आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीचा ज्ञानसोपान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोपे वर्म आम्हा सांगितले संती,
टाळ दिंडी हाती घेऊनिया नाचा

या एकाच संतवचनात साहित्याने वारीचे दृश्य परिपूर्ण होते. चला जाऊ, पाहू डोळा, असे संत तुकोबांनी वारीविषयी म्हटले आहे तर, माझी जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी, असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची, अशा शब्दांत संत नामदेवांनी वारीचा महिमा वर्णन केला आहे, असे वारीवरील साहित्य अमापच त्याचा इतिहासही मोठा. तुकोबा तर त्याहीपुढे जाऊन म्हणतात.


संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी, आवडी मनाशी के एकादशी आषाढी ये, असे गर्जून सांगताना दिसतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या घरातच वारीची परंपरा होती, असे इतिहास सांगतो.
* वारी शब्दकोशात :
वारी ही नियमित व शेकडो वर्षे अभंग राहिली आहे, हेच वारीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. वारी शब्द कोशात दिसतो तो खेप, फेरी या अर्थाने. ही फेरी पिढ्यानुपिढ्या केली जाते. जो पंढरीची वारी चालत करतो, तोच वारकरी समजला जातो. वारीत ख-या अर्थाने समरसता असते. या अर्थाने ती धार्मिक नाही. वारी हा एक सामूहिक भक्ती वा भक्तीसाहित्याचा जागर आहे. तेच वारीचे असाधारणत्व आहे.
* वारीतील साहित्य व साहित्यातील वारी :
साहित्य हे मनुष्याच्या जगण्याविषयी काही म्हणत असते. या अर्थाने माणुसकीचे जगणे शिकवणारी वारी संत साहित्यातून ठायीठायी प्रकट झालेली दिसतेच, पण अन्य ग्रंथांतूनही वारी सातत्याने डोकावताना दिसते. दि. बा. मोकाशींसारख्या वेगळ्या वाटेवरचा लेखक आनंदओवरी सारख्या कादंबरीतून तुकोबांचे आणि वारीचे एक वेगळेच दर्शन घडवताना दिसतो. पं. बहिरटशास्त्रींनी संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान इंग्रजीत लिहून विदेशी अभ्यासकांना वारीचे महत्त्व पटवून दिले आहे. दि. पु. चित्रेंसारखा लेखक संत साहित्याचा मागोवा निराळ्या निकषांच्या आधारे घेताना दिसतो. भारुडे आणि कूट अभंगांचे अर्थ नारायणराव बडवे यांनी उलगडले. भजन, कीर्तन, प्रवचन, भागवत सप्ताह, पारायणे या सा-यांतून वारी प्रकट झाली व वारीतून साहित्य प्रगट झाले असल्याचे दिसून येते.
* वारी वर्णन-साहित्याचा प्रभाव सर्वांवरच :
वारीतील वर्णने (साहित्य) वाचून आधुनिक, उच्च शिक्षितांनाही वारीचा अनुभव घ्यावासा वाटतो. विदेशी मंडळीही वारीत आवर्जून येतात. समाजाची घुसळण वारीत होऊन एकत्वाचे, अखंडत्वाचे माणूसपणाचे साहित्याचे नवनीत वर येते.
वारी म्हणजे लोकसाहित्याचा खजिनाच
डॉ. रामचंद्र देखणे,
संत साहित्याचे अभ्यासक
पंढरीचा पांडुरंग हे संतांच्या प्रतिभेचे स्फूर्तिस्थान ज्ञान आणि भक्तीच्या समचरणांवर उभ्या असलेल्या या सावळ्या परब्रह्माच्या दर्शनाने आपल्या संत साहित्य आणि लोकसाहित्यात चैतन्याचे मळे फुलवले आहेत. त्यामुळे वारीचे, वारीविषयीचे सर्व लेखन पांडुरंगाभोवती केंद्रित झालेले दिसते. ज्ञानदेवांना आत्मानुभूतीने, तुकोबांना वृत्तीच्या अंतर्मुखतेने, नामदेवांना लडिवाळ प्रेमाने, समर्थांना लोकभ्रमंतीने आणि एकनाथांना लोकसंग्रहाने या विठ्ठलाचे वारीच्या रूपाने जे अलौकिक दर्शन घडले त्याची अनुभूती त्यांनी आपल्या वचनांतून, रचनांमधून मांडली आणि तीच वारीची साहित्यिक अनुभूती ठरत आली आहे. वारीतील वारकरी चालता चालता ज्या रचना म्हणतात, त्यांना मालिका अशी संज्ञा आहे. या मालिका म्हणजे संतरचनांचेच संकलन आहे, तर काही प्रमाणात त्यात लोकसाहित्याचा समावेश आहे. या मालिका विशिष्ट क्रमानेच म्हटल्या जातात. सुरुवातीला मंगलाचरण, भूपाळ्या, वासुदेव, भारुडे, जोगी, गवळणी, वाराची गाणी..अशा क्रमाने म्हटले जाणा-या या रचना वारीला श्रवणीय आणि दर्शनीय बनवतात. या अर्थाने वारी हे चालते-बोलते साहित्य संमेलनच आहे. वारी म्हणजे लोकसाहित्याचा खजिनाच असतो. गावोगावच्या वाड्यावस्त्यांवरूच्या खेडूत बायाबापड्यांनी तो पिढ्यानुपिढ्या ओठांवर जपलेला असतो. वारीत या खजिन्याचे मुक्तद्वार उघडते. चंद्रभागेला बुक्क्याचा गंध का येतो, या प्रश्नावर एक खेडूत बाई म्हणते- चंद्रभागेच्या तीरावरच्या दुकानात बुक्का भरलेले पिंप हुंदडणा-या गाईच्या धक्क्याने चंद्रभागेत कलंडले आणि चंद्रभागा बुक्क्याच्या गंधाने परिमळली, त्यावर दुसरी बाई म्हणते - रुक्मिनी धुनं धुती, देव विट्ठुलाचा झगा अबीरबुक्क्याचा गं वास, सुटलेला चंद्रभागा (भक्तांनी पांडुरंगावर बुक्क्याचा वर्षाव केल्याने त्याचा अंगरखा बुक्कामय झाला. तो धुण्यासाठी रुक्मिणी चंद्रभागेच्या पाण्यात तो बुडवते आणि अवघी चंद्रभागाच बुक्क्याच्या गंधाने युक्त होते.. अशा अनेक लोकरचनांतून ज्ञानमय, तत्त्वज्ञानमय वारी भावमयही होऊन जाते.


आध्यात्मिक, साहित्यिक महत्त्व टिकावे
भागवताचार्य
वा. ना. उत्पात
पुण्याला सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणतात, तशीच पंढरपूर ही आपली आध्यात्मिक राजधानी आहे. इतिहासकाळात संतमहंतांनी आपल्या वर्तनाने, शिकवणुकीने, साहित्याने पंढरपूरचे आध्यात्मिक स्थान अधोरेखित केले. पंढरपूरमध्ये मठामठांत, मंदिरात आजही ज्ञानपीठांचे कार्य सुरू आहे. मात्र, हे ज्ञानपीठ उद्याचे केवळ पर्यटनस्थळ तर बनणार नाही ना, अशी शंका वाटते आहे. भौतिक सुखसुविधांची रेलचेल वाढत असताना, पंढरीचे आध्यात्मिक महत्त्व लोप पाऊ नये, हीच पांडुरंगचरणी प्रार्थना आहे.


सांस्कृतिक उन्नयनाचे प्रयत्न
डॉ. अरुणा ढेरे
पंढरीची वारी ही सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या, बोलीसाहित्याच्या वा आध्यात्मिक-धार्मिक वा संत साहित्याच्या अंगाने फार मोठ्या प्रमाणात माणूस एकत्र करणारी अद्वितीय परंपरा आहे. सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक मोठी अशी परंपरा वारीला आहे. संतवचनांसह एकत्र वाटचाल करणारा हा मानवसमूह, ही विलक्षण घटना आहे. मात्र, या एकत्र येण्याचा विधायक उपयोग कुठल्याच पातळ्यांवर आपल्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्वाला अद्याप तरी करून घेता आलेला नाही, हेही वास्तव आहे. परिवर्तनाच्या ओघात वारीचे मूळ उद्दिष्ट कुठेतरी निसटते आहे की काय, अशी शंका वाटत आहे.


सन्मार्गाचे भान वारी देते
डॉ. यशवंत पाठक,
संत साहित्याचे अभ्यासक.
वारी केवळ येरझार नाही. तो सामूहिक नैतिक जगण्याचा जागर आहे. या निमित्ताने मानवी मनाला सन्मार्गाचे भान देण्याची वारी ही रीत आहे. वारी हे भटकणे नाही चालता चालता निसर्ग आणि मानवी मन यांची एकाग्रता अनुभवण्याचा तो मार्ग आहे. निर्मळता नांदते. तो स्पर्धक राहात नाही, तो भक्त बनतो. भक्त म्हणजे स्वाभाविक जगणारा. त्याच्यात कृत्रिमता नसते. संकुचितपणाला थारा नसतो. त्यामुळे वारकरी सहज वृत्तीचा असतो. अशी वृत्ती दुर्मिळ असते, पण ती वारीत ठायीठायी दिसते.