आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंघणेदादाला दणका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सक्काळधरनं बदलापुरातली लोकं लै वैतागली होती. तसं तर ह्ये आजकाल रोजचंच झालं होतं, पण आज बापाच्यानं कहर झाला. कोंघणेदादा बदलापुरात परत आला होत्ता. यिवून म्हयना झालेला. दोन वरषं त्येचं घर रिक्कामं पल्डं होतं. शेत ओसाड झालं होतं. दुकानांना टाळे लागले होते. अर्थात तरीपण लोकं तिकडचा बारका दगडसुद्धा उचलून नेत नसत की शेतात दोन आंब्यांची झाडं होती, त्याची येक कैरी कोणी पाडत नसे. कोंघणेदादाची भुताखेतासारखी भीती वाटत होती आसं नाही, पण त्याच्याकडचं काईपण कोणालापण पचणार नाही, आसं बदलापुरात सगळ्यांना वाटायचं. दोन-चार वेळा बोलाफुलाला गाठ पडली आसल, पण त्यामुळे हे पक्कं झालं.
येकडाव त्यानं जोशीबुवा ज्योतिष्यवालेंना पूजा सांगायला बोलावलं. कितीयबी राग धरला आसला, तरी कोंघणेदादाला नाही म्हणायची बदलापुरात कोणाची हिंमत नव्हती. जोशीबाईंनाही सोबत जावंच लागलं, कारण सवाष्ण-ब्राह्मण जेवायला घालायचं होतं, तर दुसऱ्या कोणाला कशाला बोलवायचं म्हणून यांनाच सांगलेलं. जोशीबुवांनी पूजा सांगली. जेवणखावण झालं. कोंघणेदादांनी दोन जेवणांचे पयसे पूजेच्या पैशांमधनं वळते करून घिटले आणिक येकच घंटा पूजा सांगिटली आणि मंत्रपण गेल्या साली म्हटलेलेच शिळेपाके याही साली म्हटले आणि सत्यनारायणाची गोष्टपण गेल्या साली सांगिटलेलीच शिळीपाकी याही साली सांगिटली, तर काही नवं क्नॉलेज मिळलं नाही, नवं मनोरंजनपण झालं नाही आणि हेही आम्ही गेल्या सालचं जेवण या साली न द्येता नवं ताजं जेवण द्येऊन आसं क्येलं, तर सगळे पैसे आसल्या सोत्ताले अपग्रेड न करणाऱ्या लोकायले कामून देयाचे, म्हणून आर्धेच पयसे देल्हे.

सालाबादप्रमाणे पुन्यांदा श्रावण आला आणि न्येमके श्रावणातच कोंघणेदादा परतून आले, या म्हाईतीनं जोशीबुवांना घाम फुटला. जोशीबुवांसारखीच थोडीबहुत खराब हालत बदलापुरातल्या प्रत्येकाची होती. बोलावणं आलं की जावंच लागायचं, नाही म्हणता येयाचं नाही, काम बिघडवून तर आज्जिबात चालायचं नाही. काम कोंघणेदादाच्या कड्डक, तीक्ष्ण नजरेच्या धाकात होयाचं. आस्सं कर, तस्सं कर आयकून कान किटून जायाचे. काम पूर्ण झालं की, कोंघणेदादा बारकाईनं दोष आणि त्रुटी शोधायचे. आगपाखड करून निम्मे पयसे हातावर ठिवून चालता करायचे. सगळे निस्ते दातओठ खात हैराण होत आपसात खुसफूस करायचे.
पण जोशीबुवांनी यंदा लैच मनाले लावून घिटलं आणि काहीतरी उपाय शोधलाच पाह्यजे, ह्ये फिक्स क्येलं. प्रभंजनकुमार,ड्रिंकर टेलरचा पोर्गा आक्षय, श्रीदेवी हिजडा, संकऱ्या वायरमन सग्ळेच तोंड पाडून बस्ले होते. तेवढ्यात तिथं शिवायला टाकलेली शंकरपाळी खिडक्यांच्या पाठीची ब्लाउज्जं घिऊन जायले आस्मिता टिचर आली. तिनंई कुरबुर क्येलीच का, “कोंघणेदादा पोराच्या ट्युशनच्या नावाखाली पोराचं सगळं होमवर्क करून देयाला लावायलेत, उद्या परीक्षापण तुम्ही द्येवा म्हटले तर काय बाई करायचं? आत्ताशिक पोर्गं तिसरीत हये, तर ही तऱ्हा. दहावीपस्तोर आसा त्रास काढायचा म्हणजे लैच झालं. तुम्ही काहीतरी मार्ग काढा जोशीबुवा.”
जोशीबुवा उपरणं झटकत उठले आणि म्हटले, “चला, कुंथलगिरीकर महाराजांकडे!”
दुसरे दिवशी सक्काळी आधी आक्षय टेलर दोन ब्लाउज्जं घिऊन कोंघणेदादांच्या घरला ग्येला. म्हटला, “च्येक करा, डिझाईन-गिझाईन फस्क्लास हये की नाही? मणी-मोती-लोलकं कमी नाही ना? तुम्हाले कशाले येयाची तसदी म्हून सोत्ताच घिऊन आलो.”
कोंघणेवह्यनींनी ब्लाउज्ज हिसकावून घिटली. म्हणल्या, “आस्ली चव्चाल डिझाईनींची ब्लाउज्जं मी कधीपास्नं घालायला लाग्ले रे? कोणाची चुकून आण्लीसा की काय?”
“वह्यनी, आस्ली गफलत माज्याकडनं कद्धीच व्हणार नाही. कोंघणेदादाच दिवून गेल्ते सोत्ता. चांग्लं फ्याशनेबल बनव म्हण्ले. तुमाले सरप्राइज देयाचं आसंल त्यांले.” आक्षय साळसूदपणे म्हण्ला.
“ही तर माझी साइज नाहीय्ये”, कोंघणेवह्यनींचा पारा संशयाच्या शिडीवरून झपाझपा वर चढला. कोंघणेदादा गांगरले. आपण कधी आक्षय टेलरकडे ग्येलो होतो आणि ते पण ब्लाउज्जं शिवायला टाकायला? कोंघणेवह्यनींनी तोंडाचा जो काही पट्टा सुरू केल्या होत्ता, त्याफुडं त्यांना काही बोल्ताही येईना.
“शिलाई द्या. मी जातो मंग. बाकी तुम्चं तुम्ही बघा. दोन हज्जार!” आक्षयनं सांगिटलं.
काहीच न सुचून कोंघणेदादांनी हज्जार-हज्जाराच्या दोन नोटा काढून त्याच्या हातावर टिकवल्या.
तेवढ्यात फातिमा शिष्टर आली गर्जत. येताना फाटकाजवळ निजलेल्या कुत्र्याच्या शेपटीवर तिचा पाय पडला आणि ते शेपूट कायमचं चपटं झालं. त्याचं केकाटणं ऐकून संतापून तिनं त्याला एक लाथ घातली आणि त्याचा आवाजही कायमचा मृदुमुलायम झाला. फातिमा शिष्टर म्हटली, “चला लौकर बेडरुमीत.”
कोंघणेवह्यनींचा आवाज गपकन बंद झाला आणि तोंड जसंच्या तसं हुगडं ऱ्हायलं. फातिमा शिष्टरनी तिच्याकडं दुर्लक्ष करून कोंघणेदादांची मानगूट पकडली आणि तरातरा त्यांना थेट बेडरुमीत घिऊन ग्येली. कोंघणेदादांना पलंगावर आदळला आणि पायजमा खसकन खेचला, तर नाडी तुटली तटकन. मागनं कोंघणेवह्यनी धावत आत आलेल्या. फातिमा शिष्टरनी पर्समधून येक इंजेक्शन काढलं. दवा भरली. सुई खुपसली. कोंघणेदादांच्या गोट्या पार कपाळात गेल्या आणि कपाळावर दोन टेंगळंयबी दिसू लाग्ली. त्यांच्या बोंबलण्याकडे दुर्लक्ष करत फातिमा म्हणली, “नको तिथं जाऊन लफडी करायला बरं वाटते ना? मग नस्ते रोग लाग्ले की दवाखान्यात येयाची लाज वाट्टे. बंद करा आता आस्ले धंदे. ह्ये मलम लावा रोज आन ह्या गोळ्या खा.”
“पण मला तर काहीच झालं नाही...” कोंघणेदादांनी गोंधळून क्षीणपणे सांगण्याचा प्रयत्न केला.
“अजून खोट्टं बोला... अजून खोट्टं बोला... लाज कशी वाटत नाही म्हण्ते मी...” कोंघणे वह्यनी भडकल्या.
“आता काय उपयोग? नवऱ्याला आधीच मुठीत ठिवायचा ना? लोकायकडून कामं करून घितो आणि नीट पयसेपण द्येत नाही... तेव्हा बोलत नाही तू. मग लोक तरी कशाला सांगतील तुला की, हा कुठं जाऊन शेण खाऊन येतोय? मलाही निरोप पाठवला यानं की, तीन हज्जार द्येतो, पण घरला यिऊन औषधं द्या.” शिष्टरनं खणखणीत आवाजात सांगितलं... ते आर्ध्या बदलापुरात ऐकू ग्येलं. नोटा मोजत ती भायेर पल्डी तेव्हा कुंथलगिरीकर महाराजांच्या चेहऱ्यावर प्रसन्न, दैवी हसू उमटलं होतं आणि जोशीबुवांनी भर रस्त्यात महाराजांना दंडवत घातलेलं होतं.
kavita.mahajan2008 @gmail.com