Home | Magazine | Akshara | kavyagrah magazine about poems, poets and feature

काव्याग्रह: काव्यसंस्कृती टिकवण्याचा आग्रह

दिव्‍य मराठी | Update - Jun 05, 2012, 10:18 PM IST

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून साहित्याची एक नवी चळवळ नुकतीच रुजू झाली आहे.

  • kavyagrah magazine about poems, poets and feature

    विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून साहित्याची एक नवी चळवळ नुकतीच रुजू झाली आहे. विष्णू जोशी या साहित्यावर आणि त्यातही कवितेवर निस्सीम प्रेम असणा-या युवकानं काव्याग्रह नावाचं त्रैमासिक इथे सुरू केलं आहे. साहित्याच्या प्रांतात सध्या सगळीकडेच केवळ कवितेला वाहिलेलं हे मासिक जाणत्या काव्यवाचकांना अश्वस्थ करतं. 2010 मध्ये सुरू झालेल्या या मासिकानं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. कवितेला वाहिलेल्या मासिकांची संख्या आपल्याकडे तशीही फार कमी आहे. अशा परिस्थितीत जोशींनी अशा प्रकारचं धाडस केलं आहे. बीएडचं शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी हे मासिक काढायचं ठरवलं आणि त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्या मित्रांनीही तेवढीच खंबीर साथ दिली. काव्याग्रह मासिक अनेक दृष्टींनी वेगळं आहे. त्याचे मुखपृष्ठं असोत उत्तम चित्रांनी नटलेली असतात, मांडणीतही नावीन्य आहे, हा अंक आपला वेगळा असा ठसा वाचकांच्या मनावर सोडून जातो. यात कवी आणि त्यांच्या कवितांचा परामर्श घेणारे साक्षेपी लेख आहेत, दर अंकाला एका मान्यवर कवीचा परिचय करून देणारे काव्याग्रहचे ‘मानकरी’ हे सदर आहे. शिवाय नवोदित कवींच्या काव्यसंग्रहांची दखल घेणारी दर्जेदार परीक्षणंही आहेत. मराठी साहित्यातील जाणत्या कवींपासून ते दमदार लेखन करणा-या नवोदित कवींच्या साहित्याची दखल येथे घेतलेली आढळते. अजीज नवाज राही, इंद्रजित भालेराव, महेश केळुसकर, अनिल धाकू कांबळी, हेमंत जोगळेकर, ऐश्वर्य पाटेकर, वीरधवल परब, प्रवीण दवणे, दासू वैद्य अशा भिन्न भिन्न प्रवृतींच्या कवींच्या कवितांशी वाचक एकाच ठिकाणी परिचित होतो. मराठीतील समकालीन काव्य संस्कृतीचं दर्शन या मासिकांतून घडतं, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
    हे मासिक चालवताना निर्मिती मूल्यांकडेही जोशींनी लक्ष दिलेलं आढळतं. उत्कृष्ट छपाई, अंकाची उत्तम मांडणी यात हे मासिक कुठेच कमी पडत नाही. काव्याग्रह आता प्रकाशनाच्या क्षेत्रातही उतरले आहे. त्यातही कवितासंग्रहांनाच त्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. त्यांच्या या उपक्रमालादेखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
    - प्रियंका डहाळे, नाशिक

Trending