आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकट खाये, त्याले महाग सस्ता काये...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संकर्‍या वायरमनकडे त्याचा मेव्हणा ऱ्हायला आला. घरचं झालं थोडं आन व्याह्यानं धाडलं घोडं आशी हालत. आता याला काईतरी कामधंद्याला लावायचं होतं. त्याआधी त्याला कोणतं काम करता येतं, हे धुंडायला पायजेल होतं. रात्रीची जेवणंखावणं झाल्यावर संकर्‍यानं घसा खाकरून विच्चारलं, “राघो, काय विच्चार हये आता?”
“काई नाई बा. आता जेवण झालं. आता झोपून जाणार. ताई उद्यांच्याले सकाळला नाश्ता काय करणार हये, याचा विच्चार तित्का करायचा. आजून काई नाई,” राघो उत्तरला.
“थालपिठं लावू का? मिरची-कांद्याची थालपिठं राघोला ल्हानपणी फार आव्डायची,” राघोची
ताई म्हणली.
“मले कांदा आवडत नाई,” संकर्‍या खेकसला.
“तुमाले काय आवडतं सांगा. ह्ये नाई... त्ये नक्को! तुमच्यासाटी नाई, राघोसाटी विचारून ऱ्हायले मी,” राघोची ताई म्हणली.
“मी त्याले कामाचं विच्चारून ऱ्हायलोय, खायापियाचं नाई,” संकर्‍या वैतागून म्हणला.

यखांदा आडाणीच आसंल आणि त्याले काई कळतच नसंल की, काय बॉ कामधंदा करावा? किंवा यखांदा बिनडोकच आसंल आणि त्याले काई विच्चारच करता येत नसंल, तर ते कोणायलेही समजून घिता येतं. पण यखांदा कळून सवरून कामधंदा करत नसंल, त्याले बेकार राहण्यातच मज्जा यीत असंल त्येचं काय बॉ करावं?
राघो म्हणला, “भावजी, तुम्हाले कळत नाई. तुम्ही लै काम करता, लै काम करता. तुमाले वाटतं का काम मिळवायले शिक्षण असाव लागते, काम करायला शिकाव लागते, प्रमोशन घियाचं तर जास्ती शिकाव लागते. काम करणं ही येक कला हये. बॉसची चमचागिरी करणं ही येक कला हये. हाताखालच्यांना झापडणं ही येक कला हये. सोबतच्यांच्या तंगडीत तंगडी घालून पाडायचं आणि आपण फुडं निंघून जायाचं ही येक कला हये. आसं तुमाले वाटत आसंल, तर शिकून-सवरूनपण तुमाले काई कळत नाई, आसंच म्हणावं लागंल. खरी कला हये शिकूनपण आडाणी हावोत आसं दाखवणं. येत आसूनपण काम न करता तंगड्या ताणून झोपा काडणं! पण त्ये काई तुमाले जमायचंपण नाई आणि परवडायचंपण नाई. बेक्कार ऱ्हायले माण्साची कुव्वत आसावी लाग्ते. आयतं खाण्याची मज्जा तुमाले काय म्हाईती? राबू राबू बैलासारखं कडबा खाणार्‍याले त्ये कळायचंपण नाई. जावन्दे.”

आयकून आयकून संकर्‍याचा पारा चढू लाग्ला. दुसरीकडं राघोची ताई लैच कवतुकानं राघोकडं बघत हुती, त्ये पाहून तर राघोचा थर्मामीटर टिचकन फुटायची पाळी आली. पण बायको आणि बायकोचा भाऊ, यांच्याफुडं कधी कोण्या मर्दाचं काई चाल्लंय का?
चारच दिवसात मह्यनाचं धान्यधुन्य संपलं म्हणताना संकर्‍या हैराण झाला. त्याला वाटू लाग्लं का, “फुकट खाये, त्याले महाग - सस्ता काये...” म्हणतात, त्ये खरंच म्हणायचं. म्यागीची धा किलो पाकिटं आणून राघोला घालावीत आसले काईबाई विच्चारपण मनाय यिऊ लाग्ले. त्याले नको-नको त्या म्हणी आठवू लागल्या... फुकटचोद, महाविनोद, रात्रभर दिवा, उरले तेल शेंडीस लावा...!

राघो म्हण्ला, “भावजी, बेकार ऱ्हाणं म्हण्जे कष्टकरी माण्सांविषयी मनात सहानुभूती बाळगणं आस्तंय. मले तुमची सहानुभूती वाटती, दया वाटती, कीव येती. कष्टकरी माणूस कष्टानंच इत्कं गांजून जातंय की, त्येच्या मनात आसल्या शुद्द, प्रामाणिक, चांगल्या भावनांचा सूर्योदयच व्हत नाई बगा. मग तुमी कावता. लैच चिडाचिड करता. आदळआपट करता. सकाळपास्नं चांगले दोन कप फोडले तुमी. आता नवे कप आणायला पयसे लागणार. पयसे कमवायले तुमी पुन्ना कष्ट करणार. माज्याकडं बगा... मी कदी चिडलेलो, कावलेलो दिस्तो का तुम्हांले? मी कदी काई मोडलेलं, फोडलेलं आठोतं का? नाई ना? कारण मी बेक्कार हये. फोडामोडायलेबी कष्ट करावे लागत्यात, त्ये काई आपल्याले जमत नाई.”

संद्याकाळला संकर्‍या घरीच आला नाई. ड्रिंकर टेलरकडे जाऊन गपशप करीत बस्ला. तिथं येकेकजण यिऊन जात व्हते, राबता व्हता. श्रीदेवी हिजडा यिऊन ग्येला, मंग जोतिषवाले जोशीबुवा यिऊन ग्येले. मग प्रभंजनकुमार यिऊन बसला. संकर्‍या आरामात टेकलेला ऱ्हायला.
रात्र चढू लाग्ली तसं ड्रिंकर टेलरच्या बायकोनं म्हणलं की, “आज हिकडंच भाकरी खावा. सुक्कट भुजलंय.”
तर कधी नाई त्ये संकर्‍या चक्क हो म्हणला.
तिकडं राघो आणि राघोची ताई वाट बगू बगू हयराण झाले. पण संकर्‍याचा पत्ताच नाई. ड्रिंकर टेलरच्या घरनं पोटभर जेवून संकर्‍या पारावर जाऊन पत्ते कुटणार्‍या पोरांमध्ये जाऊन बसला. पोरं आदी बिचकली, पण गप ऱ्हायली. घरच्या हाळ्या आल्या, तशी पोरंही जेवाखायला पांगली. संकर्‍या शांतपणे पारावरच झोपून ग्येला. घरची लाइन कटलेली, लायटीचा उजेड नाई, पंख्याचा वारा नाई... कंदील लावून खिचडी टाकली, पण उकाड्यानं जीव हयराण. गावभर लाइट दिसायलेत आणि खुद्द संकर्‍या वायरमनच्याच घरी लाइट नाई. राघोची ताई आणि राघो संकर्‍याला शोधत निंघाले. गावभर फिरून आखरीला संकर्‍या पारावर झोपलेला दिस्ला. त्याला हालवून उठवलं, तर म्हण्ला का, “सुखानं झोपू द्या. तुमी जा घरी. मी येतो नंतर.”
“लाइट नाईती, कटलेली लाइन जोडायला होवी, उकाड्याचं कसं झोपायचं?” आसं राघोची ताई नरमाईनं त्याले रिक्वेष्ट करत म्हणली.

तर संकर्‍या म्हण्ला, “मी आजपास्नं काम सोडलंय. मले राघोचं पटतंय. मीपण बेक्कारच ऱ्हाणार आता. लाइन जोडायची तर तुमी दुसरा लाइनमन शोधा.”
राघोची ताई ढिल्लीच पल्डी, “आवो... आसं कसं? तुमी काम नाई करणार तर खायचं काय?”
“माझी सोय व्हती कुटंयबी, तुमचं तुमी बगा,” संकर्‍यानं झाईर क्येलं.
राघोची ताई म्हण्ली, “चला आता घरला. कळलं मला सगळं. राघो उद्यापास्नं जाईल कामावर!”

कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...