आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल बदलापूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“त्ये मुदीचं भासन आयकलं का बाप्पू? त्ये डिजिटल इंडिया वीक म्हणून -हायलंय. आता मले येक लकवा मार्ला आणि मी शीक व्हत्तोच, त्यो वीकबी जालो... पण ह्यो इंडियाले वीक कामून म्हणून -हायलाय?” ड्रिंकर टेलरनं श्रीदेवी हिजड्याला विच्चारलं. श्रीदेवी काळजीत पडला, “आत्ता इंडिया वीक झाल्ला, तर कसं व्हावं माय? भारताची तर तिरडीच बांधावी लागंल ना बाई. गरिबायले कशी आदत -हाती वीक ऱ्हायची. गरिबानं वीक ऱ्हायलेलंच पर्वडतंय ना इंडियाले. त्ये कुपोषण नाई झालं, तं
पोरायले चिक्की देयाची योजना बंद व्हणार. योजना बंद झाली, तं मह्यलाबालकल्याणमंत्रिणीले चिक्कीचे कागद क्स्काय खायाले मिळणार? त्ये कागद नाइ खाल्ले, तं ती वीक व्हणार ना बाई. आणि बाईमाण्सानं वीक व्हऊन चालंल कसं? तिले तर घरचं बगावं लागत्ये, दारचं बगावं लागते, राज्याचं बगावं लागते, देशाचं बगावं लागते, झालंच तर अदूनमदून दौरे काडूकाडू दुस-यादेशायचंयबी बगावं लागते. मुदीनं बगा कोण्त्या कोण्त्या देशात जाऊन काय-काय वाजवलं. आता
नानाबी आम्रिकेत ग्येलेत म्हणत्यात. मह्यलाबालकल्याणमंत्रिणबाईबी हित्तं चिक्की खाऊ खाऊ जीव कट्टाळला म्हणून फारेनची चाकलेटं खावून बगायले ग्येली होती.”
“तुले बरंच ग्यान हये... दुस्रा कामधंदा काय्ये म्हणा? निस्ती दारू वाटायची संद्याकाळी न रातच्याला फायू ष्टार बारमद्ये...
थितंच खाणं फुक्कट... पिणं फुक्कट...” ड्रिंकर टेलरचा पोर्गा अक्षय हेवा वाटून म्हण्ला.
त्याच्याकडं दुर्लक्ष करत श्रीदेवीनं आवाज बदलत म्हणलं, “बाबौ... आज सूर्य कुण्कडं उंगवला म्हणायचा? जोशीबुवा जोतिषवालेंसंगट बगा देविदास अमृततुल्य चहाभांडाराचे मालक अमृतराव येऊन ऱ्हायलेत.” जोशीबुवा आणि अमृतराव यिऊन बाकड्यावर ट्येकले. अमृतराव हळहळत म्हणले, “तुझं आपलं बरंय ड्रिंकर, पोर्गा हाताशी आला. माजं पोर्गं आजून अकरा म्हयन्यांचंच हये.”
“व्हईल की त्येबी येकवीस वर्सांचं,” श्रीदेवीनं समजूत घातली. “लोकायची ल्येकरं कशी भराभरा वाडत्यात! आमचंच ल्येकरू वाडना बगा. आता मी रोज त्येचं वजन कर्तो, रोज उंची
मोज्तो. लै आळशी है बेणं. आजून रांगायचायबी कट्टाळा करत्ये, त्ये हुबं ऱ्हाणार कवा, चालणार कवा, बोलणार कवा, शाळंत जाणार कवा, हिशेब शिकणार कवा... आणि देविदास अमृततुल्य चहाभांडाराच्या गल्ल्यावर यिवून बस्णार कवा?” त्याच्याकडे दुर्लक्ष करत जोशीबुवा म्हण्ले, “काय, चर्चेचा विषय काय आहे आज?” “त्ये मुदी म्हण्लं का डिजिटलनं इंडिया वीक व्हणार!” श्रीदेवी हिजड्यानं सांगितलं, “आमाले लैच काळजी वाटून -हायली बगा. इंडिया वीक झाली, तर भारताचं कसं व्हणार?”
“कशातनं काय अर्थ काढता रे बाबा... हे तसं वीक नाही, वेगळं आहे.”
“वेगळं कस्काय?” श्रीदेवीनं विच्चारलं आणि मग एकदम डोक्यात प्रकाश पडून म्हटलं, “हां... म्हण्जे डिजिटलला इंडिया विकायचाय वाट्टं तेयाले. तरीच बात्मीत अंबानी भावभाव, बिर्ला, मित्तल आसली नावं हुती. आन आता मुदी उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किर्गीस्तान आणि ताझिकिस्तानले जाणार हये ते त्याचसाटी का काय? ह्ये देश इंडिया विकत घ्येतील इत्के मोठे हयेत का?”
“तसंपण नाहीय्ये!” जोशीबुवा वैतागून म्हणाले, “वीक म्हणजे आठवडा. इंडियात आठवड्याचे सात वार डिजिटल साजरे होणार आहेत. सगळ्या गावागावांमधून इंटरनेटच्या स्वस्त जोडण्या होतील.
सगळी कामं काम्प्युटरवर होतील. शेतमाल देशात कुठंही विकता येईल. सरकारी कचे-यांमध्ये कागदाच्या फायली तुंबणार नाहीत...”
“हां... पण मग फायली हरवल्या, खाली दबल्या आसं सांगता येयाचं नाई ना...” अमृतरावनं मुद्दा काढला.
“पण मंत्रालयाले आग लाग्ली आणि आगीत म्हत्वाच्या फायली जळून खाक झाल्या म्हणायची गरजच ऱ्हायणार नाई...
व्हायरस शिर्ला आणि फायली चुकूशान डिलिटल्या म्हणलं की संप्लं,” आक्षय म्हण्ला.
“तुले सगळीकडे वाईटच कामून दिस्तं?” ड्रिंकर टेलरनं त्याला वैतागून विच्चारलं.
“चांगलंबी दिसतं की. ह्ये बगा, नेटवरनं काय-काय विकत घेतं यीतं. दुकानात जायाचीपण गरज नाई. कापडं, बटनं, हुकं, धागे, शिलाई मशिनी, मशिनीचे पार्टं सग्ळं ऑनलाईन विकत घिता येतं,” आक्षय म्हण्ला.
“ह्ये चांगलंय की मग...” जोशीबुवा म्हणाले.
“सवाल इत्काच हये की, ह्ये घियाला पैसे कुटून यिणार आपल्याकडं? आणि ऑनलाइन हये त्ये ठीक हये, पण निस्ता मोबाइल चार्ज करण्याइत्का वेळ वीज ऱ्हायली बदलापुरात तरी आपण खुश व्हतोव. काम्प्युटरचा डबडा सुरू -हाईल इत्की वीज हित्तं कधी यिणार? काई विकायचं आणि विकत घियाचं म्हण्लं, तर ते काय बैलबंडीतनं आणणार नेणार का डोक्यावर उच्लून? गाड्या यित-जात नाईत कैक गावांमध्ये. यितील कशा, आदी रस्ते बनवायला होवेत. निस्तं डिजिटलची घोषणा दिल्ही की इंडिया व्हईल डिजिटल, पण बाकी भारताचं काय म्हण्तो मी?” आक्षय बडबडत बसला.
बाकी सगळे आता निरुत्तर झाले होत्ते.
kavita mahajan2008@gmail.com