आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजाहून महत्‍त्‍वाची भूमी, भूमीहून थोर मालक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.
 
विवाहाचे अनेक प्रकार समाजात रूढ होऊ लागले आणि त्यानुसार जन्माला आलेल्या मुलांचेही प्रकार मानले जात. मूल हवं, मात्र ते पुरुषाला स्वत:च्याच बीजाचं हवं ही कल्पना रुळली महाभारत काळात (अंदाजे इ.स. पूर्व ३००० ते इ.स. पूर्व १५००); अर्थात त्या आधीच ती जन्मली होती, मात्र ती प्रस्थापित होण्याचा काळ महाभारताचा होता. रामायणातले अनेक आदर्श या काळात धुळीस मिळालेले दिसतात. एकुणात अनेकांगांनी हा महास्थित्यंतरांचा काळ होता. महाभारतातली सुरुवातीचीच एक कथा आहे.
 
गुरू या ग्रहाचा प्रमुख बृहस्पती. त्याची पत्नी तारा. बृहस्पतीचं मुख्य काम देवांसाठी यज्ञांचं आयोजन करून ते व्यवस्थित पूर्णत्वास नेणं, म्हणजे थोडक्यात पौरोहित्य करणं. बृहस्पती हा तर्ककठोर आणि अतिचिकित्सक बुद्धिवादी. आपल्या अभ्यासात, चिंतनात आणि धर्मकार्यात सदा व्यस्त असलेला. अखेर ताराला त्याचा कंटाळा आला आणि ती सरळ चंद्राचा हात धरून पळून गेली. चंद्र भावनोत्कट, मोहक, प्रेमळ आणि शांत स्वभावाचा. बृहस्पती या घटनेने हबकला, पण ताराला परत घेऊन येण्याचा काहीएक मार्ग त्याला सुचेना. याच काळात देव त्याला भेटण्यासाठी आले, नव्या यज्ञासाठी! आणि बृहस्पतीच्या बुद्धीला युक्तीचा मार्ग सुचला. त्यानं देवांना सांगितलं की, “आता मी पौरोहित्य करू शकणार नाही. कारण ते करायचं, तर बायको शेजारी असावी लागते. माझी बायको जर तुम्ही चंद्राच्या तावडीतून सोडवून परत आणून दिलीत, तरच मी पौरोहित्य करू शकेन; अन्यथा नाही.”
 
हे यज्ञ यशस्वी व्हावेत अशी अपेक्षा असेल, तर बृहस्पतीशिवाय देवांना दुसरा कुठला पर्याय नव्हता. जे व्यावहारिक विचार करणारे देव होते, त्यांनी चंद्राशी युद्ध करून, कपट करून, तारावर बळजबरी करून... थोडक्यात कुठल्याही मार्गाने ताराला परत आणावं आणि बृहस्पतीच्या हवाली करावं असं वाटत होतं. तर काही देवांना ताराची काही चूक नाही, तिला हव्या त्या आवडत्या पुरुषासोबत राहण्याचा तिचा निसर्गदत्त अधिकार आहे, ती आहे तिथं सुखात आहे आणि तिला तसंच चंद्राकडेच राहू द्यावं असं वाटत होतं. या टप्प्यावर पुरुषसत्ताकवृत्ती जिंकली आणि इंद्राने ताराला ‘आदेश’ दिला. तारा नाइलाजाने नवऱ्याकडे परत आली. इथून दुसरं नाट्य सुरू होणार होतं. परत आलेली तारा गरोदर होती. ती जातानाच गरोदर होती की नाही, हे बृहस्पतीला अर्थातच ठाऊक नव्हतं. ताराच उत्तर देऊ शकणार होती की, हे मूल कुणाचं आहे? पण ताराने उत्तर देण्यास ठाम नकार दिला. ती तिची व्यक्तिगत बाब होती, त्यात तिच्या नवऱ्याने वा देवांनीही नाक खुपसण्याचं काहीएक कारण नव्हतं. सगळे गप्प बसले. मात्र हे वाद ऐकणाऱ्या तिच्या पोटातल्या गर्भाला ‘आपला पिता नेमका कोण?’ याविषयी प्रचंड उत्सुकता वाटू लागली. त्यानं ओरडून विचारलं की, “माझा पिता नेमका कोण आहे, हे जाणून घेण्याचा माझाही अधिकार आहे. माझा अधिकार माझी आई डावलू शकत नाही.”
 
तेव्हा मात्र ताराचा नाइलाज झाला आणि तिनं चंद्रच त्याचा पिता असल्याचं त्याला जाहीर सांगितलं. हे ऐकून बृहस्पती संतापला; त्याची बुद्धी व तर्क काम करेनासे झाले आणि तो ताराला घरातून हाकलून द्यायला निघाला. हे मूल नपुंसक असेल, ते स्त्रीही नसेल आणि पुरुषही नसेल; अशी भयानक शापवाणीही त्यांनी उच्चारली. ताराचा हा पुत्र म्हणजे ‘बुध’; त्याची एक निराळी कहाणी आहेच.

इतक्या उचापती करूनही पुन्हा यज्ञ होणार नाही; यज्ञ नाही म्हणजे पाऊस नाही, पाऊस नाही म्हणजे दुष्काळ आणि दुष्काळ म्हणजे माणसांचा देवांवरून विश्वास उडणं! हा पराजय स्वीकारण्याची इंद्राची तयारी नव्हती. त्याने मार्ग काढून निर्णय दिला. बृहस्पतीला समजावलं की, “बीज महत्त्वाचं नसतं, महत्त्वाची असते ती भूमी; आणि भूमीहून थोर असतो तो तिचा अधिपती. तारा तुझी लग्नाची बायको आहे. तिच्यावर तुझा मालकी हक्क आहे. तिचं जे जे काही आहे, ते ते सारं तुझंच आहे. अर्थात हे मूल चंद्राच्या बीजाचं असलं, तरी त्याचा पिता तूच आहेस!”
 
मावरी या आदिवासी जमातीतलीदेखील अशी एक लोककथा सांगितली जाते. पंच जाब विचारतात तेव्हा ती शांतपणे म्हणते, “मी कुपाटाकडे तोंड करून बसलेले होते. किडूक की मिडूक मला नाही माहीत.” आणि तिचा ‘उत्तर न देण्याचा अधिकार’ पंच मान्य करतात. आजही अनेक आदिवासी जमातींमध्ये युवागृहं असतात; तिथं तरुण मुलंमुली आपले जोडीदार निवडतात. या प्रक्रियेत काही वेळा योग्य जोडीदार तर सापडत नाही, मात्र एखादी तरुणी गरोदर राहते. त्यामुळे समाजात वा तिच्या आयुष्यात कुठल्याही उलथापालथी होत नाहीत. पुढे ती ज्याच्याशी लग्न करेल, तोच त्या मुलाचा पिता समजला जातो. इथं ‘कायदा’ सुरू होतो आणि निसर्ग दुय्यम ठरतो.
 
पुत्रांचे बारा प्रकार मनूने सांगितले आहेत, त्यातला हा ‘क्षेत्रज’ नावाचा एक प्रकार. फक्त यात बृहस्पतीची संमती नव्हती आणि तो आजारी वा नपुंसकदेखील नव्हता; मात्र पत्नीकडे ‘दुर्लक्ष’ केल्यामुळे तिने स्वत:हून स्वत:साठी योग्य पुरुष निवडला होता.

क्षेत्र म्हणजे स्त्री दुय्यम ठरली आणि क्षेत्राधिपती असलेला पुरुष प्रथम स्थानावर आला, ते नांगराचा शोध लागून शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर, हे आपण आधीच्या लेखात वाचलेलं आहेच. गरोदर स्त्रिया, मुलं, साठवलेलं अन्न व पाळलेली जनावरं यांचा टोळीरक्षक ते कुटुंबप्रमुख, यजमान, मालक अशी पुरुषाची भूमिका निश्चित दिशेने विकसित होत गेली. तिच्यात आजही फारसे बदल झालेले नाहीत.
 
 kavita.mahajan2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...