आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्या आले पाणी। पराया घरी जाता।।

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


बारा वर्षं घरी। लेकीचा लाड होता।
डोळ्या आले पाणी। पराया घरी जाता।।    

 

वरापेक्षा वधू लहान (यवीयसी) असावी असे अनेक ग्रंथांत (गौ. ४.१; वसि. ८.१ इत्यादी) सांगितले असून त्याचा अर्थ वयाने लहान आणि उंचीने ठेंगणी असा मिताक्षरेने सांगितला आहे. पसंत करावयाची मुलगी भ्रातृहीन नसली पाहिजे असा नियम बऱ्याच ग्रंथांत सांगितला आहे (मानव गृ. १.७.८; मनु. ३.११; याज्ञ. १.५३). तथापि तो नियम शेकडो वर्षे तरी पाळण्यात येत नाही. या नियमाच्या मागे बरीच मोठी ऐतिहासिक घटना आहे. प्राचीन काळी जेव्हा एखाद्या मनुष्याला पुत्र नसे तेव्हा त्याला आपल्या कन्येची पुत्राच्या जागी योजना करता येई म्हणजे ती कन्या त्याची पुत्रिका होत असे आणि त्या कन्येबरोबर विवाह करणाऱ्या मनुष्याबरोबर तिच्या पित्याला असा करार करता येत असे की, त्या मुलीला होणारा पुत्र हा त्या मुलीच्या पित्याचा पुत्र होईल आणि तो आपल्या आईच्या पित्याला त्याच्या सख्ख्या मुलाप्रमाणे पिंड देईल. अशा रीतीने त्या मुलीला होणारा पुत्र आपल्या (जनक) पित्याला पिंड देत नसे आणि त्या पित्याच्या वंशाची परंपरा न चालविता मातेच्या पित्याचा पुत्र बनून त्याचा वंश चालवी. याकरिता भ्रातृविहीन (बंधू नसलेली) कन्या कोणी पसंत करीत नसत. मध्ययुगीन काळात या निषेधाकडे हळूहळू दुर्लक्ष करण्यात येऊ लागले आणि आधुनिक काळात तर भ्रातृविहीन कन्येचा पिता श्रीमंत असला तर ती कन्या लोभ उत्पन्न होण्यासारखी होऊन बसली आहे. मध्ययुगीन काळात असा समज होता की, अविवाहित स्त्रीला स्वर्गप्राप्ती होत नाही आणि त्यामुळे जिला स्वर्गाची इच्छा असेल अशी कोणतीही मुलगी अविवाहित राहणे शक्य नाहीसे झाले होते. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. १९७) स्त्रीपुरुषांमध्ये कायदेशीर प्रकाराने पतिपत्नीचे नाते निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पद्धती म्हणजे विवाह होय, अशी विवाहाची स्थूलपणे व्याख्या करता येईल. (केतकर, श्रीधर व्यंकटेश; महाराष्ट्रीय ज्ञानकोश, खंड २०, पृ. २४३)  मुलीच्या विवाहाच्या वयाचा इतिहास वेदांपर्यंत मागे नेल्यास काय आढळते? पुराव्यांवरून असे दिसते की, वैदिक काळात बालविवाह रूढ नव्हता. ऋग्वेद (१०.८५) आणि अथर्ववेद (१४.१२) यांतील मंत्रांवरून स्पष्ट दिसते की, त्या काळातले वधू-वर प्रौढ असत. वैदिक काळातील विवाह वधू वयात आल्यानंतर होत याचा चतुर्थीकर्म हा पुरावा मानता येईल.


 सुश्रुताने म्हटले आहे की, ज्याच्या वयाला पंचवीस वर्षं पूर्ण झालेली नाहीत अशा पुरुषाने जिच्या वयाला सोळा वर्षं पूर्ण झालेली नाहीत अशा स्त्रीच्या ठिकाणी गर्भाधान केले, तर तो गर्भ स्त्रीच्या उदरात मरून जातो; तो जन्माला आलाच तर फार काळ जगत नाही आणि जगलाच तर इंद्रिये दुर्बल असलेल्या अवस्थेत तो जगतो. म्हणून अत्यंत बाला अशा (सोळा वर्षं पूर्ण न झालेल्या) स्त्रीच्या ठिकाणी गर्भाधान करू नये. (सुश्रुतसंहिता शारीरस्थान, १०.५७.५८). वेदकाळातील हे चित्र बदलत बदलत स्मृतिकाळात मुलीचे विवाहाचे वय रजोदर्शनापूर्वी इतके कमी झाले. “बारा वर्षांची झाली म्हणजे स्त्री व्यवहारास योग्य होते... त्यानंतर दांपत्यधर्माचे पालन न केल्यास स्त्रीला बारा पण दंड करावा’ असे कौटिल्याचे (इ.स.पू. ३००) मत आहे (कौ. अर्थ. ३.३.१). मुलीचे रजोदर्शन सुरू होण्यापूर्वीच तिचा विवाह करावा आणि जो पिता असा विवाह करणार नाही, तो दोषी ठरतो या गौतमाच्या (इ.स.पू. ५०० वा ६००) मताचाच पुढे वसिष्ठ धर्मसूत्र (१७.७०.७१) आणि बौधायन धर्मसूत्र (४.१.१२) यांनी पाठपुरावा केला. मुलीच्या प्रत्येक रजोदर्शनाच्या वेळी पित्याला भ्रूणहत्येचे पाप लागते असे त्यांनी सांगितले. हाच विचार याज्ञवल्क्य (याज्ञ. १.६४) आणि नारद यांनीही मांडला. या धर्मादेशांचे परिणाम समाजावर झाले आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून मुलींचे बालविवाह होऊ लागले. अकराव्या शतकातील प्रवासी अल्बेरुणी याच्या प्रवासवर्णनात वधू बारा वर्षांची असते हे निरीक्षण नोंदवलेले आहे. 


लीळाचरित्रात विवाहाच्या वयाचा स्पष्ट उल्लेख असणारी लीळा आहे. साधेच्या मुलीविषयी बोलणे निघते त्या वेळी चक्रधर म्हणतात, सातां वरिखाचा नोवरा : पांचां वरिखाची नोवरी : दाहा वरिखाचा नोवरा : सातां वरिखाची नोवरी : मग : कोडे कवतिकें : वीवाहु कीजे : (उत्त. ११७). साता किंवा पाचा वरिखांची नोवरी हे केवळ ब्राह्मण जातीपुरतेच मर्यादित असावे असे मानायला जागा आहे. 


गाहासत्तसईच्या काळात मुलगी मोठी झाल्यावर लग्ने ठरवली जात, पण वडीलधाऱ्या मंडळींनी जमवलेल्या त्या विवाहात वधूची पूर्वसंमती घेतली जात नसे. आपल्या नियोजित वराचे नावही तिला वरगीतातील रचनेवरून समजायचे. 


बालविवाहाच्या प्रथेमुळे अशिक्षित, अल्पवयीन व अननुभवी असलेली स्त्री पत्नी म्हणून पतीच्या घरात जाऊ लागली. तिथे पतीशी मित्रत्वाचे नाते या तिन्ही गोष्टींमधील अंतराने शक्य होत नसे. पुरुषाची स्वामित्वभावना यातूनच वाढत गेली आणि पत्नीचे रूपांतर दासीत होत गेले. आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असणे आणि त्याच्याकडून संरक्षण व सुविधा हव्या असणे, यांमुळे लाचारी वाढत गेली. पती हाच परमेश्वर ही भावना लहानपणापासूनच, माहेरी व सासरीही, मनात रुजवली गेल्याने ती पतीचे सर्व अधिकार मानत राहिली. मात्र पतीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या मात्र त्या प्रमाणात महत्त्वाच्या राहिल्या नाहीत.


- कविता महाजन, वसई
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...