आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी पण मराठीच माणूस हावो !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“आम्ही हे असले दिवसबिवस पाळत नाही. ते दिवस घालण्याजोगेच असते असे आम्हांला वाटते. भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी घालणे, गुढीपाडव्याला गुढी उभारणे, दिवाळीला दिवे लावणे हेही आम्ही कधी केले नाही, तर मग व्हॅलेंटाइन डेला प्रेम व्यक्त करणे, हग डेला मिठी मारणे, टेडी डेला गुलाबी अस्वलं भेट देणे, विज्ञान दिनाला संगणकाला हळद-कुंकू-फुलं वाहून साष्टांग नमस्कार करणे, चुंबनदिनाला चुंबन देणे हे करणे दूरच. त्यामुळे मराठी दिनाला जिथेतिथे ‘मराठी-मराठी’ करणे हेही आम्ही अर्थातच करत नाही. मुळात मराठी दिनाला नेमके काय करावयाचे असते हेही लोकांना नीट माहीत नाही. काही लोक मराठी पदार्थ खातात, काही लोक मराठीत बोला असे म्हणतात, बरेचसे लोक मराठी दिनाच्या शुभेच्छा देतात आणि काही लोक ‘मराठी मरणोन्मुख झाली असून तिला ती माणूस मरताना त्याने शेवटचे नीट बोलावे म्हणून कोणती की वटी की बुटी चाटवतात ती चाटवली तरी इंग्लिशमध्ये शेवटचे बोल बोलेल,’ यावर दुर्दम्य विश्वास ठेवून बोटे मोडीत असतात. आम्ही या ‘काही’ लोकांमधले नाही आहोत हे एव्हाना आपल्या ध्यानात आले असेलच,” रावतराणे वृत्तपत्र विक्रेते प्रभंजनकुमारला सांगत होते.
‘देविदास अमृततुल्य चहा’च्या बोळीच्या दाराशी फळ्या टाकून वसवलेले त्यांचे अनधिकृत वृत्तपत्र विक्रीचे दुकान होते. म्हणजे तिथली वृत्तपत्रं अनधिकृत नसत, तथापि दुकान अनधिकृत होते. त्याला बदलापुरातील लोकल मनेका गांधी मधुलिका हातवळणे यांचा विरोध होता. कारण हॉटेलाच्या मुदपाकखान्याच्या खिडकीतून फेकले जाणारे उष्टेखरकटे खाण्यासाठी जनावरांना बोळीत जाण्याचा अधिकृत मार्ग या कारणाने बंद झाल्यामुळे ज्यांना दुकानाच्या फळ्यांखालून अंग चोरून जाता येईल अथवा दुकानातल्या वृत्तपत्रांच्या गठ्ठ्यावरून उंच उडी मारून जाता येईल, अशाच जनावरांना तेथे जाता येई आणि त्यामुळे जनावरांमधला समभाव कमी होत चालला होता.
आता या क्षणीही एक बोकड फळ्यांखालून जावे की उंच उडी मारावी या विचारांत मग्न होऊन प्रभंजनकुमारच्या बाजूला उभा होता.
रावतराणेचं लग्नाचं वय इतकं उलटून गेलंय की येळीच लग्न होऊन त्यांना पोरबाळ झालं आस्तं तर आता त्यांच्या पोरांच्यायबी लग्नाचं वय उलटून ग्येलं आस्तं. याला कार्णं लैच येगयेगळी होती. मुख्य कारण म्हण्जे आपेक्षा. रावतराणेंच्या आईच्या सुनेकडून आसलेल्या आपेक्षा अशा होत्या की सून दिसायला कशीपण आसो, कामाले वाघ पाह्यजे. रावतराणेंच्या वडलांच्या सुनेकडून आसलेल्या आपेक्षा अशा होत्या की सून दिसायला कशी का आसो, कामाला कशी का आसो, विहीण दिसायला द्येखणी पाह्यजे!
रावतराणेंच्या पाच बहिणी होत्या आणि येकीचयपण लग्न झालेलं नव्हतं, कारण त्यांच्या आपापल्या भावी नव-यांविषयी भारी आपेक्षा होत्या. त्या आपेक्षा पूर्ण होत नाईत तवरोक त्यांनी भावजय कशी आसावी याबाबतच्या आपेक्षा आखून ठिवलेल्या होत्या. त्यात रावतराणेंच्या शेजा-यापाजा-यांच्या शेजारीण कशी आसावी याच्या आपेक्षांनी भर घातली होती.
खुद्द रावतराणेंच्या आपेक्षांची म्हाईती कोणालेच नव्हती. रावतराणेंचं मत आसं होतं की, आधी माण्सानं प्रेयसीबाबतच्या आपेक्षा फिक्स कराव्यात, नंतर बायकोबाबतच्या आपेक्षांचा विच्चार करावा!
प्रभंजनकुमारला यापायी त्यानं लैच पिडलं होतं. त्याचा बदला म्हणून आज रावतराणेंचे बाइट्स घ्यावेत आसा पार चुकीचा विच्चार प्रभंजनकुमारनं क्येला आणि तो आडकला.
“म्हण्जे तुम्हांला आसं म्हणायचं हये का की, विशिष्ट दिवस साज्रा न करता चांग्ल्या गोष्टी माण्सांनी दैनंदिन सवय म्हणून आंगी बाणवाव्यात!” प्रभंजनकुमार विच्चारलं. तो सकाळधरणं लोकायचे बाइट घिऊ घिऊ कट्टाळला होत्ता. मराठी दिनाच्या निमित्ताने सामान्य माणसांचे बाइट्स घ्या आसं च्यानलवाल्यांनी सांगितलं होतं. सेलिब्रेटींना गाठूगाठू दरसाली त्येच
प्रश्न विच्चारायचा आता त्यांना स्वत:लाही
उबग आला होता.
पण बदलापुरातले सामान्य म्हण्जे असामान्यच, ह्ये त्यांला कोण सांग्णार?
“असे नव्हे. आम्ही जो दिवस मानू तो आमचा दिवस. आमची मर्जी. ज्या दिवशी जन्मलो तोच दिवस आम्ही वाढदिवस म्हणून साजरा करीत नसतो, ज्या दिवशी आम्हांला लोकांकडून भेटी व शुभेच्छा व आशीर्वाद घ्यावे वाटले तो दिवस वर्षातून कितीदाही येवो, आम्ही आमचा वाढदिवस म्हणून साजरा करतो. तसेच मराठीचे. आम्ही पण केला आहे की ज्या दिवशी आम्हांला अमराठी असून मराठीत बोलणारी, मराठीत गाणारी, मराठीत नाचणारी, मराठीत हसणारी, मराठीत बागडणारी, मराठीत चुंबन घेणारी, मराठीत मिठी मारणारी, इंग्लिश सिनेमा पाहताना त्यातील संवादांचा सिनेगृहातच मराठीत अनुवाद करून सांगणारी प्रेयसी लाभेल… तो आमच्यासाठी मराठी दिन असेल… तो दिवस आम्ही मराठी दिवस म्हणून साजरा करू,” रावतराणे म्हणाले.
क्यामेरा आणि माइक गपकन बंद करून प्रभंजनकुमार वळला आणि बोकडावर आदळला.
तितक्यात मांजरू उर्फ संत्या कुळकर्ण्याने रावतराणेंना बेसिक क्वश्चन टाकला. “आम्हांला प्रेयसी फायजे म्हणून -हायलेत तर किती जण पायज्येत येकूण तुमच्यात. यखांदा खांदा कमी आसंल तर मले पण घ्यावा की तुमच्यात! मीपण मराठीच माणूस हावो.”
kavita.mahajan2008@gmail.com