Home | Magazine | Madhurima | Kavita Mahajan writes about history of women

लेंकि मीचि: आणि लेंकुही मीची

कविता महाजन, वसई | Update - Sep 26, 2017, 03:00 AM IST

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल

 • Kavita Mahajan writes about history of women
  भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.
  जिवंतपणी म्हाताऱ्या माणसांकडे नीट लक्ष द्यायचं नाही आणि मृत्यूनंतर मात्र गावजेवणं घालायची, या थोतांडाची टवाळी आता वाढली आहे; हे एक चांगलं लक्षण आहे. तीन मुलगे असलेल्या एका वृद्ध जोडप्याने आपण देहदान-अवयवदान करणार असल्याचं इच्छापत्र मध्यंतरी मला दाखवलं आणि घरात नियमित धार्मिक कर्मकांडे, यात्रा वगैरे करणाऱ्या व्यक्तींनी असा ‘व्यावहारिक आणि कालसुसंगत’ निर्णय घ्यावा याचा नवलमिश्रित आनंदही झाला. परंपरांचं अनेक शतकांचं मनावरचं ओझं उतरवणं खचितच सोपं नसतं.
  पितृतर्पण / पिंडदान हे अधिकार केवळ पुत्रांकडे दिले गेल्याने अनेक शतकांचे कैक सामाजिक घोटाळे निर्माण झाले. पुत्र नसलेल्या व्यक्तींसाठी नियोगासारखे पर्याय अगदी अल्पकाळ टिकले; नंतर दत्तकाचा पर्याय आला. पित्याने मुलीचे लग्न करून द्यावे व तिच्या मुलाने, नातवाने आपल्याला पिंड द्यावा अशी व्यवस्था करावी, अशीही एक पद्धत पूर्वी प्रचलित होती. पण धर्मशास्त्रांनी असे सांगितले की, “ यामुळे तो पुत्र आपल्या पित्याचा उरत नाही, तर आजोबांचा पुत्र होतो व नंतर त्याने आपल्या पित्याला पिंडदान केलेले चालत नाही.”
  या पद्धतीला असा विरोध करून ती संपुष्टात आणली गेली आणि मुलीचा उरलासुरला अधिकारही नाहीसा झाला.
  वेदकाळात स्त्रिया प्रेताबरोबर स्मशानात जात. एखादा गृहस्थ मरण पावला तर त्याच्या पत्नीने केस मोकळे सोडून अंत्ययात्रेत चालत जावं असा संकेतही होता. ती थोडा वेळ चितेवर चढून पतीशेजारी बसे अथवा निजे आणि मग बाकीच्या स्त्रिया तिला उतरवून घेत व तिच्या जागी सोन्याचा तुकडा ठेवत. यातूनच पुढे अतिरेक होत सतीप्रथा रुजवण्यात आली. ब्रह्महत्येसारखी काही गंभीर पापं केसांचा आश्रय करून राहतात, अशा एका विचित्र कल्पनेतून केशवपन सुरू झालं. अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीने उदकातून सहा प्रायश्चित्तं सोडून क्षौर करण्याची प्रथा रुजली. स्त्रियांनी अंत्यसंस्कार करणं बंद झालं, तरीही एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिने केशवपन करण्याची पद्धत मात्र कायम राहिली आणि ते पूर्वी एकदाच करायचे असे ते तिला कुरूप ठेवण्याच्या हेतूने (ज्यामुळे अजून कुणी पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ नये) कायमच करत राहण्याचा नियम निर्माण करण्यात आला. त्यामुळे दीर्घकाळ विधवा स्त्रियांच्या वाट्याला त्यांचा काहीही दोष नसताना अजून एक अवहेलना आली.
  वेदपूर्व काळात तर मृताचे दफन करण्याचीच पद्धत होती; यज्ञयागांमुळे अग्नीचं महत्त्व वाढत गेल्यानंतर दहनाची पद्धत रूढ होत गेली. दहनानंतर पत्नीने, मुलाने वा जवळच्या अन्य नातलगाने पाण्याचा कुंभ भरून घेऊन उलट्या तीन प्रदक्षिणा घालत पाण्याची धार पाडावी, असं वैखानस गृह्यसूत्रात (५.५) सांगितलं आहे. यावरून त्या काळात अंत्यसंस्कारात स्त्रियांचा सहभाग कसा, किती होता हे ध्यानात येतं. बौधायन पितृमेधसूत्रात तर अनेक जागी ‘यच्चाऽत्र स्त्रिय आहुस्तत्कुर्वन्ति’ म्हणजे “स्त्रिया जे जे सांगतील ते ते करावे” असं नोंदवलेलं आहे. अस्थी गोळा करण्याचं कामही वृद्ध पुरुषांनी व स्त्रियांनी करावं असं म्हटलेलं आहे.
  पुढील काळात यात बदल झाले. अनेक ‘उच्च’ जातींमधल्या स्त्रियांनी अंत्यसंस्कारावेळी स्मशानात जाणंही अमान्य होतं; त्याच वेळी काही ‘नीच’ मानल्या जाणाऱ्या जातींमध्ये मात्र स्त्रिया स्मशानात चिता रचणं, प्रेताला अंघोळ घालणं, तूप चोपडणं, लहान मुलं मृत्यू पावली असतील तर खड्डे खोदून दफन करणं इत्यादी कामं ‘जातीनिहाय कौटुंबिक व्यवसायाचा भाग’ म्हणून करत होत्या; आजही करतात. अशी कुटुंबं मुलाबाळांसह स्मशानातच वास्तव्य करतानाही दिसतात.
  अंत्यसंस्कार करतानादेखील स्त्री-पुरुष भेद आहेतच. स्त्रीला पायांकडून अग्नी द्यावा व पुरुषाला डोक्याकडून अशीही ब्राह्मणांच्या काही पोटजातींमध्ये मध्ये पद्धत होती / आहे. (पुंस शिरोदेशे स्त्रिया: पाददेशेऽग्निं प्रज्वाल्य). विधवेच्या प्रेताचं तोंड झाकून अंत्यसंस्कार करण्यासाठी नेतात. तिचा अवमान मृत्यूनंतर देखील संपत नाहीच. लीळाचरित्रात आउसाची एक कथा येते.
  एकदा सोमवतीला पिंडदान करणाऱ्या लोकांना पाहून तिला वाटतं, “लेंकि मीचि : आणि लेंकुही मीचि : बापुडीं पितरें लुलातें असति मा”. माझ्या आईवडिलांसाठी मीच मुलगी आणि मीच मुलगा आहे, असा सुंदर साक्षात्कार तिला होतो. मनातले भेद सुयोग्य विचारांनी निवळतात. मग ती पिंडदानासाठी आवश्यक असलेलं साहित्य जमा करते. तिची इच्छा जाणून चक्रधर उपाध्यांकरवी पिंडदान करवतात आणि सांगतात “आउवेचें पींडप्रदान एथौनि चरितार्थ गा”. आउसेला पिंडदानाचा अधिकार मिळवून देण्याचा त्यांचा हा निर्णय फार महत्त्वाचा आहे. (उत्त. ८१). दीक्षिताची कन्या व उपासनीयाची सून असलेली आउसा इथूनच ‘माहात्मी’ म्हणवली जाते, कारण तिच्या मनातला स्त्रीपुरुष भेदभाव आता समूळ उपटला जाऊन तिथं समानतेचं बीज रुजलेलं असतं. यापुढे चक्रधर तिला ‘नाएका’ या नावाने संबोधतात.
  मधल्या काही शतकांमध्ये आउसेच्या लेकी अदृश्य होत्या; आता गेल्या काही वर्षांपासून त्या पुन्हा दिसू लागल्या आहेत. मुलीने अंत्यसंस्कार केले, हा आता कुजबुजीचा – चर्चेचा – वादाचा विषय होत नाही; समाजाने ते स्वीकारले आहे, हे समानतेच्या वाटेवरचं एक चांगलं लक्षण आहे.
  kavita.mahajan2008@gmail.com

Trending