आसं लसणीच्या पाकळीवानी कामून हये?'
जोशीबुवांना इचारलं हुतं का, "तुमी जोतिषी हुणार ह्ये भविष्य तुमाले कोणी सांगलं हुतं?'
गण्या कम्युनिष्टाला इचारलं का, "तुम्ही मार्क्सवादी आसल्यानं तुमचे पोरं इतक्यांदा नापास हुत्यात का?'
सगळ्यात राडा परवाले आसा झाला का, शिंगणे डॉक्टरबी साथीची लागण झाल्यावानी भाजपात ग्येला आणि दवाखान्याचा पांढरा रंग उगंच्यामागं बदलून त्येनं भगवा क्येला.
संत्या म्हणला, "भाजपवाल्यायनी त्ये भगवं कमळ पांढरं करून जमाना झाला आणि तुमी आसं आसलेला स्वस्तातला चुना खरवडून भगव्याचा खर्च कामून करून ऱ्हायले? आणि आता येवढा काडलेला चुना तुमी पेशंटांना लावणार आणि लावलेल्या रंगाचा खर्च आरामात वसूल करणार... ह्ये काई बरं न्हाई.'
शिंगणे डॉक्टर त्रासून म्हणाले, "संत्या, लेका आता मी दवाखान्यात नवा विभाग सुरू कर्तोय. माझा मेव्हणा आता मानसोपचारतज्ज्ञ झालाय. तो इथंच काम सुरू करणार. आता बदलापुरातल्या तुझ्यासारख्या लोकांना बदलापुरातच उपचार घेता येतील.'
झालं. शिंगणे डॉक्टरांना मांजराच्या पाठीत सोटा मारून मोठीच चूक केली. याची भरपाई त्येंना करावी लागणारच हुती लगोलग. संत्या गंभीरपणे गुरगुरला आणि नसलेल्या मिशा फेंदारून दवाखान्याच्या नव्या रंगवून आणलेल्या पाटीकडे बघत शिंगणे डॉक्टरांना म्हणला, "त्ये बाकी ठीक हये. पण पाटी आशी चुकीची कामून लिहिलीत?'
डॉक्टरांपासून पेंटरापर्यंत समदेच पाटीकडं काय लिव्हण्यात चुकलंय म्हून पाहू लागले. संत्या म्हणला, "त्ये मनोरुग्णालय दुरुस्त करून टाका आणि नमोरुग्णालय लिव्हा तिकडं! भगव्यावर पांढ-या रंगात लिव्हा म्हण्जे झालं.' (क्रमश:)