आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटी तू गाणे गासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाणे एकटे गात आहोत, असे वाटले तरी बाजूने दुसरा शब्द, दुसरा सूर उमटत असतो आणि हळूहळू ते समूहाचे गाणे होऊन जाते. तसंच स्त्रीजीवनाचा इतिहास बघताना किती स्वर एकत्र आले आणि त्यातून काळाच्या पटावर काय उमटले, हे या सदरातून जाणून घेणार आहोत...

जनाबाईचा एक सुंदर अभंग आहे :
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें । जनी म्हणे धन्य झालें ॥४॥

जनाबाई मला आवडते, त् याचे मुख्य कारण म्हणजे तिचा हा सकारात्मक दृष्टिकोन. त्यामुळे नवे सदर सुरू करायचे ठरवले, तेव्हा शीर्षकासाठी तिचीच अर्धी ओळ उसनी घेतली. ‘स्त्रीजन्म म्हणोनि न व्हावे उदास’ या ओळी दर वेळी अनेक अर्थांची वलयं मनात निर्माण करतात. 

भारतीय समाजजीवनात स्त्रीचे एक निश्चित व विशिष्ट स्थान आहे. ‘स्त्री-शूद्रादिक’  या शब्दप्रयोगातून ते ध्यानात येते. संस्कृतिकोशातल्या एका नोंदीत असे लिहिलेले आहे की, “शूद्र आणि अस्पृश्य यांच्याबरोबर स्त्रीच्या बाबतीतही समाज असाच हळूहळू क्रूर व नीतिशून्य होऊ लागला. एकंदर स्त्रीजातीलाच त्याने शूद्र ठरवून टाकले. त्यामुळे तिच्यावर किती बंधने घालावी, तिची किती निंदा करावी, अवमान करावा, याला ताळतंत्रच राहिला नाही.” (भारतीय संस्कृतिकोश, खंड पाचवा. पृ. १५८)

हिंदू समाजात मोक्ष हे मानवाचं अंतिम प्राप्तव्य मानलं गेलं आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष. परमार्थज्ञान किंवा परमेश्वरी कृपा यांमुळे तो मिळतो. आणि हे ज्ञान वा ही कृपा बौद्धिक ज्ञान/तर्क/कर्मकांड यांमुळे प्राप्त होत नसून त्यांच्या प्राप्तीसाठी योगाभ्यास, तपश्चर्या, मनोनिग्रह, वासनाजय व वैराग्य आवश्यक असतात. इंद्रियांचे संयमन केल्यानेच तप घडते, अन्यथा नाही. (इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा । - महाभारत, वन २११.१८) 

योगवासिष्ठात असे म्हटले आहे की,
यस्य स्त्री तस्य भोगेच्छा निःस्त्रीकस्य क्व भोगभूः।
स्त्रियं त्यक्त्वा जगत् त्यक्तं जगत् त्यक्त्वा सुखी भवेत् ।।

याचा अर्थ असा आहे की, ज्याला स्त्री आहे, त्यालाच भोगाची इच्छा होते; ज्याला स्त्रीच नाही, त्याला भोगाची इच्छा कुठून होणार? ती शक्यताच त्याला उपलब्ध नसते. त्यामुळे स्त्रीचा त्याग केला, तर ते जगाचा त्याग केल्यासारखे असते आणि जगाचा त्याग केल्याने त्याला सुख मिळते.

स्त्रीकडे पाहण्याचा भारतीय समाजाचा असा जो पारंपरिक दृष्टिकोन होता, तो समजून घेण्याआधी सुरुवातीपासून सुरुवात करू... म्हणजे आधी ‘आदिमाते’चे दर्शन घेऊ. आपल्या पेशीच्या ऊर्जाकेंद्रात मायटोकाँड्रिया नावाचं डीएनए असतं. त्याचा आणि वडलांचा काही संबंध नसतो; ते आपल्याला फक्त आणि फक्त आईकडूनच मिळतं. त्यात प्रत्येक काळात झालेले बदल साचत जातात. या डीएनएच्या मदतीने शास्त्रज्ञांनी माणसाचे मूळ शोधण्यास सुरुवात केली. हे संशोधन एकांगी नव्हतं, तर त्याला विविध शास्त्रांचा आधार होता. माणसाला मृत्यूनंतर जाळलं वा पुरलं तरी त्याची हाडं आणि दात शिल्लक राहतात. उत्खननात सापडलेल्या पुरातन हाडं आणि दातांमधलं डीएनए शास्त्रज्ञांनी तपासलं आणि त्यातले बदल निरखले. दगडांवर ज्या किरणोत्साराच्या परिणामांच्या नोंदी झालेल्या असतात त्या तपासल्या. इतर प्राण्यांचे अवशेष, गुहाचित्रं, पुरातन हत्यारं तपासली. भूगोलाचाही एक इतिहास असतोच. तो अभ्यासत किती हिमयुगं पृथ्वीवर येऊन गेली, याचा धांडोळा घेत काळाचा वेध घेतला. आणि मग दीड ते दोन लाख वर्षांपूर्वीच्या आफ्रिकेत आदिमाता होती, हा शोध लावला. आज वेगळे वंश, वेगळे वर्ण, वेगळे जातिधर्म दिसत असले; तरी या सगळ्या वेगवेगळ्यांची आई एकच होती. तिच्या लेकी, नाती, पणती कुठेकुठे पांगल्या पृथ्वीभर आणि जागोजाग तिचा वंश वाढत गेला. 

मातृसत्ता आणि मातृसत्ताक पद्धत असे शब्द आपण बरीच वर्षं वापरतो आहोत; पण इथं ‘सत्ता’ हा मुद्दाच नव्हता; कारण स्त्रियांनी पुरुषांवर सत्ता प्रस्थापित केली, असं कधी घडलं नव्हतं. समाज निर्माण होण्याच्या प्रक्रियेत त्यांना आदराचं स्थान मिळालं, मान मिळाला, त्याची कारणं निराळी होती. मूल जन्माला येण्याच्या प्रक्रियेतली गूढता वारे-पाऊस-वणवे यांविषयीच्या गूढतेसारखीच होती. मुलांच्या लालनपालनाची जबाबदारी घेत ती आपला कळप सांभाळू लागली. मुलं जगावीत, वाढावीत म्हणून अन्न गोळा करणं, साठवणं, रांधणं यांच्या पद्धती तिने शोधल्या. वनौषधी शोधून आजारांवर उपचार केले. मग शेतीचाही शोध लावला. अशा मातेविषयी आदराचं स्थान समाजमनात निर्माण होणं आणि त्यातून तिच्या हाती निर्णय घेण्याच्या, न्याय देण्याच्या, निवाडा व वाटप करण्याच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार येणं, ही त्या पुरातन काळातली एक ‘नैसर्गिक’ गोष्ट होती. त्यामुळे ‘मातृसत्ता’ऐवजी ‘मातृवंश’ हा शब्द वापरणं उचित. तोच पुढे सर्वत्र वापरू या.
बातम्या आणखी आहेत...