आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kirtikumar Naik's Artical On Review Of Marathi Play In 2013

रंगभूमीचे नाट्यमय पर्व....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रंगभूमीच्या संदर्भात 2013मध्ये एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे, तिकीटबारीवर तुमचे नाटक चालायचे असेल तर नाटकात वलयांकित कलावंत असणे गरजेचे आहे; मग ते व्यावसायिक असो की प्रायोगिक. तसे पहिले तर चित्रपट, मालिकेत लोकप्रिय ठरलेल्या कलाकारांना घेऊन नाटक सादर करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. गेल्या तीन-चार वर्षांत तर मोठ्या संख्येने अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ रंगभूमीवर परतले; पण त्यांच्या नाटकांबरोबरीनेच नव्या रंगकर्मींचीही नाटके यशस्वी होत होती, त्यांची प्रसारमाध्यमांमधून, पुरस्कार सोहळ्यातून दखल घेतली जात होती. आता मात्र व्यावसायिक नाटकात वलयप्राप्त कलावंत नसेल तर निर्मातेही रिस्क घेताना दिसत नाहीत, हाच काहीसा प्रकार प्रायोगिक नाटकांमध्येही दिसून येत आहे. सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, रोहिणी हट्टंगडी, सोनाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी यांपासून ते अतिशा नाईक, मानसी कुलकर्णी, पूर्वी भावे, रसिका आगाशे, राधिका आपटे, अमेय वाघ यांसारखी चलनी नाणी असल्याशिवाय प्रायोगिकच्या प्रयोगांना पुन्हा प्रयोगाची संधी मिळणे कठीण होत चालले आहे. याचे सुस्पष्ट कारण असे आहे, की आता ‘प्रयोग’ करणे ही संकल्पना मागे पडत चालली असून किती लोक नाटक बघायला येतात, भाडे वसूल होते की नाही, याकडे निर्मात्यांचे आणि या प्रायोगिक नाटकांना संधी देणा-या उपक्रमांचे लक्ष असते. नव्या रंगकर्मींसाठी ही धोक्याची घंटा आहे. आता यापुढे आधी सिनेमा-सीरियल आणि मग नाटक, असा उलटा प्रवास सुरू झाला, तर आश्चर्य वाटायला नको.
याचा अर्थ, नव्या रंगकर्मींना घेऊन नवे प्रयोग झाले नाहीत, असे नाही; पण त्यांना पाच-दहा प्रयोगांत अपेक्षित किमान गल्ला मिळवता आला आला नाही. निर्मात्यांकडे सहनशीलता नाही त्यामुळे प्रयोग नाहीत, या दुष्टचक्रात ते अडकले.
सुदैवाने, हे चक्र भेदण्यात प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘पडद्याआड’ आणि मदन देशमुख लिखित विशाल जाधव दिग्दर्शित ‘टल्लीन झाले सारे’ या दोन नव्या नाटकांना यश मिळाले. विशेष म्हणजे, ‘पडद्याआड’चा निर्माता पहिल्या प्रयोगाआधीच पडद्याआड गेल्यावर नाटकाची धुरा हाती घेतली ती कलाकारांनीच. कोणतंही मानधन न घेता खिशातला पैसा टाकून तर कधी पैसे उधार घेऊन त्यांनी या नाटकाला रौप्यमहोत्सवी टप्प्यापार नेले. सकारात्मक समीक्षेचा फायदा नवख्या नाटकांना होतो, हे ‘टल्लीन झाले सारे’च्या यशाने दाखवून दिले.
फार्स हा नाट्यप्रकार यंदा पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर बहरला. बबन प्रभू यांचा ‘घोळात घोळ’, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ हे दोन फार्स यंदा दणक्यात पुनरुज्जीवित झाले; तर नाटककार प्रदीप दळवी यांची ‘वासूची सासू’ हा फार्ससुद्धा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसतो आहे. अर्थात, त्यात ‘दुनियादारी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला प्रणव रावराणे आणि ‘उंच माझा झोका’ फेम विक्रम गायकवाड यांचे फॅन फॉलोइंग दुर्लक्षित करून चालणार नाही. यंदाच्या वर्षात चर्चेत असलेल्या नाटकांपैकी विशेष चर्चेत आले, लता नार्वेकरांचे श्री चिंतामणी निर्मित ‘ती गेली तेव्हा’. आक्रमक जाहिराती, नाटक सतत चर्चेत राहील या अनुषंगाने पेरलेल्या बातम्या (उदा. मराठी रंगभूमीवर वास्तुशास्त्रानुसार पहिल्यांदाच नाटकाचा सेट बदलण्यात आला) आणि किरण माने या नटाचे लताबाईंनी लार्जर दॅन लाइफ केलेले प्रोजेक्शन यामुळे या नाटकाने काही काळ रंगभूमीवर खळबळ माजवली होती. समीक्षकांच्या धारदार टीकेला हे नाटक बळी पडले, तरी ‘मायलेकी’तल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेनंतर किरण मानेच्या अभिनयपटुत्वावर ठळकपणे या नाटकाने शिक्कामोर्तब केले. नाटककार संजय पवार यांचे ‘ठष्ट’ यंदाच्या वर्षातले सर्वात जास्त चर्चेत असलेले नाटक ठरले. ‘लग्न ही मुक्तीच्या मार्गातली मुलीच्या पायातली बेडी आहे’, हे धाडसी विधान मांडणारे नाटक स्वत: पवारांनी दिग्दर्शित केले. हे नाटक आग्रही, आक्रमक असले तरी कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाविष्काराने या नाटकाच्या आशयाशी प्रेक्षक जोडले गेले. विशेषत: हेमांगी कवी- धुमाळ या अभिनेत्रीने या नाटकाला दिलेला एक स्वतंत्र आश्वासक आयाम हा यंदाच्या वर्षातला सर्वोत्तम अभिनयाविष्कार म्हणावा लागेल. मराठीत मुख्य धारेच्या रंगभूमीवर शोषितांच्या प्रश्नांवर विचारांच्या अंगाने जाणा-या नाटकांची परंपरा नसतानाही हा विषय मांडण्याचं, सादर करण्याचं धाडस यंदा ‘धादांत खैरलांजी’ या नाटकाच्या निमित्ताने झाले. मुळात लेखिका प्रज्ञा पवारांच्या संहितेतला आशय तसा गुंतागुंतीचा आहे. या आशयात्मकदृष्ट्या गुंतागुंतीच्या नाटकाची प्रत्यक्ष मांडणी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शिवदास घोडके यांनी केल्याने हे नाटक काहीसे भरकटले.
महाराष्टÑ-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवरचे प्रदीप राणे लिखित संतोष पवार दिग्दर्शित ‘झालाच पाहिजे’ हे नाटक निर्माते नितीश राणे आणि अनंत पणशीकर यांनी प्रसिद्धीच्या मोठ्या दणक्यासह सादर केले. पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात दिलेले हे पहिलेच मराठी नाटक होते; मात्र, प्रत्यक्ष नाटकात सीमा प्रश्नाचे व्यापक स्वरूप, त्यामागचे राजकारण आणि या प्रश्नाचे आजचे मूल्यमापन यातल्या कशालाच स्पर्श न करता केवळ बतावणी आणि वगाच्या मसाल्यातून मनोरंजन करायचाच प्रयत्न झाल्यामुळे नाटक फसले. संभाजी भगत लिखित नंदू माधव दिग्दर्शित ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने यंदा 200व्या प्रयोगाचा पल्ला गाठला.
विवाहसंस्थेची बदलती रूपं मराठी नाटकांतून प्रतिबिंबित झालेली वारंवार दिसतात. यंदा गोव्याच्या राजीव शिंदे लिखित ‘थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक’ आणि पुण्याच्या योगेश सोमण लिखित ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांमधून याचा प्रत्यय आला. अतिशा नाईक या अभिनेत्रीने यंदा ‘गिधाडे’मधून दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला आणि त्याचेच पुढचे पाऊल म्हणून तिने सुषमा देशपांडे लिखित ‘प्रकरण पहिले’ या नाटकाचेही दिग्दर्शन केले. तिच्या निमित्ताने ब-याच कालावधीनंतर नाट्यसृष्टीला आणखी एक दिग्दर्शिका-अभिनेत्री मिळाली आहे. यंदा दोन अभिनेत्री निर्मात्यांच्या भूमिकेत उतरल्या असून सोनाली कुलकर्णीने ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ तर मुक्ता बर्वेने ‘छापाकाटा’ या नाटकांची निर्मिती केली आहे. सध्या अनुराधा वाघ (सुखांत, वासूची सासू), कल्पना विलास कोठारी (प्रपोजल) ही नावेसुद्धा लता नार्वेकरांच्या बरोबरीने यशस्वी निर्मात्यांमध्ये गणली जात आहेत. प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी या लेखक-दिग्दर्शक जोडीने ब-याच वर्षांच्या गॅपनंतर दिलेले ‘गेट वेल सून’ हे नाटकही अभिनेता स्वप्निल जोशीचे रंगभूमी पदार्पण म्हणून गाजले. बेइमान, व्यक्ती आणि वल्ली, पांडगो इलो रे बा इलो, हसवाफसवी, लेकुरे उदंड जाहली आदी जुनी दर्जेदार नाटके नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा रंगमंचावर आणण्याची परंपरा यंदा कायम राहिली. स्त्री आणि पुरुषाच्या लिंगनिरपेक्ष सहवासाची गोष्ट सांगणा-या राजन खान यांच्या ‘एका रात्रीची बाई’ कथेवर आधारित किरण पोत्रेकर दिग्दर्शित याच नावाचा नाट्यप्रयोग त्याच्या आक्रमक प्रसिद्धीमुळे विशेष चर्चेत राहिला. चित्रीकरण तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष नाटकात वापर यंदा अस्लम परवेझ लिखित ‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकाच्या निमित्ताने करण्यात आला. या नाटकाच्या नेपथ्यामध्ये एकूण सहा कॅमेरे लावण्यात आले, जे नाटकाचं लाइव्ह फुटेज घेतात आणि तेच फुटेज एकत्र करून नंतर स्क्रीनवर दाखवले जाते, ज्यातून नाटकातले रहस्य उलगडते. स्क्रीन्स, प्रोजेक्टर्सना सरावलेल्या मराठी नाटकाला तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या पुढे नेण्याचे काम या नाटकाने केले.
सेलिब्रिटी नाटक ही संकल्पना अधिक विस्तारणारा हृषीकेश जोशी यांचा ‘नांदी’ हा विविध नाट्यप्रसंगांचा गुच्छ असलेला नाट्यप्रकार यंदा मराठी रंगभूमीवर सादर झाला. या नाटकाला भरघोस बुकिंग आहे, जे सेलिब्रिटी नाटकाची संकल्पना बळकट करणारे आहे. या सेलिब्रिटी नाटकांचा महत्त्वाचा फायदा म्हणजे, पूर्वी सुटीच्या दिवशी बुकिंग होणारा, पावसाळ्यात बंद असणारा हा व्यवसाय बारमाही झाला. सेलिब्रिटींच्या तारखांप्रमाणे प्रयोग लागू लागले आणि प्रेक्षकही नाट्यगृहाकडे वळले. सध्या सेलिब्रिटी नाटकाच्या एका प्रयोगाचा खर्च पन्नास हजारांच्या घरात गेला असून सरासरी साठ हजार ते लाख रुपयांपर्यंत बुकिंग मिळू लागल्यामुळे निर्मातेही समाधानी आहेत.
manoranjanone@gmail.com