आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानदानंदिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुमारे 150 वर्षांपूर्वीपर्यंत बंगालमध्ये बायकांनी अंगात चोळी किंवा परकर घालण्याची पद्धत नव्हती. (बंगाली साडी म्हणूनच नेसायची नसते, गुंडाळायची असते बहुधा.) ही पद्धत मोडून आधुनिक साडी नेसण्याची सवय बंगाली महिलांना लावणारी स्त्री होती, नोबेलप्राप्त कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठ्या भावाची, सत्येंद्रनाथ यांची, पत्नी ज्ञानदानंदिनी ऊर्फ गेनू. सत्येंद्रनाथ त्या काळातील आयसीएस ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय. (सत्येंद्रनाथांची व न्या. महादेव गोविंद रानडे यांची मैत्री होती.) 1877मध्ये गेनूही इंग्लंडला गेली, दोन मुलं हाताशी आणि एक पोटात अशी. तिथे काही काळ राहून ती मुंबईत आली. बराच काळ बाहेर काढल्यानंतर ती कोलकात्याला आली.

त्या काळच्या रीतीनुसार पालखीतून ती उतरली तर तिला पाहणा-या बायका आवासून तिला पाहात राहिल्या. कारण, गेनूने चक्क चोळी घातली होती आणि आता आपण ज्याला साधी साडी म्हणतो तशी साडी ती नेसली होती. स्वत: अशा आधुनिक पेहरावात येऊन गेनू थांबली नाही तर तिने त्या वेळी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तशी साडी नेसायला इतर बायकांना शिकवले होते. बायका तशी साडी शिकायला का गेल्या असतील याची कल्पना आपण सहज करू शकतो. चोळी नाही म्हणजे साडीचा पदर अंगाखांद्याभोवती घट्ट लपेटलेला. म्हणजे हात वरखाली करणे अवघड. म्हणजे पुरुषांसमोर जाताना किती अवघडायला होत असेल. म्हणजे घराबाहेर पडणे तर नकोसेच वाटत असेल. गेनू फक्त साडी आधुनिक पद्धतीने नेसून थांबली नाही. तिने मुलांसाठी बालक नावाचे नियतकालिक सुरू केले होते, बहुधा त्यातूनच रवींद्रनाथांनी लहान मुलांसाठी लिखाण सुरू केले होते. तिने घरातल्या मुलांचे वाढदिवसही साजरे करण्याची प्रथा सुरू केली. गेनू, तिच्या दोघी नणंदा, ज्या सुशिक्षित होत्या, त्यांनी बंगालमधल्या महिलांच्या सबलीकरणाचा पाया घातला, असे म्हटले जाते. जयपूर साहित्य उत्सवात ‘टागोर कुटुंबातील महिला’ या विषयावरील पुस्तकाच्या निमित्ताने हे ऐकायला मिळाले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेच पाहिजे, असे तीव्रतेने वाटले.

mrinmayee.r@dainikbhaskargroup.com