आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळप आणि कुटुंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसई -  कळप जनावरांचा असतो, थवा पाखरांचा. गट, घोळका, कुटुंब, कुल, गोतावळा हे सगळे माणसांचे. सहज एकत्र आलेली आणि त्या एकत्रांमध्ये जन्मलेली माणसं ही पुरातन काळात कळपच होती. समूहाने ती अन्नपाणी शोधत भटकत. समूहात सुरक्षित वाटे. यातून जे नदीकाठच्या सुपीक प्रदेशांमध्ये आले; जंगलांमधल्या जलाशयांजवळ राहिले; ते स्थिरावले. 
 
त्यांच्याकडे पशुधन एकतर नसेच, किंवा असलेच तर मोजके असे. काही कळपांकडचे पशुधन मात्र भरपूर वाढले आणि प्राण्यांचे दूध, मांस हे जगण्याचे साधन बनले. इतकी जनावरे घेऊन स्थिरावणे त्यांना शक्य नव्हतेच; कारण बारमाही चारा कुठून आणणार? त्यामुळे ते जिथं आणि जोवर चारा मिळे तिथे, तोवर राहू लागले. स्थिरावलेल्या लोकांनी घरं बांधली, गोठे बांधले; शेतजमिनीचा आकार वाढवत नेला; त्यांच्या भाषा अधिक विकसित झाल्या आणि कलादेखील. हा काळ स्त्रियांसाठी शांततेचा आणि समृद्धीचा होता; पण तो फार टिकला नाही. 

शेती करणारे आणि पशुपालक यांच्यातले संघर्ष सुरू झाले. शेती करणारे कुटुंबाचा विस्तार करीत, अधिक मुलं व्हावीत आणि व्यावसायिक कामांसाठी बाहेरून माणसे आणावी लागू नयेत, हे त्यांचे धोरण होते. तर पशुपालक टोळ्यांमध्ये पशूंप्रमाणेच माणसेही दास/ गुलाम म्हणून पाळली जात. त्यांनी शेतांमध्ये गुरं घुसवली; शेतकऱ्यांच्या स्त्रिया, मुलं आणि पशू पळवण्यास सुरुवात केली. यामुळे स्त्रिया आणि मुलांचं रूपांतर पशू व जमिनीच्या तुकड्याप्रमाणेच ‘मालमत्ते’त झालं. 

शेतकरी पशुपालकांसारखे आक्रमक, दांडगट नव्हते; शांत, सुखी आयुष्य जगत असल्याने संघर्षात त्यांचं बळ कमी पडू लागलं. कुलात, कुटुंबात पुरुषांचं वर्चस्व या टप्प्यावर ‘रक्षणा’ला भाव आल्याने प्रचंड वाढलं. मातेची सत्ता कमी होत होत ‘भावां’ची सत्ता सुरू झाली; विवाहसंस्था स्थिरावत गेली तशी ती सत्ता हळूहळू भावांकडून ‘पती’कडे गेली. 
 
या सत्तेतून ‘पुरुषसत्ताक’ हा शब्द आला आणि तर्काची कसोटी न लावताच त्या आधीच्या काळाला ‘मातृसत्ताक’ असं चुकीचं संबोधन लावलं गेलं. शेतीतली अनेक कामं स्त्रिया करीत, त्यांची जागा दास/मजूर यांनी घेतली आणि जिंकलेल्या पशुपालकांनी शेती करणाऱ्या स्त्रियांना दासी बनवून त्यांच्याकडे सेवा, मनोरंजन अशी कामं सोपवली.
 
पशुपालकांच्यात मातृपूजा नव्हती; त्यांना आपल्या पौरुषाचा जरा जास्तच अभिमान होता. त्यांनी आपल्या ‘दासां’च्या मातृपूजेसारख्या अनेक प्रथा-परंपरा मागास आणि तुच्छ लेखल्या. पशुपालकांच्या टोळ्यांमध्ये ज्या स्त्रिया होत्या, त्यांचेही स्थान ‘जिंकलेल्या’ मुबलक स्त्रिया टोळीत आणल्या गेल्याने घसरले; त्यांचे महत्त्व संपले. दोन्ही गटांमधल्या स्त्रिया अशा कनिष्ठ पातळीवर आणून ठेवल्या गेल्या.

स्त्रिया आणि मुलांची विक्री करणे, त्यांना दान देणे, विवाहाद्वारे त्यांची देवाणघेवाण करणे हे प्रकार याच काळात सुरू झाले; ते थोडंबहुत स्वरूप बदलत इतकी शतकं टिकून आहेत. वैदिक काळात पत्नीला, कन्येला मालमत्ता समजले जात नसे. पण पुढील काळात तिला वस्तुरूप आले व ती पित्याची वा पतीची संपत्ती मानली जाऊ लागली. कन्याच नव्हे तर पुत्रही पित्याची मालमत्ता गणले जात. 
 
कौटिल्याने दंडाची रक्कम चुकती करण्यासाठी धन, पुत्र व पत्नी उचित मानले जातील, असे अर्थशास्त्रात सांगितले आहे. पुत्रदानाच्या कथा फारशा कुठे सापडत नाहीत, चिलयाबाळाची गोष्ट वगैरे जागी क्वचित दिसतात. महाभारतात पत्नी दान दिल्याच्या कथा आहेत. मित्रसह राजाने आपली पत्नी मदयंती वसिष्ठाला दान दिली; युवनाश्व राजाने आपल्या स्त्रिया दान दिल्या; इत्यादी. पुढे तेराव्या शतकातलेही उदाहरण आहे. सर्व काही गुरूला अर्पावे, हा आदेश तंतोतंत पाळणारा एक शिष्य आपली गाय, कांठाळ (सामानाची पिशवी) आणि त्यांच्याबरोबर ब्राह्मणी चक्रधरांना अर्पण करतो. जसे गोदान तसेच हे! 

‘स्त्रियोवैश्यास्तथा शूद्राः’ अशी एक ओळ गीतेत आहे. त्यात स्त्रीचे स्थान वैश्यांच्या आधी दिसते. पुढच्या काळात त्याची घसरण होत ते शूद्रांच्या बरोबर आले आणि मग तिथूनही उतरून पशूच्या बरोबर आले. स्त्रीला वेदाधिकार राहिला नाही. शूद्रांप्रमाणेच ती यथाकाम वध्य ठरली. स्मृतिकाळात स्त्रियांनी विरोध, विद्रोह, संघर्ष केलेला असावा, याचा अंदाज येतो; अन्यथा त्यांच्यावरची बंधनं इतकी कडक झाली नसती आणि त्यांची इतकी थेट निंदानालस्तीही झाली नसती. 
 
आपलं स्वातंत्र्य तर त्यांनी गमावलंच आणि निर्बंधही जास्त आवळून घेतले. त्यांचे स्वत्व उरले नाही. त्यांचा स्वाभिमान नष्ट झाला. त्या तिरस्कृत, घृणास्पद ठरवल्या गेल्या. अधम, नीच, विश्वासास लायक नसलेल्या, कुटुंबं विभक्त करणाऱ्या, अब्रू घालवणाऱ्या, व्यभिचारी, मालमत्तेची-अलंकारांची लालसा असलेल्या, दु:ख देणाऱ्या, मोक्षमार्गात अडथळे आणणाऱ्या असे अनेकानेक आरोप त्यांच्यावर इतके वारंवार केले गेले की, त्याचे अवशेष दीर्घकाळ टिकून आहेत आणि पुढील काळातदेखील लवकर नष्ट होतील, अशी शक्यता कमीच दिसतेय.

स्त्रिया आणि मुलांची विक्री करणे, त्यांना दान देणे, विवाहाद्वारे त्यांची देवाणघेवाण करणे हे प्रकार याच काळात सुरू झाले; ते थोडंबहुत स्वरूप बदलत इतकी शतकं टिकून आहेत. वैदिक काळात पत्नीला, कन्येला मालमत्ता समजले जात नसे. पण पुढील काळात तिला वस्तुरूप आले व ती पित्याची वा पतीची संपत्ती मानली जाऊ लागली.
 
कन्याच नव्हे तर पुत्रही पित्याची मालमत्ता गणले जात. कौटिल्याने दंडाची रक्कम चुकती करण्यासाठी धन, पुत्र व पत्नी उचित मानले जातील, असे अर्थशास्त्रात सांगितले आहे. पुत्रदानाच्या कथा फारशा कुठे सापडत नाहीत, चिलयाबाळाची गोष्ट वगैरे जागी क्वचित दिसतात. 
 
 (kavita.mahajan2008@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...