आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालपणात मुलींना भातुकली खेळायला देतात. त्याच्या मागच्या समाजाचा एक उद्देश असा असतो की, मुलीला लहानपणापासून स्वयंपाकाची गोडी निर्माण झाली पाहिजे. घरी पाहुणे आले तर स्वागत करता आलं पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच त्या मुलीला एक सर्वांगीण स्त्रीच्या दिशेकडे नेले जाते. एक उत्तम स्त्री होण्यासाठी तिला थोडं थोडं खतपाणी द्यावं लागतं. दारासमोर असलेल्या झाडाला अचानक कळी येते व लक्षात येतं की, झाड मोठं झालं. वास्तविक पाहता येजा करताना ते रोप रोजच दिसते, पण जेव्हा त्याला फूल येतं तेव्हा ते लक्षात येतं.
मुलगी लहानाची मोठी होते, तेव्हा समाजबंधनात, परंपरेत अडकायला लागते. ती महाविद्यालयात प्रवेश घेते तेव्हा तिला मित्र-मैत्रिणी मिळतात. आजकाल अनेक मुली सर्रास फेसबुक वा व्हॉट्सअॅप वापरतात. माझं मत आहे की, आज संगणकीय युगात आपण प्रवेश केला तर हे वापरायलाच हवं. पण कधी असंही होते की एखादी मुलगी ते वापरत नाही तर तिचे मित्रमैत्रिणी तिची टिंगल करतात. तसं करणं वाईटच ना. पण म्हणतात ना, काळाबरोबर आपल्यालाही बदलायला हवं. आपण अनेक वेबसाइट्सवर जातो, कुठेकुठे बंधनं असतात म्हणजे स्वत:चा फोटो टाकू नये वगैरे. तरी काही मुली फोटो टाकतात. काही घरी बंधनं असतात, जसे घरी दिलेल्या वेळात ये. कुठे जायचे असल्यास दहा प्रश्न विचारले जातात. मुलींना वाढत्या वयात या गोष्टी फार कंटाळवाण्या बोचणा-या वाटतात. म्हणजेच घरच्यांना आपण केलेल्या कुठल्याही गोष्टीचा त्रास होतो, अशी धारण त्यांच्यामध्ये निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच झालेला मित्र अगदी जवळचा वाटायला लागतो. आईवडील वैरी वाटायला लागतात.
आजकाल आपल्या आवडीनिवडीचे, राहणीचे, कपड्याचे भान राहिले नाही. स्वातंत्र्याच्या आधारावर वाटेल तसे घट्ट पारदर्शक कपडे घालून पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करणे हे तरुणीचे ध्येय असेल तर ते मला चुकीचे वाटते.
अजूनही मुलीला बघायला जाऊन दहातील एक याप्रमाणे मुलांची पसंत करण्याची पद्धत आहे. पण मुलीला मात्र ज्याच्याबरोबर तिला संपूर्ण आयुष्य काढायचं असतं, ज्या कुटुंबाबरोबर राहायचं असतं, तिथे जाऊन बघण्याचासुद्धा अधिकार नसतो. त्याचप्रमाणे प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांमध्येही त्याला ती विवाहापूर्वी जीन्समध्ये आवडते, पण लग्नानंतर मात्र वेशभूषेवरून वाद व्हायला लागतात. पुरुषाला मैत्रीण असली तर चालेल, पण स्त्रीला मित्र तर सोडाच, पण तिने परपुरुषाशी बोललेलंसुद्धा पतीला आवडत नाही.
मला वाटतं की, आईशी मुलीचं नातं अगदी मैत्रिणीप्रमाणे असावं. जेणेकरून ती आपली सुखदु:खं, कॉलेजच्या गमतीजमती आईबरोबर शेअर करेल आणि तिला प्रेम, सुरक्षितता यापासून वंचित राहावं लागणार नाही.
शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, परिस्थिती असुरक्षित असेलही, पण निभवायचं कसं आणि लढायचं कसं, हे आता आपल्याला शिकायला हवं. मस्त एन्जॉय करायचं आणि स्वत:लाच म्हणायचं ‘तू जी ले जरा...’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.