आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सगळ्यात तिची चूक काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरित्रकार पीटर गे यांच्या मते, सिग्मंड फ्रॉइडसाठी स्त्री हा एक ‘डार्क काँटिनंट’ होता. गूढ आणि काहीशी भीतिदायक गोष्टही होती. पण माझ्या एका कवितासंग्रहामुळे स्त्री नावाचा अज्ञाताचा प्रदेश अवचित उजेडात आला आणि मला चकित करून गेला...

२०१० मध्ये माझा ‘बाईच्या कविता’ हा कवितासंग्रह ‘ग्रंथाली’ प्रकाशनने प्रकाशित केला. कवितासंग्रह वाचल्यानंतर वाचकांचे फोन येऊ लागले. त्यापैकी एक फोन तिचा होता.

ती म्हणाली, मला किरणताईंशी बोलायचंय. मी म्हटलं, ‘माझंच नाव किरण आहे.’ तिने प्रश्न केला, ‘तुम्ही पुरुष आहात?’
मी म्हटलं,’ का? आवाजावरून मी बाई वाटतो का?’
ती खळखळून हसली. विनोद साधा होता, पण ती इतका वेळ हसत होती, की पलीकडे मानसिक  संतुलन हरवलेली बाई तर नाही ना, अशी क्षणभर शंका आली. पण हसू आवरत, ती म्हणाली ‘छान विनोद केलात. पण या कविता एखाद्या बाईनं लिहिलेल्या वाटतात.’
मी म्हटलं, ‘खरंच आहे ते.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे,या कविता माझ्या आतल्या बाईनं लिहिल्या असाव्यात.’
‘हो. तुम्ही लिहिलंय एका कवितेत अनिमा आणि अनिमस तत्वाबद्दल.’
हं. तसंच प्रत्येक पुरुषात एक स्त्रीत्व असतं, कुठे तरी दडलेलं. त्याला अनिमा तत्त्व म्हणतात, आणि स्त्रीत पुरुष असतो दडलेला, त्याला अनिमस तत्त्व म्हणतात. म्हणूनच कधी कधी एखादी स्त्री खंबीरपणे संकटांना एकटी सामोरी जाताना दिसते आणि पुरुष हळवा होताना.  तेच असतं ते.
ते तर सायन्समध्ये लिहिलं असेल कुठे तरी, पण तुम्हाला बाई काय विचार करते हे कसं माहीत पडतं?
मी म्हटलं, ‘अहो ताई, साधं आहे हे... बाईही माणूसच आहे पुरुषासारखी. अशा प्रसंगात पुरुष जे विचार करेल, तेच तीही विचार करेल.’
ती काही क्षण थांबली आणि म्हणाली, ‘थँक्स. तुम्ही बाईही माणूसच आहे हे म्हणालात म्हणून.’ मी हादरलो. आता अंगावर येणारं काहीतरी ऐकावं लागणार होतं. ‘खरं सांगू कविता वाचून मला वाटलं, या किरण नावाच्या बाईला आपली कहाणी सांगूया. तुम्ही पुरुष आहात म्हटल्यावर विचार बदलला होता. पण, आता तुम्हाला खूप सांगावंस वाटतंय, मला आयुष्याबद्दल एक बहीण म्हणून. सांगू?’
मी म्हटलं, ‘माझ्याविषयी विश्वास वाटत असेल, तर जरूर सांगा. जमेल तितकी मदत मी करण्याचा प्रयत्न करेन.’
 
‘मी आई-बाबांची एकुलती एक मुलगी.’ तिनं सांगायला सुरुवात केली, ‘दिसायला रेखीव आणि सुंदर. नुकतीच मुंबई युनिव्हर्सिटीतून कॉमर्सची पदवी मिळवली होती. पुढे शिकायचं होतं. पण घर चालवण्यासाठी नोकरी करणं भाग होतं. बाबांनी आजारपणामुळे रिटायरमेंट घेतली होती. त्यांच्या औषधांचा खर्च खूपच होता. म्हणून मग मी एम. कॉमच्या करस्पॉन्डन्स कोर्सला अॅडमिशन घेतलं आणि एका साध्या कंपनीत छोटी नोकरी शोधली. काळ शांतपणे वाहत असतानाच, एक दिवस आमच्याच विभागात राहणारा एक मुलगा घरी आला. बाबांना म्हणाला, ‘मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे.’ मी त्या मुलाला ओळखत होते. श्रीमंत माणसाचा तो एकुलता एक मुलगा होता. गेली दोन वर्षे तो माझ्यामागे होता. त्याने स्वतःची ओळख करून दिली, ‘मी अमुक-अमुकचा मुलगा. बारावी शिकलोय पण शिक्षण आणि नोकरीची आपल्याला गरज नाही. पुढच्या पाच पिढ्या बसून खातील एवढं आहे आमच्याकडे. तुमची मुलगी राणी बनून राहील’ आई-बाबा बुचकळ्यात पडले. मला खरं तर तो मुलगा आवडायचा नाही. म्हणून मी म्हटलं, ‘पण मला इतक्यात लग्न नाही करायचं आई-बाबांची जबाबदारी माझ्यावर आहे.’ तसं तो मुलगा म्हणाला, ‘मग तुझ्या आई-बाबांची जबाबदारी मी घेतो. तू फक्त लग्नाला होकार दे.’
 
आई-बाबांनी काही दिवस विचार केला की, आपले दोन दिवस उरले आहेत. चांगलं श्रीमंत स्थळ आलं आहे. मुलीचं भलं होईल. मग मला खूप समजावून त्यांनी माझं लग्न लावून दिलं. आज आमच्या लग्नाला अठरा वर्षे झाली आहेत. पण गेल्या अठरा वर्षांत मी घराबाहेर पडले नाही. लग्न झाल्याबरोबर नवऱ्याने सांगितलं की, नोकरी, शिक्षण बंद करायचं. मला धक्काच बसला. मी म्हणाले, लग्नाआधी तर तुम्ही म्हणाला होतात की, तुझ्या शिक्षणाला बंदी नाही म्हणून. तर म्हणाला, ‘मग बंदी कुठे घालतोय. करस्पॉन्डन्स कोर्स कर की!! कॉलेजमध्येच कशाला जायला हवं. लग्नानंतर त्यानं मला बाजारात जायला बंदी केली, लग्नसमारंभात जायला बंदी केली, गेली अठरा वर्षे मी माझ्या नवऱ्याच्या बंगल्याबाहेर गेले नाहीय. बंगला आणि बंगल्यातली झाडं एवढंच माझं जग झालंय. माझा नवरा सतत माझा राग करत असतो. मला मारझोड करत असतो. त्याने मारल्यामुळे माझा डावा डोळा निकामी झाला आहे. तो इतका रागीट आहे की आमचा बारा वर्षांचा मुलगाही त्याने हाक मारली की अजून पँट ओली करतो.’
मी म्हटलं, ‘पण तो इतका रागीट पूर्वीपासूनच होता?
ती म्हणाली, ‘नाही. लग्नानंतर महिना- दोन महिने छान चाललं होतं. त्यांच्या घराण्याचा एक  पिढीजात व्यवसाय आहे. सकाळी त्या व्यवसायावर त्याला जावं लागतं. संध्याकाळी  येताना तो माझ्यासाठी गजरे आणायचा, मला आवडतात म्हणून. सगळं व्यवस्थित चाललं होतं.
‘मग? परिस्थिती नेमकी बदलली कशी आणि का?’
एकदा त्यानं मित्रांना पार्टी दिली घरी. त्याचे जवळचे पाच-सहा मित्र होते. त्यांचं ड्रिंक्स संपल्यावर नवऱ्याने मला जेवण वाढायला सांगितलं. मी जेवण वाढलं आणि सगळे जेवणाची तारीफ  करू लागले. जेवणाची तारीफ करता करता कुणीतरी म्हणाला तू खूप लकी आहेस, वहिनीसारखी बायको तुला मिळाली. सुंदर, शिकलेली आणि गुणवान. चोथा म्हणाला, हो ना, नाही तर तुझ्यात काय आहे ते तूच सांग. दिसायला तू असा, शिक्षणात बारा आणि बिझनेसमध्ये पण बाराच वाजायला आलेत तुझे आता. पाचवा म्हणाला, ‘लग्नात आमच्या याच गोष्टी चालू होत्या, वहिनींनी याला पसंत केला कसा? बंदर के गले में मोती का हार.’
त्या रात्री मित्र गेल्यावर नवऱ्याने मला समोर बसवलं आणि विचारलं, ‘मी तुला आवडत नव्हतो. तू मला नकार दिला होतास. म्हणजे तू पण मला बंदर मानतेस? सांग?’ मी अवाक्  बघतच राहिले तर म्हणाला, ‘आणि प्रत्येक जण लग्नाआधी मनात कुणी तरी जपून असतोच.  सांग तुझ्या मनात कोण आहे? आपण याच्याशी लग्न का केलं म्हणून तू आत कुढत असतेस ना? सांग.’
मी गप्पच राहिले. काय बोलणार? तसं त्यांनी हात उगारला. ती पहिली वेळ. ती रडू लागली.  मी म्हटलं, प्लीज रडू नका. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण नंतर बोलू.
ती म्हणाली, ‘नाही हो... खूप बरं वाटतंय... मघाशी मी हसले ना… ती अठरा वर्षांनंतर आणि आता रडतेय त्यालाही मला आठवत नाही किती वर्षे झालीत शेवटचं रडून.’
मी सुन्न झालो, तसं तिनं विचारलं, ‘मला एक  सांगाल? या सगळ्यात माझी चूक  काय?’
या घटनेला दोन-तीन वर्षं उलटून गेलीत. आजही विचार करतो, या सगळ्यांत तिची चूक काय?
आणि जाता जाता शेवटी, वाचक म्हणून तुम्हालाही प्रश्न विचारतो की, या सगळ्यावर उपाय काय?
 
लेखक लघुकथाकार, नाटककार आणि कवी आहेत.
लेखक संपर्क-९८६९२६०७८०
kiran.yele@gmail.com
बातम्या आणखी आहेत...