आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविचारांचा नाट्यानुभव देणारा नाटककार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तरीच्या दशकात ‘नाटककार’ म्हणून गोपु देशपांडे महाराष्ट्राला माहीत झाले. स्वत: गोपुंनीच म्हटल्याप्रमाणे 1960 ते 1975 हा मराठी रंगभूमीचा (खरे तर प्रायोगिक मराठी रंगभूमीचा) बहराचा काळ होता. एका बाजूला व्यावसायिक नाटक (ज्याचे प्रातिनिधिक वर्णन गोपु ‘कानेटकरी’ नाटक असे करत असत) स्थिरावत होते; तर दुसरीकडे प्रायोगिक नाटकांचा आरंभ होत होता. या प्रायोगिक नाट्यपरंपरेच्या पर्वाचा परीघ ते ‘खानोलकर ते गोपु’ असा पाहत होते. (त्यात महेश एलकुंचवार, माधव वझे, सतीश आळेकर यांचाही समावेश होता.) पण केवळ प्रायोगिक नाटककार असे गोपुंचे वर्णन अपुरे ठरेल. ‘राजकीय संकल्पना, विचार हे नाट्यानुभवाचे, नाट्याविष्काराचे विषय बनू शकतात, या ‘भूमिके’चा ‘नाटककार’ म्हणून गोपुंचे वर्णन अधिक न्याय्य, रास्त ठरते. गोपु स्वत: नाट्याचार्य खाडिलकरांच्या राजकीय नाटक परंपरेचे वारसदार होतेच; परंतु गोपुंनीच म्हटल्याप्रमाणे राजकारणातल्या व्यक्ती नाटकांची पात्रे असणे, या प्रकारापेक्षा त्यांची नाट्यसृष्टी वेगळी होती. राजकीय नाटकांची गोपुंची संकल्पना त्यांच्या नाट्यसृष्टीच्या बुडाशी होती. राजकीय विचारांची ताकद नि शिस्त गोपुंच्या नाट्यसृष्टीत पुरेपूर उतरलेली दिसते. याशिवाय राजकीय अनुभवविश्वाची स्वायत्तता, त्यातून घडत-उलगडत जाणारे नाट्य, नाट्यविषय ‘राजकीय’ असल्याने त्याच्याशी संबंधित असंख्य संदर्भ, प्राचीन साहित्याचा ‘संस्कृत’ प्रभाव, भक्तिकवितेचा संस्कार, भाषेची नादमयता आणि मूळच्या संकल्पनांची (अर्थातच राजकीय) चोख समज, या सार्‍यांनी गोपुंची नाट्यसृष्टी संपृक्त आहे. कमीत कमी नेपथ्य, दिग्दर्शकाला मुक्त वाव, ही त्यांच्या नाट्यतंत्राची खास वैशिष्ट्ये. जोडीला शास्त्रीय संगीताचा सूचक, अर्थगर्भ वापर गोपुंच्या नाटकात दिसतोच. तरीही नाट्यतंत्रापेक्षा नाट्याशय त्यांच्या नाटकात वरचढ दिसतो. दिग्दर्शकांनी त्यांच्या नाटकांच्या प्रयोगात घेतलेले ‘स्वातंत्र्य’ यामुळे ‘विष्णुगुप्त चाणक्य’ या नाटकाचा शेवट (व म्हणून नाटकाचा फोकस) कसा बदलला, याचा किस्सा (पं. सत्यदेव दुबेंशी संबंधित) सर्वश्रुत आहेच. नाट्यवास्तूची घट्ट बांधणी ज्यात दिग्दर्शकाला फारसा वाव नाही (उदा. विजय तेंडुलकर) असा प्रकार गोपुंच्या नाटकात दिसत नाही. गोपुंनी लिहिलेल्या जवळजवळ सर्वच्या सर्व नाटकांत याचे प्रत्यंतर येते. राजकीय संकल्पना-विचार यांना नाट्यानुभवाच्या केंद्रस्थानी ठेवल्याने गोपुंच्या नाट्यस्मृतीत जे काही पात्रा-पात्रांत घडते, ते म्हणजे ‘चर्चा’; म्हणूनच त्यांच्या नाटकांना ‘चर्चानाट्य’ (discussion play) असेही नाव पडले.
मराठी नाट्यविश्वाला ही कल्पना नवीन होती हे खरेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ‘प्रेक्षकांची राजकीय साक्षरता’ याचा खरा प्रश्न होता. उदाहरण द्यायचे तर ‘उद्ध्वस्त धर्मशाळे’चे देता येईल. हे सबंध नाटक एका अर्थाने ‘चौकशी नाट्य’ आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या नाटकातून उलगडण्याचा प्रयत्न गोपुंनी केला आहे. हे करताना त्यातले अनेक संदर्भ, संकल्पना प्रेक्षकांना माहीत आहेत, हे गृहीत धरले गेले; जे वास्तवात नव्हते. परिणामी डाव्या चळवळीतील सजग कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत हाच प्रामुख्याने त्यांच्या नाटकाचा चाहता, प्रेक्षक राहिला. नाटक साकारणारे अभिनेते, दिग्दर्शक यांच्यापुढेही हा प्रश्न होताच. त्यातून त्यांच्या नाटकांच्या ‘प्रस्तावनां’चा उगम झाल्याचे स्पष्ट दिसते. तरीही संहिता वाचलेल्यांनी नाटक पाहणे व न वाचलेल्यांनी नाटक पाहणे, यात फरक राहतोच व राहिलाही. म्हणूनच नाटक ‘परिवर्तना’चे असूनही त्या चळवळीतील सर्व जण त्यांच्या नाटकांचे प्रेक्षक होऊ शकले नाहीत. ही मर्यादा (मराठी समाजापुरती) राहिलीच.
गोपुंचे निबंधलेखन, नाट्यलेखन, कवितालेखन या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे; ते म्हणजे इतिहासदृष्टी व इतिहासभान. परंपरेला विरोध करताना ती ऐतिहासिकदृष्ट्या समजून घेऊन, स्वीकारून मगच ती अंशत: नाकारावी लागते वा स्वीकारावीही लागते. परंपरा पूर्णपणे नवीन नसते वा जुनीही नसते; ती सतत प्रवाही असते, म्हणून तिचा संपूर्ण स्वीकार वा संपूर्ण नकार अशक्य असतो. मराठी समाजात ही इतिहासदृष्टी ज्या वेळी मोठ्या प्रमाणात रुजेल, त्या वेळी गोपुंचे नाटककार म्हणून असणारे महत्त्व उत्तरोत्तर अधोरेखित होत जाईल. गोपुंच्या नाटकातील स्त्री पात्रांचे चित्रण हा स्वतंत्र विषय होईल; पण या पात्रांची भाषा संस्कृतप्रचुर आहे, त्या स्वतंत्र निर्णय घेणार्‍या आहेत, तत्त्वनिष्ठ आहेत व चौकटीत वावरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्‍या आहेत. त्यांच्या प्रेमातील मनस्वीपणा त्यांची तत्त्वनिष्ठा बाधित करत नाही; पण त्या भावनाशून्यही नाहीत. अर्थातच गोपुंच्या नाटकातील ही पात्रे व पुरुषपात्रेही समाजाच्या वरच्या थरातील/गटातील आहेत, पण त्याच वेळी ती पात्रे तत्कालीन डाव्या प्रवाहातल्या डी-कास्ट/डी-क्लास होण्याच्या प्रक्रियेचाही भाग आहेत. त्या काळातील डाव्या चळवळीतील हे वैशिष्ट्य गोपुंच्या नाटकातही दिसते.
खंडन-मंडन पद्धतीची चर्चा, नाट्यविषय बळकट करणारी स्वगते, परिणामकारक भाषा उपयोजन आणि राजकीय विधान, सत्ताभान, मूल्यभान, संघर्ष व त्याच्या मर्यादा यातून होणारे व्यवस्थाभान, तत्कालीन चळवळीतील तसेच राजकारणातील नैराश्य आदींच्या प्रभावी चित्रणाने आपल्या ‘मार्क्सवादी’ दृष्टीतून गोपुंनी मराठी प्रायोगिक नाटकाला एक उंची प्राप्त करून दिली, हे निर्विवाद. 1973 पासून ते त्यांच्या मृत्यूच्या आधीपर्यंत त्यांचे नाट्यलेखन चालू होते. 1990 नंतरच्या जागतिकीकरणाचे संदर्भ, त्यांचे परिणाम यांचेही प्रतिबिंब त्यांच्या नाटकांमध्ये (म्युझिक सिस्टिम) पडलेले दिसते, ते त्यांच्याकडे असलेल्या इतिहासभान व इतिहासदृष्टीमुळेच. म्हणूनच गोपुंची चर्चानाट्यांची मालिका सुजाण मराठी प्रेक्षकाला त्याच्या कालावकाशाचे संदर्भसमृद्ध भान देते व त्याची राजकीय जाणीवही समृद्ध करते. म्हणूनच मराठीतील राजकीय नाटकांच्या परंपरेत गोपुंची नाटके व गो. पु. देशपांडे स्वत: एक न टाळता येणारा संदर्भबिंदू म्हणून कायम राहतील.
kishor077@yahoo.co.in