आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव प्राणी आणि बायको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सक्काळधरनं प्रभंजनकुमार हयराण झाला होत्ता. कोण आसली अवलाद पैदा झालं होतं तं आसं सतावून -हायलं होतं. कोणाचं आपून काय बिगाडलं, कोणाची ब्रेकिंग न्यूज लावली बात्मी फोडून, कोणाले घोळात घितला आणि कोणाले आस्मानात सोल्डा बोंबा मारायाला... काईच स्मरना. काय झालं असावं बाप्पा? लई आठवू आठवू पाह्यलं. आता कालच्या न्यूज आज आठवत नसत्यात माण्साले, तशात प्रभंजनकुमारनं आख्ख्या हप्त्याच्या न्यूज आठोवू आठोवू फायल्या.
सायलीनं येकडाव इच्चारलं हुतं, का “आठोडा न म्हण्ता हप्ता काऊन म्हणत आस्तील बॉ लोकं?”
या बायकांचंबी काई कळत नाई. ओबामा मोदीला भ्येटायला येणार म्हणल्यावर कराव्या लागत्यात तित्क्या उलाढाली करून ‘म्यिलनाचं संकेतस्थळ’ ठर्वायचं आणि थितं आल्यावर आप्ला प्रियकर महाकाम्प्युटर आसल्यागत गुगलत बसत्यात. काई दुस्रं कसं काय सुचत नाई यांना आस्ले तेडेमेढे प्रश्न इच्चारल्याशिवाय? आप्ली नजर कुन्कडं आस्ती आणि यायचं डोकं कुन्कडं! तरी कोशीस तं करावीच लागते पुरुषांले. नरजन्मा आले तं ह्ये आलंच समदं पाठीपाठी. मंग तिले सांगलं, का “सात दिवसांच्या हिशेबाला आठोडा कशाले म्हणायचं? म्ह्ययना कसा हप्त्याहप्त्यानं संपतो किनी, म्हून हप्ता म्हण्त्येत.”
तं लाग्ली लॉटरी. क्येवढा बाई माझा बाप्या हुश्शार, आसं ट्रेलर तिच्या दो नयनांमध्ये झळकू लाग्लं.
आता लगीन काय झालं, तं सायली कोण्ची आणि तिची आई सीताबाई कोण्ची वळखू येत नाई. इत्की स्येम टू स्येम गरजना! आशा कशा काय इत्क्या बदलत असतील बाप्पा या बायका? लगनाआदी कसं गुलूगुलू गुलूगुलू बोलत्यात आणि लगीन झालं की वसा-वसा! लगनाआदी यांना जो ‘द्येखणा मुखडा’ वाट्तो, त्यो लगनानंतर ‘थोबाडा’त कस्काय रूपांतरीत व्हतो? लगनाआदी ‘सुट्टी घ्ये कामावरनं, सिनेमाले जाऊ...’ आसं धा येळा पटवायची. आता येखांददिशी आंगात कणकण वाटून -हायलीय म्हणून सुट्टी टाकाव म्हणलं, का हिची कटकट सुरू व्हती, “किती बै नाजूक तुमी. इत्कुशा तापाले घाबरून ऱ्हायलेत. माझे बाबा कशे आंगात येकशे तीन डिग्री ताप आस्ला तरी कामावर जायचे!”
बायकोचे बाबा आणि बायकोचा भाऊ ही तर गेल्या जन्मीच्या पापाची फळं भोगवण्यासाठीच मानगुटीवर आणून बसवलेले जीव आसत्यात. जावाई-जावाई म्हणायचं आणि मानानं अपमान करायचा... शालीत्नं जोडे.
त्यात तिच्या बायली ह्ये सतावनं लोकायचं. फोन बंद करून ठिवायची बी सोय नाई. पत्रकारायनं कसं आलर्ट राह्यलं पाह्यजे.
प्रभंजनकुमारला तणातणा फे-या घाल्ताना आणि फोनवर आदी गुरगुरत, मग गुमान बोलताना पाहून सायलीला लैच हासण्याच्या उकळ्या फुटत होत्या.
तेवढ्यात पुन्यांदा मोबाइल टण्णाणला...
“आप्को प्येट चाहिये हय ना? आपने वो फ्लिकरपे अ‍ॅड डाला हय! कौनसा प्येट चाहिये आपको? मेरे पास एक काले रंग का बिल्लीका पिल्ला हय. उसके कान सफेद हय और आंख भुरी हय. उसकी मां ट्रक के निचे आके मर गयी हय. और बाप का तो पताइच नही होता हय ना उन लोगोंमें. उसका और इक भाई भी हय, लेकीन वो इक आंख से अंधा हय. आप दोनोंको लेंगे तो डिस्काउंट मिलेगा...”
तिच्या बापाच्या तिच्या... मधुर आवाज आस्ला म्हून काय आस्लं काय बी आयकावं का माण्सानं?
कोणी बरं ही आस्ली जाह्यरात टाक्ली आसावी आप्ला फोननंबर द्येऊन का आपल्याले पाळायले काईतरी प्राणी-पक्षी-मासा-किडामुंगी पायजेलाय म्हून?
प्रभंजनकुमारचं डोकं खाजवून खाजवून नखं झिजली, पण डोक्यात काई प्रकाश पडत नव्हता. सायलीनं आस्लं काई क्येलं आसेल खुन्नसनं ह्ये तर त्याला सात जल्मात सुचलं नसतं. “बायको म्हण्जे काई पाळीव प्राणी नस्ती!” हा तिचा डायलॉक तर तो कधीच विसरून ग्येला होता!
“यवडा शौक आसंल तर माण्सानं प्राणी पाळावेत, मासे पाळावेत, पक्षी पाळावेत. कुत्रा कसा यु यु म्हण्लं की शेपूट हलवत लाड करून घ्यायला जवळ यिऊन बस्तो, पण बायको म्हण्जे काई कुत्रा नसती. हाड म्हटलं जाणार, पेकाटात लाथ घातली की कोप-यात बसून कुंई कुंई करणार... आसल्या आपेक्षा आसतील, तर माणसानं कुत्रेच आणावेत घरात, बायको आणू नये. पढीवलं त्येवढं बोलायचं आसलं तर पोपट आणावा.”
सायलीला हसताना पाह्यलं आणि प्रभंजनकुमारला सगळे डायलॉग क्यासेट झपाझपा रिवाइंड व्हऊन आठोले. फ्लिकरवर आप्ला फोन नंबर द्येऊन जाह्यरात कोणी देली हे त्याला येकदम कळूनच चुकलं!