आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्यारेज यानेवरसारी नाई, ह्यापी बर्डे नाई, व्हलेंटाइन डे नाई, ग्येला बाजार फ्रेंडशिप डे पण नाई... आसा आधेमधेच येकदम मी आमच्या ध्यानासाठी आयफोन कामून आण्ला? याचं सासू नं. दोनच्या मनाला लईच लागून -हाईलं. ह्ये आशी मनाला रुखरुख लागणं लई ब्येकार. मनात ठ्येवायचं तर मलावरोध हुयाची भीती आणि मनातलं कोणाले शब्दांत सांगायचं तर ढाळ लागलीच समजा! काय करावं काय करूने आसं मनातच विचार करत करत आखरीले तिनं विच्चारून मोकळं होयाचं ठरवलं. आता सरळ विच्चारलं तर मी काई साळसूद उत्तर द्येणार... ह्ये आता आस्तेआस्ते तिच्या टकु-यात शिरू लाग्लं हुतं.
आता कस्काय आस्ते बघा... काई लोक डायरेक्ट पोलिटिक्ष खेळत्येत; पांढरेधोप कापडं घालून, जाकिटं-टोप्या घालून, भगवीनिळीपांढरीहिरवी उपरणी गळ्यात लटकवून, आपण पोलिटिशिअन हयेत हेयाची जाईरातबी झकास करत्येत. त्येंनी चांगलं काम क्येलं तं त्ये त्यांना बोंबलून बोंबलून सांगाव लागत्ये का आमी रस्ते बांधले, आमी पूल बांधले, आमी ह्ये आणि त्ये आणि त्ये आणि ह्ये क्येलं. र्होडिंगा लावा, पोष्टर चिपकवा, किती भानगडी. पण वाईट केलेल्या, न केलेल्या, करून बिघडलेल्या गोष्टी लोकांना आधी समजतात. मग लोक शिव्या देयाले येकदम सामने... मतदानाले पिछाडीवर आसत्यात त्ये तर शिव्या घालायले सगळ्यात आघाडीले.
याच्या उल्टं... काई काई लोक राजकारणात कदीच दिसत नईत, पण त्ये सगळ्यात जबरी राजकारण खेळत्यात. आखाड्यात पाऊल न टाकता, नखालायबी माती लागू न देता कुस्ती जिंकतात; नायतर अंगाला तेल चोपडलं आसल्यागत आलगद निसटून जातात. आसलं राजकारण बायका कईक पिढ्या खेळत आल्यात. ती दिसत्यात बायका-बायकांतली उंब-याआत्ली भांडणं... पण गारद व्हत्यात मर्द. बायका भांडून, चिडून, मग रडून मोकळया व्हत्यात आणि भायेर मर्दायची डोस्की मेंदू कवायबी भस्सकन बाह्येर येईल आशी कवटी तडकलेली. तर सासू नं. दोननं डायरेक्ट सास-यांसमोरच अविश्वासाचा ठराव खोलला. त्यो त्यांच्यावर उलटणार आणि त्यांचं डिमोशन पक्कं हुणार याचा बाईला अंदाजच आला नव्हता. मी हिशेबाची वही काडली. जावयाले घितलेला आयफोनचा दाखला दिला.
मग सासू नं. दोननं आवचित मोसम बदलावा तसा टोन बदलला. डोळे पाण्यानं भरले. नाकाचा शेंडा लाल झाला. आवाज लाडीक गहिरा बनला.
‘लेकीसाठी तर क्येलं मी. काय दुस-या कोणासाठी क्येलं का? आता जावई इत्का पोलिटिक्षमदी उतरलाय. मनसे जाईन क्येलाय. त्येला राज ठाकरेच्या वाडदिवसाचं शुबेच्चा धेणारं र्होडिंग लावायचं हुतं. त्यासाठी सोताचा नवा फोटो काडायचा हुता. आता निस्ते फोटो तर समद्यांचे -हायत्यात. आपलं वेगळं खुलून दिसाय नकू का? तर मला शर्मिला, म्हणजे आपली राधिका म्हणली का, आई, यांना येक आयफोन घिऊन धे. देल्हा. कस्ल्या र्होडिंगी लागल्यात बघा जाऊन. वरच्या उजव्या कोप-याईत बोट उचललेला राज ठाकरे. खालच्या डाव्या कोप-यात आप्ला डावा हात उचलून आयफोन दाखवणारा आप्ला लोकल राज ठाकरे... म्हणजे आप्ला जावई. वळखू यावं म्हणून त्येचं नाव गुलबाशी रंगाच्या टायपात... मान्नीय श्री. सुरेशभाई राजाराम नवले यांच्याकडून मान्नीय श्री. राज ठाकरे यांना हार्दिक शुबेच्चा! डिट्टो राज ठाकरे दिस्तो बघा आप्ला जावई. शेम तस्साच म्येकप केल्याय.’
मले आतनं लई हासू येत हुतं. सुरेशभावजीचं त्ये फोटोसेशन मले माईत हुतं. शेम राज ठाकरेसारख्या फ्रेमीचा चष्मा, तस्साच टिळा आणि पांढरेधोप कापडं घालून शेम पोझी द्येऊन फोटो काडले हुते. आता सुरेशभावजीचं नाक म्हशीनं आपल्याच शेणाच्या पोवट्यावर पाय दिल्यावर जसं दिसंल तसं हये, याला बाकी त्येचा काई इलाज नई. पण बाकी शेम. मले म्हणला हुता, ‘वईनी, फ्येसबुक जाईन करा. आप्लं प्रोफाईल फोटु बघा. लाईक मारत जा. किती दिवस आडाण्यासारखं -हाणार बदलापुरात?
मी म्हण्लं का, ‘त्ये ठीक हये भावजी. पण खुद राज ठाकरेसंगट तुम्चा येकबी फोटो दिसंना? आस्कसं? तुमी तर लई सांगता का त्ये तुमाले किती मानत्येत.’
सुरेशचा चेहरा टपकन पल्डा. पण त्येनं त्यो विधुतव्येगानं उचल्ला. म्हणले, ‘म्हणून तर मी बायकूचं नाव शर्मिला ठिवलं. आता आपल्याले नशिबानं त्येंच्यावानीच येक पोर्गा, येक पोर्गी झाले. गावठी का आसनात, पण आपण कुत्री पाळण्याचा शौक पण क्येलाच! आपलं नशिबाचं लक चांगलं हये...’ सुरेशभावजी बोल्ता बोल्ता थबकले. त्येंचा चेहरा चिंतातूर दिसू लाग्ला.
(क्रमश:)