आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिर्फ एक उंगलीही काफी है !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पेशंटीण लंबर बारा कोण हये?’’ सिश्टर फातिमानं पुकारा केला. बाहेर बाकड्यावर पेंगुळणारी मीनावयनी खाडकन उठून उभी -हायली. सिश्टर फातिमाचा आवाजच तसा होता. यखांद्या मोठ्या अपघातानंतर मेलेले कोण, जिते कोण हे तपासायचं आसलं की डॉक्टर सिश्टर फातिमाला सोबत घेऊन जातात. तिनं यकदा आवाज देल्हा का जिते आसलेले कितीयबी जखमी आसले तरी आडव्याचे हुबे होत्येत, निदान यकडाव हात नायतर पाय तरी वरती करून हजेरी देत्येत का, ‘‘मी जित्ता हाव!’’
यकडाव तर डेडबॉड्यांच्या गराड्यात अडकलेल्या येका जखमीनं मोडका हात पुरा उचलता येईना म्हणल्यावर बाजूच्या डेडबॉडीचा तुटून पडलेला हात उचलून उंचावून दाखवला हुता!
आवाजाची जादू म्हणत्यात ती हिच आसणार याची बदलापूरवासीयांना अंतकरणपूर्वक खात्री हये.
मीनावयनी पेशंटीण कसली, सोताच पेशंट दिसत हुती. पाप्याचं पितर म्हणावी असा देह. बेवड्याचीबायको आजून कशी दिसणार? सिश्टर फातिमाच्या देहात असल्या छप्पन्न मीनावयन्या मावल्या असत्या. सिश्टर फातिमानं तिच्याकडं तुच्छतेनं नजर फेकली.
‘‘पेशंटाचं स्पंजिंग करायची येळ झाली. लवकर आटपा. माझी ड्युटी आठ वाजता संपवायचीये. त्येच्या आता सगळी कामं होयाला होवीत.’’ सिश्टर फातिमानं बजावलं. तिचं बजावणं म्हणजे शब्दांचे कडकडीत फटकेच... चाबकासारखी वाक्यं!
मीनावयनी मुकाट्यानं आत गेली.
ह्ये काम माजं नाई, तुजं हये... हे सिश्टर फातिमाला सांगायची निस्त्या दवाखान्यातच काय अख्ख्या बदलापुरात कोणाच्या बापाची हिंमत नव्हती. डॉक्टरसुद्धा तिच्यापुढं चळाचळा कापत. मेडिकलला शिकताना पयल्यांना डेडबॉडी कापताना जे आजाबात घाबरले नव्हते, ते भले भले डॉक्टरसुद्धा सिश्टर फातिमाची जिवंत बॉडी बघून घाबरून मलेरिया झाल्यावानी जागीच थडाथडा उडू लागत.
पेशंटची बायको पेशंटीण हा शब्द तिनंच फाइंड क्येलेला.
‘‘आता जर का बाई पेशंट आसली, तर तिच्या नवर्याले काय म्हणायचं?’’ आसा बेसिक सवाल तिले अस्मिता मॅडमनी इचारलाच येकडाव.
फातिमानं त्यातल्या त्यात समजूतदार तुच्छतेनं अस्मितामॅडमकडे पाह्यलं आणि त्यातल्या त्यात शांत आवाजात सांगलं का,’’ भायेर बाकड्यावर पाहून या... येक जरी नवरा सापडला थितं, तर या म्हयन्याचा पगार दवाखान्याले दान देईन. बाई पेशंटांचे नवरे कधी तिच्यासंगट दवाखान्यात येत नसत्येत. माहेरच्या नातेवाईकांना सांगावा जातूय. त्ये येईपास्तोर शेजारणी येऊन बसत्यात.’’
अस्मिता मॅडमनं पुढचे समदे सवाल कडू गोळ्यांसारखे गिळून टाकले.
सिश्टर फातिमा बदलापुरातल्या सर्कारी दवाखान्यात रुजू झाली आणि दवाखान्याचा चेहरामोहराच बदलून गेला. पहिल्यांछुट आठवडाभरात दारं निखळून खाली आली आणि मग कुणीतरी गुमानं ती चौकटीपास्रं मोकळी करून दवाखान्याच्या स्टोअररुममध्ये ठेऊन दिली. दरवेळी तिरकं होऊन जायचं म्हटलं तरी धक्के बसून चौकटीही खिळखिळ्या झाल्या होत्याच, पण त्यांना इलाज न्हवता. पयल्याच दिवशी मलेरिया झालेल्या एका पेशंटचं सिश्टर फातिमानं सकाळी स्पंजिंग केलं, संध्याकाळी तो न्यूमोनियानं मेला. तेव्हापासून डॉक्टरांनी अलिखित फर्मान काढलं की, पेशंटच्या नातलगांनीच आपापल्या पेशंटचं स्पंजिंग करायचं!
पावसाळा सुरू झाला की, वेगवेगळ्या प्रकारचे ताप बदलापुरात दाखल व्हायचे. कुठूनतरी आफ्रिकेतून देखील यायचे काईकाई. पोटं बिघडणं तर पावसाळ्यात नेहमीचंच. सर्दी खोकलाही घरोघर. बदलापुरात एकमेव व्यक्ती निरोगी आणि संपूर्णपणे ठणठणीतहोती, जिला कधी कुठलं औषध घ्यावं लागलं नाही, इंजेक्शन घ्यावं लागलं नाही, जिला कधी सलाईन लावावं लागलं नाही, कोणतंही ऑपरेशन करावं लागलं नाही... इतकंच काय तिला कधी साधं नखुरडंही झालं नाही की कधी शिंकही आली नाही! आणि तरीही तिला दररोज दवाखान्याच्या मोडक्या खिळखिळ्या पाय-या चढाव्या लागणं नशिबात होतं! अर्थातच फातिमा सिश्टर!
तर घटना अशी घडली हुती का काल मध्यरात्रीला दिनकर उर्फ ड्रिंकरटेलरला दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं हुतं. आता त्यानं दारू पिऊन लास होणं काई नवं न्हवतं. पण काल काईतरी येगळंच घडतंय ह्ये बदलापुरातल्या फ्येमस फाइव स्टार बार मदल्या हिजडा वेटर श्रीदेवीच्या पयल्यांदा ध्यानात आलं. आता श्रीदेवीचे ब्लाउज पूर्वी ड्रिंकर टेलर आणि आता त्याचा फ्याशन डिझायनर ल्योक आक्षय शिवून द्येत आसल्यानं श्रीदेवीला त्या खानदानीविषयी विशेष आपुलकी व्हती. कवायबी ब्लाउजचं नवं डिझाइनआलं का त्या डिझायनीचं पयलं ब्लाउज श्रीदेवीसाठी शिवलं जायचं, मग आप्रुप -हाणारचना वो! तर श्रीदेवीनं आक्षयला फोन क्येला की, ‘‘ड्रिंकरराव हात पाय झाडून -हायलेत आणि त्येंच्या तोंडून सफेद फ्येस येऊन र्हायलाय. ताबडतोबीनं निघून ये.’’
खंडमाले गुत्तेदारानं गाडी काडली. तवरोक आक्षय मीनावयनींला घिऊन आलाच. शिंगणेडॉक्टराची फी लय महाग हुती. पांड्या डॉक्टरकडं अ‍ॅडमिट व्हयाची सोय नव्हती. अशा लोकायसाठीच तर सर्कारी दवाखाना हुता. मग न्येलं तिकडंच. फातिमा सिश्टरचा आवाज आयकून त्याची आकडी तर सरळ झाली, पण वाचा गेली. त्याची दातखीळ बसलेली म्हणून ती मोकळी करायला फातिमा सिश्टरनं निस्तं जबड्याला बोट लावलं हुतं!
kavita.mahajan2008@gmail.com