आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिजात साहित्याची दखल घेणारे नियतकालिक : खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगेश नारायण काळे हे स्वत: नव्वदोत्तरीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. त्याहीपेक्षा ते एक साक्षेपी संपादक आहेत. ‘खेळ’ नावाचे नियतकालिक ते चालवतात. 2004 मध्ये ‘खेळ’ चा पहिला अंक प्रकाशित झाला. आतापर्यंत ‘खेळ’ चे 22 अंक प्रकाशित झाले आहेत.
खेळ हे नियतकालिक उत्कृष्ट छपाई, आकर्षक मांडणी, वेगळे मुखपृष्ठ आणि दर्जेदार मजकूर यामुळे वाङ्मयीन क्षेत्रात आपला दबदबा राखून आहे. मंगेश काळे यांनी भारतीय नियत-अनियतकालिकांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे नियतकालिकाच्या काही मर्यादाही त्यांना जाणवल्या आहेत. अनुकूलता असूनही वाङ्मयीन नियतकालिकांची समृद्ध परंपरा आज उतरणीला लागलेली दिसते.
विशेषत: मराठीत तर ही उतरण मोठी आहे. ही उतरण भरून काढण्याचा ‘खेळ’च्या माध्यमातून मंगेश काळे प्रयत्न करत आहेत. खेळ चा प्रत्येक अंक दर्जेदार असतो. पाहताक्षणीच तो हातात घ्यावा वाटतो. पहिल्या अंकात आपली भूमिका मांडताना त्यांनी सुप्रसिद्ध कवी विष्णू खरे यांचे एक ‘कोटेशन’ दिले होते. जिथे जिथे वाईट कविता दिसते ती कविता नाकारण्याचा मी प्रयत्न करेन. खेळने आवर्जून चांगल्या कवितेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक चांगले कवी प्रकाशात आले.
खेळचे वैशिष्ट्य असे की ते केवळ मराठी कथा, कविता, समीक्षापर्यंत मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या भाषेतील उत्तम साहित्य अनुवाद करून छापले. कवितेबरोबर इतर कला प्रकारांना त्यांनी स्थान दिले. त्यामुळे जगभरातील लेखन जसे खेळमध्ये येत आहे, तसे दृश्यकला, चित्रकला, संगीत यावरही अनेक लेख येतात. प्रत्येक अंकात एक मुलाखत हे खेळचे दुसरे वैशिष्ट्य सांगता येईल. मराठी लेखकांच्या मुलाखतीव्यतिरिक्त जागतिक लेखकांच्या मुलाखतीसुद्धा या अंकातून घेतल्या जातात. खेळ 2011 च्या दिवाळी अंकात या वर्षीच्या साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते स्वीडिश कवी टॉमस ट्रान्स्टोमर यांची दीर्घ मुलाखत छापली आहे.
याशिवाय के. सच्चिदानंदन या भारतीच कवींची नोबेलसाठी नामांकन झाले होते, त्यांच्याही कविता खेळमध्ये येतात. खेळने वेळोवेळी विशेषांक काढलेले आहेत. त्यापैकी सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, दिलीप चित्रे यांच्यावर काढलेले विशेषांक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरले आहेत. नव्वोदत्तरी कवितेवरच्या विशेषांकात कवितेच्या वेगवेगळ्या अंगांनी केलेला उहापोह महत्त्वाचा आहे. खेळच्या 23 व्या अंकाची तयारी झाली असून हा विशेषांक ‘राजा ढाले’ विशेषांक असणार आहे.
राजा ढाले हे दलित चळवळीतले एक महत्त्वाचे कार्यकर्ते कवी आणि विचारवंत आहेत. राजा ढाले यांच्या साहित्याने मराठी साहित्यात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. हा विशेषांक महत्त्वाचा ठरेल. एकंदरीत वाङ्मयीन नियतकालिकांमध्ये एक वेगळा ठसा ‘खेळ’ने उमटवला आहे. याचे सारे श्रेय संपादक मंगेश काळे यांनाच आहे.