आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धोळी प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभंजनकुमार म्हणला, का “ताई, तुम्ही सगळ्या च्यानलवाल्यांना प्रतिक्रिया देऊन ऱ्हायल्या. आमचं च्यानल बदलापुरातलं आसलं म्हणून काय झालं? आमचा बदलापुरातला टीआरपी बाकी महाराष्ट्राच्या टीआरपीपेक्षा जास्त हये. त्ये नेमाडे गुरुजींनी हंगेरीचा आणि महाराष्ट्राचा साइज सेम हये आसं सांगलं ना तसंच ह्ये.’
मी म्हणलं, का “प्रभंजनकुमार, हुगं वाकड्यात शिरूने. माझ्यासारख्या सरळ माण्सांशी सरळ बोलत जावं बाबा. सांग, तुला कस्ली प्रतिक्रिया पायजेलय?’
“आमचं आखिल बदलापूर जागतिक साहित्य संमेलन यंदाच्याला दत्तआळीत घेयाचं ठरलंय. आप्ल्या कुंथलगिरीकर महाराजांच्या पणजोबांची रूम हये तिथल्या चाळीत. चाळ आता लय मोडकळीला आलीया, तर त्ये म्हण्ले का या संमेलन निधीतून काम व्हवून जाईल परभारे.’
“तसं तर तसं… पण प्रतिक्रिया कस्ली पायजेलाय?’
“आप्ले बदकआळीतले सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध अर्धोळीकार ननावले अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. त्यांचे बावीस अर्धोळीसंग्रह प्रकाशित झाले हयेत आणि सव्वातीस प्रकाशनार्थ तयार हयेत. म्हण्जे प्रकाशक भेटोस्तोवर येकतिसावा व्हऊन जाईल म्हणाले. त्यातला येक तुमच्या कादंब्रीवर आधारित हये.’
“आँ… कस्काय बुवा?’
“म्हण्जे तुमची ती कादंब्री हये ना…’
“कोण्ती?’
“येकच तर हये म्हण्ले त्ये… ब्र नावाची. म्हण्जे त्येंच्या मते, ‘तुम्ही ही येकच कादंब्री लिहिली आणि संपल्या. आणि आता प्रतिक्रियांपुरत्या उरल्या.’ तर त्या ‘ब्रच्या अर्धोळ्या’ नावाचा संग्रह हये. त्यातल्या निवडक अर्ध्या अर्ध्या ओळी त्येंनी अर्धोळी म्हणून निवडून त्यांचा स्वतंत्र संग्रह लिहून, छापून तुमचा सन्मान केलाय. स्त्रीवादी साहित्याचा सन्मान करणारे पुरुषच खरे पुरुष आसत्येत… एडिट… पुरुष ल्येखकच खरे पुरुष ल्येखक आसत्येत आसं त्यांचं म्हण्णं हये. पुरुष ल्येखक ही तुमची फ्रेज त्येंची आवडती फ्रेज हये. आणि आजूक त्येयनी आसा बावीस स्त्री-पुरुष ल्येखकांचा सन्मान क्येलाय. आणि आजूक येकतिसांचा करायची त्येंची तीव्र इच्छा हये.’
“काय सांगतो…!’
“हां ताई… आता उदाहरणादाखल ‘ब्रच्या अर्धोळ्या’ संग्रहातल्या या काही अर्धोळ्या ऐका…
१. त्या सर्व जिभांना…
२. स्मरण होते. तिच्या या चिंतेनेच
३. फोडून खाल्ला होता त्याला
४. अंगठे दिल्हे आम्ही
५. पक्षांतर केलं आहे का?’
“ही पाचवी तर पूर्णोळी झाली. आस्कंसं?’
“नाई ताई… तुमी काय लिहलंय येवढ्या कादंब्रीत, त्ये तुम्हांला कसं आठवणार? ही पूर्णोळीची अर्धोळीच हये. आधीची आर्धी ओळ पायजेल तर आमचे बदलापुरातले समीक्षक कंठोळे शोदून द्येतील.’
“नको नको. आसंल लिहिलं. येवढं शोदून लिहिलंय म्हण्जे काय खोटं आसंल का? आणि खोट्यालायबी कल्पनाशक्ती लाग्ते. अर्धोळे…. आपलं ननावले तर वास्तववादी कवी हयेत ना, त्येंचा कल्पनेशी काय संबंद?’
“राइट ताई. म्हणून तर त्येयनी चार मुली झाल्या, तरी येकीचयबी नाव कल्पना ठिवू दिलं नाई. म्हण्जे त्याचं आजूक येक कारण हये. पण आपण काय कुणाची व्यक्तिगत बदनामी करत नाई ना ताई च्यानलवर. म्हण्जे तसा प्रसंगच गुदरला तर निराळं… येरवी येता-जाता नाई करत.’
“हां… बरोबर हये. पण त्ये प्रतिक्रिया कस्ली पायजेलाय?’
“मराठी कवितेचा खंडकाव्यापासून अर्धोळीपर्यंतचा होत आलेला प्रवास २०२५ साली नेमका कुठे जाणार की खंडित होणार?… या विषयावर चर्चा हये ताई… तर तुमची याबाबतची प्रतिक्रिया पायजेलय… फक्त येकच अट हये ताई…’
“काय आता?’
“सगळ्या ल्येखक-कवींच्या प्रतिक्रिया अर्धोळी या साहित्यप्रकाराच्या सन्मानार्थ अर्ध्या ओळीत घेयाच्या ठरल्यात, तवा अर्धी ओळच सांगा…’
“पण तुम्हाला तर सगळ्याच पूर्णोळ्या आरध्या आरध्या कापायची सवय हये ना प्रभंजनकुमार… आता ह्ये कामबी आमीच करायचं, त्येबी विदाउट मानधन, ह्ये काई बरं न्हाई… बरं… आर्ध्या तासानं फोन कर पुन्यांदा… मी प्रतिक्रिया लिहून ठेवते तवरोक.’
“बराय ताई… धन्यवाद.’