आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त दिवस जगताना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेझेंटेशन चालू आहे. देहबोलीच्या सगळ्या क्लृप्त्या आकाश वापरतोय. तेवढ्यात डेस्कवरचा त्याचा फोन व्हायब्रेट होतो. ‘राखी’ नाव पाहून तो कट करतो, तो पुन्हा प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करतो आणि प्रेेझेंटेशन संपवतो. बाहेर येत फोन करतो तर पलीकडून राखी रडवेल्या आवाजात ओरडते, ‘आकाश लवकर ये घरी... निषादला शॉक लागलाय. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलंय...’

आकाशला लवकर जाग येते. आजच्या प्रेझेंटेशनचं टेन्शन. ते चांगलं झालं, तर त्याच्या कंपनीला कोट्यवधी रुपयांचं काम मिळेल आणि आकाशला प्रमोशनही. पेडर रोडवरील इमारतीत फ्लॅट, कार, पेेट्रोल बिल, टेलिफोन, मोबाइल बिल आणि तीन वर्षांत एक फॉरेन टूर विथ फॅमिली. कंपनीत रुबाब वाढेल तो वेगळाच. त्याला जाग येण्याची वाट पाहत असल्यासारखं राखी ‘गुड डे’ विश करते आणि तो म्हणतो, ‘थँक्स. म्हणजे, आज माझं प्रेझेंटेशन चांगलं होणार.’

ती हसत म्हणते, ‘होणारच. चल तयार हो लवकर तोवर, मी ब्रेकफास्ट करायला घेते.’ आणि तो घाईघाईत बाथरूममध्ये शिरतो.
अडीच वर्षं झालीयत त्यांच्या लग्नाला. त्यांच्या संसाराच्या झाडावर एक फूल आलंय, निषाद नावाचं, जे आता बेडरूममध्ये पहुडलंय आरामात. राखी किचनमध्ये भरभर ज्यूस बनवायला घेते. तीन दिवस झाले कामवाली बाई येत नाहीय. आज तिला फोन करायलाच हवा. विचार करताना तिला निषादचा आवाज येतो, ‘म्मा, ब्बा, ब्बा,’ आणि तिच्या ओठावर हसू येतं. छातीत ओहोळ फुटल्यासारखं होतं. एवढं ज्यूस, ब्रेड-बटर झालं की घेऊ पाजायला, म्हणत ती किचनमधनंच बेडरूममधल्या निषादशी बोलू लागते ‘उठला का माझा राजा? अले माजा शोना. मम्मा किचनमदे ए,... तू येतो का किचनमदे बाबाचा खाऊ बनवायला... ये ये ये...’ बेडरूममधनं तिच्या म्हणण्याला ‘ऊ ऊं’ असे प्रतिसादस्वर येतात आणि ती सुखावते. तितक्यात बाथरूममधनं बाहेर आलेला आकाश समोरचं दृश्य पाहून हसतच ओरडतो, ‘राखी, लवकर ये… बघ… निषाद उभा राहिलाय पायावर...
राखी धावत येते आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः आनंदाने किंचाळते, ‘आई गं… कित्ती गोड!!’ निषादही दोघांचा आनंद कळल्यासारखं खुदकन हसतो. उजवा हात उचलून त्यांना बोलवल्यागत हलवू लागतो, ‘हू हू’ करत. आकाश मोबाइल फोन उचलून कॅमेऱ्यात तो क्षण टिपणार तोच मोबाइलची रिंग वाजते. बॉसचा फोन तो मनात नसतानाही उचलतो, ‘गुड मॉर्निंग बॉस.’
‘गुड मॉर्निंग आकाश. प्रेझेंटेशन तयार झालं?’
‘हो बॉस... तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्यात त्यात.
‘पाच मिनिटांत मी तुझ्या बिल्डिंगखाली पोचतोय. सोबत जाऊ. मी पाहतो गाडीत.’
फोन कट करत आकाश म्हणतो, ‘राखी... बॉस पाच मिनिटांत खाली येतोय... सॉक्स आण.’
ती म्हणते, ‘अरे, पण ब्रेकफास्ट तर करशील की नाही?’
‘राहू दे गं... ऑफिसमध्ये घेईन काहीतरी. म्हणत आकाश घाईघाईत निघून जातो. राखी पाहते तर निषाद पुन्हा जमिनीवर बसलेला. त्या दोघांनीही तो पहिला क्षण मिस केलाय...

प्रेझेंटेशन चालू आहे. देहबोलीच्या सगळ्या क्लृप्त्या आकाश वापरतोय. पडद्यावरल्या गोष्टी क्लाएंटच्या मनात रुजवायच्या असतील, तर प्रेझेंटेशनसोबतच प्रेझेंट करणाराही प्रेझेंटेबल असायला हवा म्हणून आकाशने गेल्या कित्येक वर्षांत अनेक क्वोट्स, कविता, श्लोक पाठ करून कौशल्य मिळवलंय. समोर बसलेले नोएल दस्तूर आणि त्यांचे पाच ऑफिसर्स पॉझिटिव्ह दिसत आहेत, हे पाहून आकाश आणि त्याच्या बॉसला कळतं की, आकाशनं त्याचं काम चोख केलंय. आता त्यानंतर काही प्रश्न, शंका असतील, तर त्यांचं निरसन करण्याचं काम बॉसचं होतं. आकाशला जाणवलं की, आता अजून अर्धा तास यांना खिळवून ठेवलं की झालं. तेवढ्यात डेस्कवरचा त्याचा फोन व्हायब्रेट होतो. ‘राखी’ नाव पाहून तो कट करतो, पण थोडा डिस्टर्ब होतोच. तिला माहीत आहे की एक वाजेपर्यंत प्रेझेंटेशन चालेल आणि मग डिस्कशन मग जेवण म्हणजे, दुपारी तीननंतरच मोकळा होईन. तरी तिनं फोन का केला? ती सहज फोन करणार नाही. बोलता बोलता तो अडखळतो. त्याच्या लक्षात येतं की आपण डिस्टर्ब झालोय. तो पुन्हा प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करतो आणि प्रेेझेंटेशन संपवतो. बाहेर येत फोन करतो तर पलीकडून राखी रडवेल्या आवाजात ओरडते, ‘आकाश लवकर ये घरी... निषादला शॉक लागलाय. त्याला हॉस्पिटलमध्ये आणलंय.’
बॉस आणि दस्तूर  म्हणतात, ‘नो प्रॉब्लेम. तू जा. आम्ही डिस्कशन करतो.’
आकाश हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा राखी म्हणते अंघोळीला गेले आणि बाहेर निषादच्या किंचाळण्याचा आवाज आला म्हणून पाहिलं, तर निषाद जमिनीलगतच्या स्वीचबोर्डपाशी पडलेला. त्याचा पाय काळानिळा पडला होता. डॉक्टर म्हणतात, ‘कोवळ्या पायाला शॉक लागल्याने नसा डॅमेज झाल्यात. सॉरी टू से... योर सन मे नॉट स्टँड हियर आफ्टर…’

या गोष्टीचा शेवट काहीही असेल, पण किती सहज घेतो, आपण आपलं आयुष्य! आपल्या आसपास अप्रूप वाटावं, अशा अनेक गोष्टी घडत असतात. पण आपण त्या सहज घेत पुढे सरकतो. म्हणजे, आसपास झाडाच्या फांदीला पानं फुटता फुटता कळ्या येतात, त्यांची फुलं होतात; पण आपल्याला काहीच वाटत नाही. आपल्या आसपास ऋतू बदलतात. बघता बघता वैशाखातलं कडक ऊन मृदू करत कुणीतरी रखरखीत ढगात पाणी भरतं आणि ओतू लागतं आकाशातून. आपण कधीच ते कोण ओततंय म्हणून वर पाहत नाही. आपण पिकनिक पिकनिक ओरडू लागतो.

चंद्र रोज दररोज त्याचं रूप बदलत कधी जवळ येतो, मोठा वाटतो, तर कधी दूर जातो, लहान दिवा वाटू लागतो. आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. तारे लुकलुक करत आकाश भरून टाकतात. आपण मनापासून न पाहिल्याने मन भारून जात नाही. रातराणीचा गंध अवघा परिसर सुगंधित करून जातो, पण आपण एक क्षण थांबून त्या झाडाखाली उभं राहत नाही. एखादी चुकार चिमणी भर्रकन येत खिडकीवर बसते आणि चिवचिवत राहते, आपण तिची भाषा जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि खेळाचा तास संपलेल्या शाळेतल्या मुलांनी शिस्तीत रांग करून वर्गात जावे आणि त्याच वेळी दुसऱ्या वर्गाने रांगेत बाहेर यावे, तसे मुंग्यांची रांग येत जात असते. ही गोष्ट आपल्याला खिळवून ठेवत नाही. का?

या सगळ्या ‘का?’चं उत्तर ‘आपण समजतो की, आपण उद्याही जगणार आहोत.’ किती ठाम विश्वास असतो आपला अस्तित्वावर. आपण निरोप देताना म्हणतो, ‘चल भेटू पुन्हा.’ कुणाला वेळ देताना म्हणतो, ‘पुढल्या सोमवारी संध्याकाळी सात वाजता भेटू.’ म्हणजे आपण आपले जगणे इतके सहज ठरवत असतो की, त्यात मृत्यू या शाश्वत गोष्टीचा अंतर्भावच नसतो. आणि त्यामुळेच रोज आसपास घडणाऱ्या गोष्टींचं अनन्यसाधारण महत्त्वच आपल्याला कळत नाही.

पण समजा, कोणी आपल्याला सांगितले की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या रात्री तू मरणार आहेस तर? तर मात्र आपण हे सगळं नव्याने पाहू लागू. अगदी पहिलंवहिलं असल्यासारखं.

म्हणून रोज झोपताना हा आपला शेवटचा दिवस होता असं, समजून मी डोळे बंद करतो आणि दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर एक ‘अतिरिक्त’ दिवस आपल्याला मिळाल्याचं समाधान मला लाभतं. यामुळे आयुष्यातले कितीतरी क्षण पहिल्यावहिल्या जाणिवांसारखे अनुभवता येतात. कितीतरी दुःखी जिवांचं दु:ख नव्याने कळत जातं आणि आपण किती सुखी आहोत हे जाणवत राहतं...
 
- किरण येले
लेखक लघुकथाकार, नाटककार आणि कवी आहेत. 
लेखक संपर्क-९८६९२६०७८०
बातम्या आणखी आहेत...