आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Mahajan's Article About CM's Absenty At Pansare's Funeral

मॉडेलिनींचा र्‍याम्पवाक आणि म्हाराष्ट्राचे मुखेमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉ. पानसरेंच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहता मुख्यमंत्र्यांनी नागपुरातल्या फॅशन शोमध्ये हजेरी लावली... ही गोष्ट बदलापूरवासीयांना फारच जिव्हारी लागली...
ड्रिंकरटेलरचं घर कम् दुकान ह्ये त्येला लकवा मारल्यापासून बदलापुरातल्या लोकांचा येक अड्डा बनल्येला होत्ता. तसंही गावात मधोमध येकच झाड, त्येला येकच पार... त्यो कोणाकोणाला पुरा पडणार? ड्रिंकर टेलरलायबी बरं वाटायचं. येळ दोस्तांमध्ये बरा जायचा. आक्षय आप्लं दुकान सांबाळायचा. ड्रिंकर टेलरची बायको ब्लाउज्जांची काजबटणं उर्फ हुकंआकडे करायची दुकानातच बसून. पोरावरही लक्ष राहायचं, कामय व्हयाचं.

श्रीदेवीनं आल्याआल्या जोशीबुवा ज्योतिष्यवालेंना विच्चारलं, “ह्ये ऱ्याम्पवाक काय ऱ्हातेय वो?”
“कामून विचारणं चाल्लंय? का आता तुलेबी मॉडेलिंग करायचं हये?” संकऱ्या वायरमननं उलट विच्चारलं, “आधीच येवढाल्या फ्याशनी करत्ये, कस्ली कस्ली खिडक्यादरवाज्यांची ब्लाउज्जं घालत्ये... आता ऱ्याम्पवाक त्येवडाच बाकी ऱ्हायलाय...”
“सांगा की... आसं काय कर्ता?” श्रीदेवीनं लाडात येत संकऱ्याच्या गालावरनं करंगळी फिरवली. संकऱ्याला येकदम आपण लाइटीच्या खांबावर टोकाला बसून वायरी गुत्ताळ्यात अडकलेलोत आसं वाटू लागलं. त्याची बोल्ती बंद झाल्यावर श्रीदेवी परतून जोशीबुवांकडे वळला.
आक्षय म्हण्ला, “त्या मॉडेलिनी नाय का फळकुटावर आस्ते आस्ते चालत्यात. त्यो आस्तो ऱ्याम्पवाक.”
“त्या छोटे छोटे कपडे घालून...” प्रभंजनकुमार एंट्री घेत म्हणाला.
“छोटे आसंनात का मोठे आसंनात... घरीदारी येरवाळीला कोण्णीच घालत नाई आस्ले कपड्ये आस्त्येत त्ये. म्हणून तर बगायला जमत्येक नाई का लोकं?”
“त्ये कापडं?”
“कापडं... आणिक कापडांमदून गुंडाळूगुंडाळू बाकी ऱ्हायलेली स्पेस... ती स्पेस बी लै म्हत्वाची ऱ्हाती म्हणे. कोणच्याही बाईला विचारा...’ स्पेस पायजे... स्पेस पायजे’ म्हणत्यात बाया... त्ये ह्येच आस्णार.”
“श्रीदेवी, यवड्या चवकशा कामून करून ऱ्हायलाय बे? बदलापुरात फ्याशन शो घियाचा हये की काय? खंडमाले गुत्तेदार स्पॉन्सर क्रून ऱ्हायलाय काय?”
“नाय बा, आस्लं काई नाई,” श्रीदेवीनं खुलासा क्येला.
“आरं बाबा, नागपुरात येक कस्तुरचंद पार्क हये म्हणं. थित्तं कालच्याले येक फ्याशन शो झाला म्हणं. थित्तं लै मोठमोठ्या झिरो फिगरीवाल्या मॉडेलिनी आल्या व्हत्त्या म्हणं...”
“आसं तर चालतच ऱ्हातेय. मुंबईत तर रोजच्यालेच आसं काई काई ना काई आस्तंय. त्यात नवलाचं काय?” प्रभंजनकुमारनं विच्चारलं.
“नाई. नवलाचं इशेष काई नाई. आमी समदे देविदास अमृततुल्य चहाच्या हॉटेलीत बसून अमृतरावच्या सासऱ्यानं देल्हेल्या छप्पन्न इंची फ्ल्याट टीव्हीवर त्ये कोल्हापुऱ्यातल्या म्हताऱ्याचं मयत बगत हुतो. त्येला गोळ्या घालून मार्ला ना त्येचं. लै पब्लिक हुतं बाबौ.”
“ऱ्हाणारच बाबा ऱ्हाणारच. पर कुटं कोल्हापूर, कुटं नागपूरचा कस्तुरचंद पार्क. काई सांगड लागना गड्या.”
“आत्ता ग बाई, तुमी मला गड्या म्हणू नका ना गडे संकरर्राव...”
करंगळीच्या भीतीनं संकऱ्या वायरमननं गाल खर्रकन आक्रसून घिटला आणि ख्येकसून म्हण्ला, “सर्रळ सांग की काय त्ये? नमनाले घडाभर तेल कशाले वाया घालवते?”
“त्येच तर सांगून ऱ्हाइलेय ना. तर मयताच्या गरदीत आमी शोदत हुतो का आपल्या म्हाराष्ट्राचा मुखेमंत्री जाकीट घालून कुटं दिस्तोय का. नागपूरचे लोकं तर जाकीट घालो ना घालो जाकीट घातल्यावानी वजनाचेच दिसत्यात आणि कंच्यायबी गर्दीत वळखू येत्यात.”
“आता बोलशील का काय झालं त्ये?” प्रभंजनकुमार वैतागला. ब्रेकिंग न्यूजच्या आशेने त्याचे कान टवकारले होते, नाकपुड्या फुरफुरू लागल्या व्हत्या.
श्रीदेवीनं येकदाचं पत्ता टाकला. म्हण्ला, “तर मुखेमंत्री कस्तुरचंद पार्कात त्या झीरो फिगरवाल्या मॉडेलिनींचं ऱ्याम्पवाक आटेन्ड्ड करीत व्हते म्हणे...”
“हां... हां... त्ये व्हय! म्हणजे बदलापुरात मुखेमंत्र्यानं याव वाटत आसंल तर कोणी म्हतारं गोळ्या लागून मरण्यानं फायदा व्हयाचा नाई. त्येवडा येक ऱ्याम्पवाक आरेंज क्येला की काम व्हईल. इत्कंच ना!” बदलापुरातले कंच्याही सभ्येचे पर्मनंट आध्यक्ष आरुण गवळी उर्फ आरुणआप्पा सावळे काठी आपटत सभा आटोपती घ्येत म्हण्ले!

kavita.mahajan2008@gmail.com