आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लई आळशी पुरुष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लौयू म्हण्णं, प्रपोज करणं, टेडी भ्येट देणं, ल्हान लेकरायवानी चॉकलेटं खाऊ घालणं, मिठ्या मारणं आस्ले सगळे दिवस फ्येब्रुवारीतच काऊन घातले जात आस्तील माय? तरी बरं का ल्हान म्हयना आस्तोया... नाईतर आजूक कस्ले कस्ले दिवस घातले आस्ते यायनी कोण जाणं? माझी नणंद राधिका उर्फ शर्मिला नवर्‍याच्या आयफोनवरून बोलत हुती. (तीच ती, जिचा नौरा म्हण्जे आमचे सुरेशभावजी मनसेत हयेत आणि नाक्यावर ज्यांचं आयफोन घेतलेला हात उचलेलं फ्लेक्स डकवलं हुतं, ज्ये फ्लेक्स आता नको त्या जागी चिरफाळलं ग्येलंय आणिक त्ये काडायच्या आदी तिथं आप्लं दुसरं कस्लं फ्लेस लावायचं याची आयडिया जावई शोधून -हाइलाय.)

वन्संच्या बोलण्याचा मी लै इच्चार क्येला. ट्यूब काई प्येटना.
कोणाले इच्चारलं तर लोकं आप्ले काईच्या बाई सांगत्यात. माझी मैत्रीण सुलभा म्हणे का, ‘बराबर नऊ मयन्यांनी 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करता यावा म्हून लोक 14 फ्येब्रुवारीले प्रेमाचा दिवस साजरा करत्यात!’

कोणाचं काय तर कोणाचं काय...
उत्तरगित्तर सापडलंच नाई, उल्टं आजूक येक सवाल डोक्यात उगवला. राधिका वन्संना म्हणलं, ‘सगळ्या गोष्टींचे दिवसच कामून घालत्येत लोक? ज्या गोष्टी रातच्याले करायच्या राहत्यात, त्याचे बी दिवसच? आसं कामून आसंल बाई? आमक्याची नाइट, तमक्याची नाइट आसं कामून म्हणत नसतील?’
तर आमची नणंदबाई म्हणली का, ‘वयनी, तू लैच चावट बोलून -हायली. येका रातीला आमका, दुसर्‍या रातीला तमका... म्हणजे काय म्हणायचंय काय तुला?’
मी म्हणलं, ‘तसं नाई ग बाई. आता रोज डे आस्तंय ना...’
‘रोज तर डे बी आस्तो आणि नाईट बी आस्ती.’
मी कावलेच. काय बाई करावं या बाईच्या आकलेचं... कशी काय ही सहावी नापासपर्यंत तरी शिकली म्हण्ते मी. म्हणलं, ‘लै फाटे फोडू नका राधिकावन्स तुमी. रोज म्हण्जी रोज नाई, रोज म्हण्जे गुलाब. गुलाबाचा दिवस. आता गुलाब दिवसा उगोतो, तर दिवस ठीकाय... पण मग येखांदी रातराणी नाइट कामून नस्ती म्हणते मी?’
तर तिचा नौरा, म्हणजे आमचे सुरेशभावजी म्हण्ले, ‘वयनी, नाइट बी आस्ती. तुमाले नाई म्हाईत. गटारी काय दिवसा आस्ती काय? ती ब्येवडा नाइटच आस्ती.’
येक तर आसं कोणी दुसर्‍याचं बोलणं आइकल्येलं मला आवडत नाई. पण आता ह्ये पडले जावई. कशी कुटकुट करणार यांच्याकडं? बायाबाया बोलतोय म्हण्लं का ओपनली काईबी बोलत अस्तो आपण. त्ये बाप्यायनी आयकायचं काय काम?

पण ह्ये टीव्हीवरच्या सिरियली बगूबगू लई बिगडल्येत बाप्येबी. चोरून काय आयकतेत, सोंशय काय घ्येत्येत, कुचूकुचू काय बोलत्येय... घरात सजूनधजून बसणं काय बाप्यायचं काम -हातंय का? लग्नाचा येक दिवस सूट नाईतर शेरवानी घालायची म्हटलं तरी यांना घाम फुटतो... म्हण्जे बाकी काई म्हणायचं नाई मला... आपल्याकडली हवाच तसली आहे तिला त्ये तरी काय करणार? पण टीव्हीवरचे बाप्ये दिवसरात्र लग्नघर असल्यावानी सजून बसत्येत हॉलमध्ये आणि बायायसोबत कुचुंद्या करत्येत.

त्ये बघूनबघून बाकी पुरुषांनाही आपण घर-घर खेळत बसाव वाट्टे कामधाम सोडून.
मी राग आवरून म्हण्लं, ‘ह्ये बरं आठवतं सुरेशभावजी तुम्हाले. काई चांगलंवांगलं आठवना?’
तर त्ये म्हणले, ‘मी जरा येगळ्याच चिंतेत हये. दुसरं काय आठवणार?’
आता यायले कस्ली बाई चिंता लागली आसंल? कळंना. तर त्येयनी राधिकाले कुत्र्याले जरा फिरवून आण म्हणून बाह्येर धाडलं आणि खुसखुसत मला इचारलं, ‘वयनी, दादाने तुमाले काई गिफ्टबिफ्ट देल्हं का? देल्हं आसंल तर काय देल्हं सांगता का? व्हॅलेंटाइन डे हये, तर गिफ्ट काय द्येणार... आसं राधिका आडून आडून इचारत हुती. शिवसेनेत आस्तो तर व्हॅलेंटाइन डेला इरोध आहे म्हून सुटका झाली आस्ती... मनसेत आलो आणि अडकलो. आता तुमीच काय त्ये सांगा.’
आता यायला काय सांगणार आप्ली ट्राजेडी का काय म्हणतात ती?

आमचं ध्यान आणि गिफ्ट आणणार आणि त्येबी व्हॅलेंटाइन डे लक्षात ठीऊन? यांले माझा वाढदिवस ध्येनात -हात नाई, लग्नाचा वाढदिवस ध्येनात -हात न्हाई... आन त्यो कोण व्हॅलेंटाइन का कोण, त्याच्या प्रेमाचा दिवस ह्ये लक्षात ठिवणार? आभाळ कोसळंल, जमीन हादरलं, दुनिया इकडची तिकडं होयल; पण यांना प्रेमातलं पसुदिक कळायचं नाई कधी.

मी उदास व्हऊन म्हण्लं, ‘काई काई पुरुष लई आळशी असत्यात सुरेशभावजी. खरंच हां. आता आमचंच ध्यान बगा... फ्लाइंग किस द्येतंय...’
सुरेशभावजी चितागती व्हऊन म्हण्ले, ‘आसं कामून वयनी? तुमी काय तंबाखू खाता का दारू पिता तोंडाले वास यियाला?’
भडकाच उडला की मग तर माझा. म्हण्लं, ‘ही सखुबाई येकदम नीटनेटकी हये. अख्ख्या बदलापुरात माझ्यासारखी बाई नाई. आतामाझ्या सासू नं. 3 चा देखणेपणात अपवाद. त्ये सोडा. त्यामुळं नस्ते आरोप नगा करू सुरेशभावजी... उगं पुर्षांच्या आळसावर पांघरूण घालायले यिऊ नका. उंदराले मांजर साक्षी बनून गंजुभावजी येत्यात तसे. सगळे पुरुष म्येले सारखे. याला झाकावं आणि त्याला काढावं.’

आणि आपटला फोन दाणकन. बघत्ये तर काय... आमचा आरुण गवळी, म्हण्जे आमचे सासरेबुवा सासू नं. 3 साठी बदामांच्या नक्षीचा लाल चमचम चमकणारा कागदात गुंडाळलेला गिफ्टबॉक्स घिऊन सासू नं. 3 च्या ब्येडरुमीकडं निघाले हुते तोर्‍यात परफ्युम फवारून.

kavita.mahajan2008@gmail.com