आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकानं बोली केली काशीला न्‍यायाची !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.
 
 
लेकीची जात खायाची जायाची, लेकानं बोली केली काशीला न्यायाची अशी एक दळणावेळच्या ओव्यांमधली ओवी आहे. मुलगी माहेरी खाऊनपिऊन मोठी होते आणि सासरी निघून जाते. तिची पुढची सारी कर्तव्यं सासरघरची. मुलगी नव्हे, तर मुलगाच वृद्धावस्थेत आपल्याकडे लक्ष देणार, आपली काळजी घेणार, आपल्याला तीर्थयात्रा घडवणार आणि शेवटी मेल्यावर आपले अंत्यसंस्कार करणार; मुलगाच आपला वंश चालवणार, कुटुंबाचं रक्षण करणार, घराण्यातली धार्मिक कार्यं करणार या भावनेने पुत्रमाहात्म्य अतोनात वाढलं. शेतीभातीची कामं असोत वा लहानमोठा उद्योग–व्यवसाय, तो स्त्रिया काही पुरुषांइतकं समाधानकारकपणे करू शकणार नाहीत, त्यामुळे तो वारसादेखील मुलाकडेच जाणार, असे अनेकविध मुद्दे पुरुषांचं पारडं जड करत गेले आणि हळूहळू स्त्रीच्या पारड्यात काही शिल्लक राहील की नाही, अशी सार्थ शंका वाटू लागली. 
 
 
वैदिक युगाच्या शेवटच्या टप्प्यात अाणखी एक कल्पना विकसित झाली; तिच्यात तीन ऋणं सांगितली होती, पैकी एक होतं पितृऋण. हे पितृऋण फेडायचं तर पुत्र जन्माला घातला पाहिजे! या कल्पनेमुळे शास्त्रकार पुत्राचा अमाप गौरव करू लागले. तप, अभ्यास, यज्ञयाग, दान इत्यादी सर्व मुद्दे मागे पडून ‘पुत्र’ हा पर्याय प्रचंड लोकप्रिय झाला. पुत्र जन्माला घालण्यात ना काही कष्ट होते, ना कसलं नुकसान. गरोदरपण, बाळंतपण बायको सोसणार. तिला पुत्र झाला नाही, तर तो तिचाच दोष; त्यात पुरुषाचा थेंबभर दोष नाही; असा महान अवैज्ञानिक गैरसमज आणि पुत्र झाला नाही वा बाळंतपणात बायको मेली, तर दुसरी – तिसरी – चौथी सहज उपलब्ध! मग तप वगैरे करून ज्ञान मिळवणं, दान करून पुण्य मिळवणं, कष्ट करून कर्जं / ऋण फेडणं हे उद्योग करण्याची गरजच काय? पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मागा आणि प्रार्थना करा! या आशीर्वाद आणि प्रार्थनेत पुढच्या काळात भर पडली ती चतुर्थीकर्म व पुंसवनासारखे अनेक संस्कार, गर्भाधानासारखे विधी आणि व्रतं यांची. अग्निहोत्र्यासच करता येण्याजोगे अाणखी काही याग पुत्रप्राप्तीसाठी संहिता व श्रौतसूत्रे यांमध्ये सांगितलेले आहेत. या काळात ‘उत्तम संतती’ या शब्दांचा अर्थ संकुचित होऊन तो ‘पुत्र’ इतकाच बनून राहिला. पुत्रकामेष्टीसारखे यज्ञ सुरू झाले. राजा दशरथाने हा यज्ञ केल्याचा उल्लेख रामायणात आहेच. “पुत्र नाही, म्हणून मी दुःखी आहे. मला कसलेच सुख नाही,” असं दशरथानं आपल्या पुरोहिताला म्हटलं होतं. 
 
रामायणातलीच अाणखी एक कथा युवनाश्वाची आहे. त्याला पुत्र नव्हता; म्हणून त्यानं राज्याचा त्याग करून वनवास पत्करला. तो वसिष्ठमुनींना कळवळून सांगतो की, “माझ्या मागून माझ्या पितरांना पिंड मिळणार नाहीत म्हणून माझे मातापिता आता स्वधेचा संग्रह करण्यात गुंतले आहेत. ते पुरेसं अन्नही ग्रहण करत नाहीत. माझ्यानंतर त्यांना पाणी द्यायलाही कोणी नाही, या विचाराने ते आजच मी दिलेलं पाणीदेखील आपल्या उष्ण निःश्वासांनी कोमट करून पीत आहेत.” (रघु. १.६६.६७.७१) अनन्तः पुत्रिणो लोकाः। नापुत्रस्य लोकोऽस्तीति श्रूयते। (वसिष्ठ धर्मसूत्र १७.१२) याचा अर्थ असा की, पुत्र असणाऱ्यांनाच स्वर्गप्राप्ती होते व पुत्र नसणाऱ्याला नाही, असं श्रुतीत सांगितलेलं आहे. असे कित्येक दाखले कर्मठ मतं घट्ट करत नेत असतातच. पुत्र हा पित्याला नरकात जाण्यापासून वाचवतो आणि पितरांचे आत्मे पुत्रांनी पिंडोदक दिल्यावरच सुखी व संतुष्ट होतात; या कल्पनेमुळे पत्नीला पुत्रच व्हावयास हवा आणि तो होत नसेल तर त्याला केवळ तीच जबाबदार, असं गृहीत धरून तिच्यावर दडपण आणणं, पुत्र न झाल्यास त्रास देणं, हेटाळणी करणं, दुसरं लग्न करणं असे प्रकार केले जाण्यास सुरुवात झाली. एखाद्याला पुत्र नसणे, ही मोठी दुःखदायक बाब मानली गेली. पुत्र देणाऱ्याच पत्नीचं महत्त्व कुटुंबात व समाजातही मानलं जाऊ लागलं; केवळ मुली जन्माला घालणारी पत्नी व वांझ स्त्री घरीदारी सर्वत्रच बिनमहत्त्वाच्याच नव्हे तर तिरस्कृतदेखील ठरल्या. हा तिरस्कार इतका वाढला की, तिनं रांधलेलं अन्नदेखील ‘दूषित’ असतं असं मानलं जाऊ लागलं. जो अशा अन्नाचा स्वीकार करील, त्याचं आयुष्य कमी होईल, अशा लोककथाही निर्माण झाल्या आणि तिची स्वयंपाकघरातली मर्यादित सत्तादेखील संपुष्टात आली. 
 
‘जिकडे आली वांझ तिकडे गेली सांज’  किंवा ‘सवत साहिना व मूल होईना’ अशा म्हणींमधून स्त्रीच्या वंध्यत्वाची हेटाळणी केलेली दिसते.‘ज्याच्या पदरी पाप, त्याला मुली आपोआप’  ही म्हणही मुलगा आणि मुलगी यांच्यात किती टोकाचा भेदभाव केला जातो, हे स्पष्ट दाखवून देणारी आहे. 
 
- कविता महाजन,वसई
kavita.mahajan2008@gmail.com
बातम्या आणखी आहेत...