आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Mahajan Article In Badlapurchi Bakhar, Divya Marathi

'मी',मी'च्या टिमक्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभंजनकुमार कधी नव्हे ते मध्ये येकपण आक्षर न उच्चारता गपगुमान बसला हुता. त्याचे सायेब संपादक प्रकाशचंद्र खडकगाळकर ऐकवत होते. आता निवडणुका यिणार, तर आपल्या च्यानलचं धोरण काय हये ह्ये समजावून सांगण्यासाठीची मीटिंग हुती. मीटिंग संपल्यानंतर सेकंड राउंडातलं बिस्किटं-सँडविच-चहापान सुरू हुतं. डिशिजन घिणारे वायले असत्यात आणि त्ये डिशिजन जणू काई आपलेच हयेत आसे सांगणारे सायेबांसारखे लोक वायले आसत्यात, ह्ये आता प्रभंजनकुमारले म्हाईत झालं हुतं. काई येळा ह्ये नाटक करता येत नाई, तवा आपली मान उंच राखायची आजून येक पद्धत आसत्ये. डिशिजन वरल्या लोकायनी घितले आसले तरी त्ये मलाच इचारून घितलेत, माझ्या सल्ल्याशिवाय वरचे लोक परस्पर डिशिजन घियाची रिस्क घ्येतच नाईत, आसं सांगता यितं.

खडकगाळकर सायेब हालक्याफुलक्या मुडात हुते. म्हण्ले का, ‘मी सांगतो, ऐका. त्याचं काय आहे बघा, मला अशी सतत मी, मी करत स्वतःच्या टिमक्या वाजवणारी लोकं अजिबात आवडत नाहीत. मी माझ्या अवघ्या चोपन्न वर्षांच्या आयुष्यात कधी असं केलं नाही. ख्हो ख्हो ख्हो... बघा, मी माझं वयही लपवत नसतो. सांगून टाकलं. नाहीतर आजकाल पुरुष आपली वयं लपवतात आणि बायका आपले पगार लपवतात. माझ्या बायकोनं मात्र कधी असं केलं नाही बरं का. माझ्या बायकोचा पगार, माझ्या बायकोची इन्क्रिमेंट्स असं सगळं ती मला सांगत असते नेहमी. माझेही व्यवहार नेहमी स्वच्छ असतात, तर मग मी लपवाछपवी कशासाठी करावी? समजलं ना लपवाछपवी म्हणजे? नाहीतर परवाच्या चर्चेत तू पुनःपुन्हा लुकाछुपी म्हणत होतास प्रभंजनकुमार. अशी कशी रे तुमच्या पिढीची भाषा? माझी भाषा ऐकत जा जरा. सवड मिळेल तेव्हा माझे व्हिडिओ बघत जा. मी म्हणजे बघ, अगदी उच्चारांचीही कशी काळजी घेतो. मला आवडतच नाही असं कसंही बोललेलं. माझ्या पिढीतही मी अपवादच आहे म्हणा, पण मी वाचन करतो पुष्कळ. म्हणजे मराठी पुस्तकांचं वाचन करतो मी, इंग्लिश पुस्तकांची परीक्षण वाचून मराठीत परीक्षणं किंवा लेख लिहायचे असे उद्योग करून मोठे म्हणवतात लोक स्वतःला. पण मी त्यांतला नाही. माझं इंग्लिश वाईट आहे, असा त्याचा अर्थ नाही. पण जरा व्यासंग वाढवा रे तुम्ही माझ्यासारखा. मी एक यादी करून देतो तुम्हांला मी वाचलेल्या उत्तम पुस्तकांची. आणि माझी, म्हणजे मी लिहिलेली पुस्तकं तरी वाचली आहेत की नाही तुम्ही? कसं व्हावं रे मुलांनो तुमचं! नाही म्हणताना काही संकोच, शरमही वाटत नाही तुम्हांला. नावं तरी माहीत आहेत का माझ्या पुस्तकांची? नसतीलच. ठीकाय. माझ्या घरी आहेत काही प्रती शिल्लक, म्हणजे बऱ्याच आहेत, काळजी नको, मी देतो त्या तुम्हांला. बरं मी काय सांगत होतो... हां... तर मला अशी सतत मी, मी करत स्वतःच्या टिमक्या वाजवणारी लोकं अजिबात आवडत नाहीत...’
माझा प्रचंड लोकप्रिय ठरलेला लेख, माझी बहुचर्चित मुलाखत, माझे लोकांनी डोक्यावर उचलून घेतलेले भाषण, माझे अमाप वाचकांनी वाखाणलेले पुस्तक... ह्ये खडकगाळकर सायेबांचे आजून काई आवडीचे विषय हुते.

पण आता आवडीचा नाई, तर चिंतेचा विषय त्यांचं आणि त्यांच्या वाणाच्या पत्रकारांचं काळीज कुरतडू लागला हुता. कारण हुतं मोदींचा फतवा. आपल्या कोणच्यायबी मंत्र्यानं कोणच्यायबी पत्रकाराले कोणच्यायबी स्वरूपाची भेटवस्तू देयाची नाई, आसा फतवा मोदींनी काडला. आता शंभर दिवस मोदी सहकारी मंत्र्यांले कस्काय फटकारून र्‍हायलेत याच्या लई भारी गॉसिपी ऊर्फ किस्से इकडं तिकडं म्हण्जे फ्येसबुकावर, व्हॉट्सअपवर टणाटणा उडू लागले हुते. आपल्या मंत्र्यांनी जीनची प्यांट घालू नये, आसं बी त्येयनी सांगितल्याचं आयकून बदलापुरातली लेडीज बायकांची जनता लईच खुशीत आली हुती. त्येंच्या काप पंचायतीनं बी बदलापुरात आसलाच फतवा काडलेला.

खडकगाळकर सायेबांनी सव्वानऊच्या चर्चेत ‘मंत्र्यांनी उद्योजकांसोबत जेवू नये,’ या आधीच्या फतव्याचं दिलखुलास स्वागत क्येलं हुतं. सालं आपल्याले वगळून जेवतात म्हण्जे काय? आसा खुन्नस त्यामागं हुता ह्ये वायलं. पण आता ह्या मोदीची गाडी पत्रकारांवर कामून घसरली, ह्ये काई त्येंना कळंना? आपलं दरपत्रक तयार करायच्या न्येमक्या वेळेत यांनी आसं कामून करावं? तरी बरं आपलं घरही झालं आधीच्याच काळात आणि बायकोच्या अंगावर चार सोन्याचे डागही घालून झाले. पण आता पुडच्या साली पोराचं लग्न हये, सुनेला येकांदा हिऱ्यांचा हार घालता आला आसता, त्ये आता स्वप्नच ऱ्हाणार आसं दिसतंय. ह्ये इत्कंच नाई तर आता परदेशी दौऱ्यांवरही पत्रकारांना संगट नेयाचं नाई म्हणायलेत त्ये. ड्यूटी फ्री शॉपिंग कसं कुटं कवा करावं मग पत्रकारांनी? आच्छे दिन म्हण्ता म्हण्ता पत्रकारांवर बुरे दिन आणून ऱ्हायलेत ह्ये लोक. च्येहरा पाडून इचार कर्ता कर्ता आवचित खडकगाळकर सायेबांचे डोळे चकाकले. त्येंनी प्रभंजनकुमारच्या पाठीवर येक जोरदार थाप मारली आणि ‘काळजीचं कारण नाई’ म्हणत त्येंनी त्येला येक लिश्ट करायले सांगितली. ‘भेटवस्तू’मध्ये न मोडणाऱ्य‍ा कोणकोणच्या गोष्टी हयेत, याची लिश्ट! पत्रकारांना फक्त भेटवस्तू देयाच्या नाईत आसा फतवा हये, पण भेटवस्तू नसलेलं बाकी सगळं द्येऊ शकतातच की मंत्री! खडकगाळकर सायेबांनी सोताच्या पाठीवरबी मनातल्या मनात येक थाप मारून घितली, की याला म्हणतात माझं डोकं. असं भाषिक ज्ञान केवळ माझ्यासारख्याच माणसाकडे असू शकतं आणि ते योग्य वेळी वापरात कसं आणायचं, हेही माझ्यासारख्याच अनुभवी पत्रकाराला समजू शकतं. अखेर सगळे शब्दांचे खेळ असतात. शब्द फिरवता आले पाहिजेत माणसांना माझ्यासारखे! पण मला जे जमतं ते इतरांना कसं जमणार? माझ्यासारखा मीच!