आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kavita Mahajan's Atirical Column ‘badlapurchi Bakhar’

आमचा आरूण गवळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा सासरा म्हण्जे... आता कसं सांगाव न्येमकं... म्हण्जे बघा, तुम्ही आरुण गवळीचा फोटो बघला आसंल ना? तसल्याच अंगकाठीचा हाय अगदी आणि मिशा मात्र छपरी! बशीत वतून चाय प्यायली का अर्द्या मिशा च्यात बुडत्यात. डोळे येकदम गटाणे. पण बदलापुरात त्यायचा वचक हये. आरुणअप्पा सावळे म्हून कोणाही पोरासोराला इचारलंत, तरी तो आमच्या वाड्याच्या दिशेनं बोट दाखवंल, तेबी मोडून... आणि इरागतीला आल्यागत धूम ठोकंल. खरं तर निस्तं आरुणअप्पाबी पुरे व्हतंय; मला आपलं आमचं आडनाव आवडतंय म्हणून सांगंल.


आता सास-याचा वचक असण्याची कारणं काय निस्ती पैशा-अडक्याची नाईती. त्यो गावात आजून पाच-सात लोकांकडेई हये. शेतीवाडीचंही तसलंच. वचक असल्याच्या कारणांपैकी येक म्हत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या सास-याचयनी दोन बायका क्येल्या. कायद्याले जुमानलं नाई, सासू नं. येकला जुमानलं नाई, सासू नं. येकच्या बापाला आणि भावान्लापण जुमानलं नाई.
दोन बायका येका घरात सांभाळणं दुरून मज्जेचं वाटतंय... आत काय सजा आस्तीय हे ज्याचं त्यालाच माईती. वरपांगी कितीबी ज्योक क्येले लोकायनी, तरी आतून सगळे टरकून हुतेच का आता आप्पाचा बाप्पा कदी विसर्जनाला निगतो!


आता आमच्या बदलापुरातला अडवळणे सावकारच बघा ना. त्यानं दोन लग्नं क्येली. पहिलीला पोर होत नाही म्हणून दुसरी क्येली. आणि आधी पहिलीलाच झालं, त्यानंतर मग दोन वर्षांनी दुसरीला झालं. आलटून पालटून एकेकीला सोबत न्यायचा... कुठं काय लग्नकार्य किंवा काय आसलं तर.
दुसरीला वाटू लागलं का माझा नवरा माझ्याहून म्हातारा दिसून राह्यलाय. याचे केस पिकाय लागलेत. बरोबरच्या पोरींच्या नव-यांची झुलपं बघा कशी आणि याचं हे असं. पण केस रंगवायला सांगलं तर रागवायचा. मग तिनं एक युगत शोधली. रात्री नवरा खोलीत आला की आधी त्याच्या डोक्याला तेलमालीश करायची. डोईला तेल घालताना तिनं आयडियानं येकेक पांढरा केस उपसून टाकाय सुरुवात केली.


याचा पत्ता काही दिवसांतच पहिल्या बायकोला लागला. कसा? कोणतीही शिरीयल बघणारा आसले प्रश्न विचारणारच नाई. बाई आईला सगळं मोबाइलवर सांगणार आणि दुसरी ते चोरून आईकणार, हे सर्वज्ञात हये. तर तिनं बक्कळ विचार केला आणि शेम आयडिया शोधली. नवरा ज्या रात्रीला तिच्या खोलीत यायचा, तेव्हा तिनं पण त्याच्या डोईला तेल घालणं आणि केस उपटणं सुरू क्येलं. फरक इत्काच की ती त्याचे काळे केस उपटू लागली. म्हणजे नवरा आपल्याच बरोबरीचा दिसावा.


तर तेव्हापासून अडवळणे सावकार ‘टकल्या सावकार’ म्हणून पंचक्रोशीत फ्येमस झाला.
उंचाड्या असल्यानं त्याला येके काळी बदलापुरातला अमिताभ म्हणून वळखायचे. ख-या अमिताभची गोष्टच वायली. जया आणि रेखाच्या भानगडीतही त्याचे केस जागेवर राहिले. ‘पा’मध्ये टकलाचा टोप लावला म्हणतात त्यानं.
आणि आमचा बदलापुरातला अमिताभ आता केसांचा टोप लावतो. तेही दोन टोप आणावे लागले त्याला. पहिलीसोबत पांढ-या केसांचा आणि दुसरीसोबत काळ्या केसांचा.


आमच्या आरुण गवळीची हालत काय हुतीय ह्ये बघायला आख्खं बदलापूर डोळे लावून बसलं होतं. पण कुठं आरुण गवळी आणि कुठं अडवळणे सावकार! फोलपटाची दाण्याशी तुलना होईल का कधी?
आमच्या आरुण गवळीचं मन दोघींनी भरलं तर काय सांगायचं हुतं? आळंदीला दर्शनाले गेले हुते, तिथं जिवाले कट्टाळून जीव देयाला आलेली बाई याच हीरोला भ्येटावी ना? तीबी गोरीगोमटी, द्येखणी आशी की अख्ख्या गावानं आस्ली बाई फक्त शिनेमातच पायली हुती आणि शिनेमातल्या बाया काई ख-या थोडकीच आसत्यात? आस्ली पांढ-या धोप रंगात गुलाबाची फुलं चुरडून घातलेल्या रंगाची बाई! परतेक्ष? येकेकाची बुबुळं टणाटण डोळ्यांतून भायेर घरंगळली आणि बाई वाड्यात दिसेनाशी होईतो रस्त्यावर तिच्यामागं घरंगळत ग्येली.
आरुण गवळी सुज्ञ! आस-याले आलेल्या बाईशी लगीन करून इजाबिजातिजा कशाले करायचं? येक तरी बाईल दयेत राह्यली पायजे. बायको दयेत -हाणं आशक्य. मग हिला आशीच ठेवून घियाचं ठरलं.
बाकी कोणाला सांगणार? सुने बोले बायकोला लागे! तसं मलाच गरजून म्हणले, ‘ही लग्नाची नाई, तरी हिला मान लग्नाचीचाच देयाचा. पाया नाई पल्डीस तरी चालंल, पण म्हणताना सासूबाईच म्हणायचं!’
मी मान डोलावली.
तर ही सासू नं. तीन.