आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डळमळीत कुटुंबसंस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पितृसत्ताक कुटुंबसंस्था डळमळीत झाली असली तरी तिची जागा घेणारी नवी व्यवस्था समाजाच्या दुटप्पी मानसिकतेमुळे अजूनही निर्माण झाली नाही. परिणामी कुटुंब आणि विवाह यांच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रिया सुटे, लहान-लहान विद्रोह करतात; त्यांना कुटुंब हवंही असतं आणि नकोही.

एकत्र कुटुंब पद्धत चांगली की, विभक्त कुटुंब पद्धत, असा प्रश्न जाहीर विचारला तर लोक सहसा ‘एकत्र कुटुंब चांगलं’ असं सरसकट म्हणतात; कारण ते ‘आदर्श’ असं लहानपणापासून मनावर बिंबवलं गेलेलं असतं. पण विभक्त वा लहान कुटुंबाचा एकत्र कुटुंबात राहणाऱ्यांना बहुतेक वेळा हेवा वाटतो आणि ते आपल्या सुटकेची संधी शोधत असतात. प्रत्येक पिढीगणिक एका जोडप्याला किती मुलं असावीत ही संख्या कमी होत जातेय. पणजीच्या पिढीत दहाहून अधिक मुलंही असत. आजीच्या पिढीत त्यांची संख्या चार-पाचवर आली. आईच्या पिढीत तीन मुलं हा आदर्श आकडा होता; क्वचित मुलगा हवा या हव्यासाने चौथं मूल जन्माला घातलं जाई. 

माझ्या पिढीत दोन, खरंतर महानगरांत राहणाऱ्या कुटुंबात एकच मूल पुरे, हा विचार आला. त्यानंतरच्या पिढीत डबल इन्कम नो किड्स हे वाक्य कानी पडू लागलं. ‘आई आणि मूल’ या दोघांचंच एक कुटुंब असण्याच्या आदिम काळापासून ‘नर-मादी’, ‘मादी –मादी’, ‘नर-नर’ अशी दोन व्यक्तींच्या जोडप्याचीही ‘परिपूर्ण’ असणारी कुटुंबं दिसू लागली; या कुटुंबांनादेखील विवाहाची आवश्यकता आहेच अशी अट उरली नाही किंवा वेगळ्या लैंगिकतेच्या पायावर आधारित असलेलं गे / लेस्बियन जोडपं आवर्जून ‘लग्नाचा हक्क’ मागू लागलं. लैंगिक नैतिकतेच्या मुद्द्यावर गंडणारे संसार आणि मोडणारी वा निदान विस्कटणारी कुटुंबं ते लैंगिकतेच्या पायावर निर्माण झालेलं कुटुंब असा हा प्रवास अनोखा आहे. कुटुंबाचे नियम, कुटुंबातील सदस्यांची एकमेकांविषयीची कर्तव्यं, कुटुंबाची सामाजिक कर्तव्यं हे सारं या वेगळ्या कुटुंबांनाही लागू होतं; त्यांची लढाई कायद्याशी, समाजाशी आहे पण ती ‘आम्हांला सामावून घ्या’ यासाठी.

चार पिढ्या एकत्र नांदणारी कुटुंबं भारतात आजही अस्तित्वात आहेत. जवळ जवळ वेगळी घरं करून विभक्त कुटुंबं बनली तरी एका वस्तीत राहणारीही मुबलक आहेत. शहरीकरण, स्थलांतर जिथं वाढतंय तिथं कुटुंबाचे आकार लहान होत गेलेले आहेत आणि ‘एकत्र कुटुंबातील फायदे’ त्यांना ‘सेवा’ म्हणून विकत घ्यावे लागतात. तोट्यांची संख्या बघता ते त्यांना परवडतंदेखील. पाळणाघर ते वृद्धांच्या निवासी कॉलन्या असे अनेक समांतर पर्याय प्रत्येक टप्प्यावर टीका होत होत नकळत रुळले. भाजीपोळी केंद्रं रुळली. 

कुटुंब आणि जात ही जोडी होती तोवर कोणत्या कुटुंबाने परंपरेनुसार कोणतं काम करायचं याचे नियम होते; त्यांची काळाच्या ओघात मोडतोड झाली आणि पारंपरिक कौशल्यं शिकण्याची गरज संपल्याने कुटुंबप्रमुखाचं आसन डळमळीत झालं. तरुणांना कामाचं वाटप करून देणं, त्यांच्याकडून काम करवून घेणं, हिशेब ठेवणं, आर्थिक निर्णय घेणं इथपासून कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठीचं शिक्षण, लग्न, मुलं, व्यवसाय – नोकरी, प्रवास, धार्मिक कृत्यं इत्यादी जीवनातील प्रत्येक मुद्द्याबाबतचे निर्णय कुटुंबप्रमुख घेत आणि त्यांना विरोध करणं, नकार देणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. कुटुंबप्रमुख सहसा पुरुष असत; क्वचित प्रसंगी घरातल्या वृद्ध स्त्रियांनी हे पद ‘आडून’ भूषवले आहे. 

कुटुंबाची परंपरा, रूढी, धार्मिक कर्मकांडं, भाषा, वेशभूषा, कुलाचार, श्रद्धा, कुलधर्म, आचारविचार ‘निश्चित’ असत आणि ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचं काम प्रामुख्याने घरातल्या जेष्ठ स्त्रिया करत. अगदी जेवण्यासाठी ताट कसं वाढायचं किंवा केसांचा भांग कसा पाडायचा अशा लहानसहान गोष्टींपासून कुटुंबातल्या विविध नात्यांच्या स्त्रियांनी वागण्याकरण्याचे अत्यंत बंदिस्त नियम होते. मोठी कुटुंबं ही ‘आर्थिक एकक’ असल्याने त्यात विधवा, परित्यक्ता, वृद्ध, अपंग, आजारी स्त्रियांना ‘आश्रय’ मिळायचा खरा; मात्र सर्व प्रकारच्या सेवा त्या बदल्यात त्यांना द्याव्या लागत. काही वेळा कुटुंबातील पुरुषांकडून लैंगिक अत्याचारदेखील होत. कुटुंबातल्या मूळ सदस्य असलेल्या स्त्रियांनाच आवाज नव्हता, तर आश्रित स्त्रियांनी ब्र कुठून उच्चारावा? वय हाच मान देण्याचा निकष असल्याने कर्तृत्व आणि गुणवत्ता असे मुद्दे गौण ठरत. कुटुंबामुळे स्थैर्य मिळतं, असं वरवर दिसलं तरी सुमार आणि दुबळी माणसं कुटुंबात खपून जात; मात्र ज्यांना कालबाह्य झालेल्या परंपरा मोडाव्या वाटतात, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे वाटतात, प्रचलित चौकटीबाहेर जाऊन काही वेगळं शिकावं – वेगळं काम करावं वाटतं, नवा विचार आणि नवे उपक्रम हवेसे होतात त्या पुरुष सदस्यांचीदेखील कुटुंबात दडपणूक होई... मग स्त्रियांचा विचारच करायला नको. त्यांचं जगणं तर शेकडो व्रतवैकल्यं, कर्तव्यांचे काच आणि चूलमूल यांतच चिणलं गेलं होतं.
 
आता ‘स्त्रिया’ असा शब्द मी या लेखांमध्ये सरसकट वापरते आहे; मात्र ‘सर्व जातींच्या स्त्रिया’ अशा तपशीलात आपण नंतर जाणार आहोत. उपलब्ध लेखी माहिती प्रामुख्याने ठरावीक उच्च मानल्या जाणाऱ्या जातींच्या स्त्रियांबाबतच उपलब्ध आहे आणि इतर माहिती जसजसे जातीजमातींचे इतिहास लिहिले जाताहेत तसतशी समोर येते आहे. त्यामुळे इथला ‘स्त्रिया’ हा शब्द मर्यादित अर्थानेच घ्यावा लागेल. तथापि आर्थिक उतरंडी पाहता वरच्या वर्गाचे अनुकरण खालच्या वर्गांमध्ये होत राहिल्याने जसजसा आर्थिक स्तर वाढत गेला तसतसं अनुकरणाचं खूळ वाढून सवर्ण जातींखेरीज इतर अनेक जातींमध्येही स्त्रियांवरील बंधनं वाढली. त्याचे तपशील पुढील लेखांमध्ये पाहूच. 

पितृसत्ताक कुटुंबसंस्था डळमळीत झाली असली तरी तिची जागा घेणारी नवी व्यवस्था समाजाच्या दुटप्पी मानसिकतेमुळे अजूनही निर्माण झाली नाही. परिणामी कुटुंब आणि विवाह यांच्या कचाट्यात अडकलेल्या स्त्रिया सुटे, लहान-लहान विद्रोह करतात; त्यांना कुटुंब हवंही असतं आणि नकोही. मालिकांमधून दिसणारं आदर्श एकत्र कुटुंब आणि विस्कळीत कुटुंबाचा वास्तव अनुभव यांचा मेळ कसा घालावा, याचं चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होण्यास अजून एखादी पिढी जावी लागेलच.
 
- कविता महाजन, वसई
बातम्या आणखी आहेत...