आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर कर करा आणि मर मर मरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

गुहा, ढोल्या, खडकांच्या खोबण्या, बिळं-खड्डे करून राहणं यानंतर बांबू/लाकूड/ गवत वापरून झोपड्या बनवणं सुरू झालं. हे कामही बायकांनीच केलं. आपापल्या प्रदेशातल्या हवामानानुसार त्यांनी घरं बांधण्याच्या पद्धती शोधल्या आणि त्या हळूहळू विकसित करत नेल्या. उदाहरणार्थ कांगोमधल्या पिग्मी स्त्रिया लवचिक झाडं वापरून घरं बांधतात. काही लाकडं जमिनीत गोलाकार पुरून एकीने वर्तुळात थांबून आमोरासमोरची झाडं वाकवून जुळवून धरायची आणि बाहेरच्या दुसरीनं त्यांना झाडांच्या सालींनी बांधायचं भरपूर पाती/ पानं असलेल्या फांद्या बांधून दाराची लहान जागा मोकळी सोडायची. पावसापासून संरक्षण छान होऊ लागलं. झाडं, पात्यांच्या विणलेल्या चटया, प्राण्यांची मोठी कातडी हे घरबांधणीचं प्रमुख साहित्य होतं. आणि स्थलांतर करताना यातलं काही उचलून न्यायचं असेल, तर ती ओझी बायका घेत. पुरुषांच्या हातात हत्यारं, अवजारं असत. पुरुषांनी मोकळं राहणं त्या काळी आवश्यक होतं, कारण त्यामुळेच ते सतत सावध राहून शत्रूचा वेध घेऊ शकत व शिकारही करू शकत. एस्किमोंची घरं स्त्री-पुरुष दोघंही मिळून बनवत. बर्फाचे ठोकळे करून आणून देणं हे काम बायकांचं आणि ते रचून घर बांधण्याचं काम पुरुषांचं. 

बर्फाळ भागात कातड्यांचे कपडे, प्राण्यांच्या आतड्यांचे दाेरे बनवून शिवून वापरले जाऊ लागले. त्यात बायकांचे कपडे त्यात त्यांचं मूलही मावेल अशा आकाराचे व पद्धतीचे असत. मुलाचं डोकं बाहेर दिसे आणि बायकांचे हात मोकळे राहात. दुसरा पर्याय झाडांच्या सालींचा होता. सैबेरियासारख्या भागांत सामन माशांची कातडीही वापरली गेलेली दिसते. कातडी, साली वापरून कान, डोकं झाकणाऱ्या टोप्याही बनवल्या जात. त्या सजवल्याही जात. कातडी साफ करण्याचं काम बहुतेक जागी बायका करत. चरबी काढायला धारदार शिंपले वापरत आणि कापायला दगड. हाडांच्या वेढेवाल्या सुयाही एस्किमोंकडे सापडलेल्या आहेत. दोर वळवून त्यांचे अनेकविध उपयोगही सुरू झाले. तराफे, होड्या, कुत्रागाड्या या गोष्टी मात्र पुरुषांनी शोधल्या; त्या त्यांच्या शिकार कामाच्या उपयोगी येणाऱ्या होत्या. होड्या वल्हवण्याचं काम स्त्रियाही करत. खाण्यायोग्य कीटक जमवणं, मध जमवणं, भाल्यांसारख्या टोकदार काट्यांनी जमिनीत खोल असलेले तीन-चार फूट उंचीचेही कंद खोदून काढणं, पक्ष्यांच्या घरट्यांमधून अंडी मिळवणं, खाण्यायोग्य फळं, मुळं, पानं, फुलं, जमवणं असं त्यांचं मुख्य काम होतं. यात त्या हळूहळू तज्ज्ञ होत गेल्या. पदार्थ सुकवणं, खारवणं, वाफवणं इत्यादी करत टिकवून पावसाळा, हिवाळा या ऋतूंची बेगमी करून ठेवू लागल्या. जिथं शिकार अधिक तिथं मांसाहार प्रमुख राहिला आणि शेतीयोग्य जागांमध्ये माणसं मिश्राहारी बनली. पुढील काळात कट्टर शाकाहारी लोकांचेही गट तयार झाले. 

ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी स्त्रिया टोकदार दगडांपासून बनवलेल्या कुऱ्हाडी अगदी गेल्या शतकापर्यंत वापरून सरपण गोळा करत. झाडांच्या साली अलगद सोलून काढून त्यांचा भांड्यांसारखा वापर करत. अमेरिकेतल्या शोश्मेने ताम्र-स्त्रिया दगडी कुऱ्हाडी स्वतः बनवत. जाळी विणण्याचं काम प्रामुख्याने पुरुष करत. हे किचकट असेच. आजही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी ससे पकडण्यासाठी प्रचंड मोठी जाळी कशी तास न‌् तास विणत बसतात, हे मी पाहिलेलं आहे.

शिकारीसाठी खड्डा, कुंपण, जाळी, पिंजरे, पाण्यातले बांध अशी कौशल्यं विकसित झाली. यातलं मासेमारीचं काम प्रामुख्याने स्त्रिया व मुलं करत. ती मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा आजही मासेमारी करण्यासाठी पुरुष जात असले तरी विक्रीची कामं स्त्रियाच करताना दिसतात. मोठी शिकार खेचून, वाहून नेण्याचं कामही स्त्रियाच करतात.

विविध अणकुचीदार हत्यारं, विषारी बाण, त्यासाठीची अनेक प्रकारांची विषं तयार करण्याचे प्रयोग, शिकारी करण्यासाठीच्या अनेक क्लृप्त्या पुरुषांनी शोधल्या. यातही स्त्रियांचा विशिष्ट कामांमध्ये सहभाग असायचाच. जास्त कौशल्याची कामं विशिष्ट व्यक्तींनाच साधत. त्यातून सुईणी, वैदू, पुजारी असे व्यवसाय निर्माण झाले. आपलं ज्ञान योग्य व्यक्ती शोधून, तिच्या असंख्य परीक्षा घेऊन मगच तिला दिलं जाई. नात्यांमधले गुंते निर्माण होण्यास सुरुवात झाली तेव्हा आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वारसा आपल्याच मुलांना देणं सुरू झालं. त्यातही विवाहानंतर मुली सासरी जाण्याची प्रथा रुळू लागल्यावर मुलींना या शिक्षणापासून दूर ठेवलं जाऊ लागलं. तरी त्यांना नकळत मिळणारं ज्ञान असेच, मात्र त्याची वाच्यता वा उपयोग करण्याची परवानगी नसे. यातून काही स्त्रिया बंड करून कुटुंबातून, कुलातून बाहेर पडू लागल्या आणि आपल्या ज्ञान व कौशल्याच्या आधाराने स्वतंत्र जगू लागल्या. वैद्यक आणि व्यापार ही त्यांची दोन प्रमुख क्षेत्रं होती. विदुषी, संशोधक, अभ्यासक व कलावंत स्त्रियांनीदेखील पुढील काळात असेच अनेक विद्रोह केले.
- कविता महाजन, वसई
 
बातम्या आणखी आहेत...