आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरी हाफ पँट : संगोपन कोजागिरीचे-9

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुटीसाठी कोजागिरी आपल्या आजोळी आली होती. साधारण पहिलीत असेल. वयापेक्षा लहानपणापासूनच ती जराशी मोठी दिसायची. तिच्या आईबाबांनी तिला सर्व प्रकारचे खेळ शिकवले होते. लांबवर धावणे, लंगडी, खो खो, लगोरी इत्यादी खेळायला कोजागिरीला खूप मजा यायची. पतंग उडवणे, विटीदांडू, गोट्या खेळण्यासाठी तिचे काही खास दोस्त असायचे. खूप खेळ खेळल्याने तिची तब्येत छान झाली होती. त्यामुळेच कदाचित ती वयाच्या मानाने मोठी दिसायची. विशेषकरून तिचे पाय फारच लांब लांब वाटायचे.
आजोळी आल्यावर आजी आजोबांकडून खूप लाड व्हायचे. आजी भेळ, भजी आणि लाडू असा खाऊ करून द्यायची. आजोबा रोज बागेत न्यायचे. तो त्यांचा कार्यक्रम ठरल्यासारखा असायचा. बागेत आजोबा फुगे घेऊन द्यायचे. या सुटीत कोजागिरीचा मावसभाऊही आलेला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या अंगकसरती करण्याचा विशालचा खास छंद होता. ‘डोंबा-या च्या घरीच शोभशील,’ असे आजी विनोदाने म्हणायची.
त्याच्या कसरती पाहून कोजागिरीला स्फुरण चढायचे. पण विशालप्रमाणे तिला हातावर उलटे होऊन पूर्ण अर्धवर्तुळात उड्या मारणे जमणे शक्यच नव्हते. बारला उलटे गुडघ्यात कोन करून अडकणे, हात खाली सोडून लोंबकळणे या गमज्या पाहून कोजागिरीला विशाल मनातून जादूगार वाटायचा. उठता बसता या चमत्कृती करत तो भरपूर फुशारक्या मारायचा. तो कोजागिरीच्याच वयाचा; पण बोलायचा असे की जणू तिचा तो दादाच आहे. त्याच्या या फुशारक्या फारच प्रसिद्ध झालेल्या होत्या. ‘अररर, लागला विशाल ढील सोडायला,’ असे सर्व जण म्हणत. यावर तो अधिकच खुलायचा.
बागेतील गवतावर आणि तिथल्या जंगलजिमवर विशालच्या कसरतीला बहर यायचा. गेल्या आठवडाभर पाहून पाहून कोजागिरीला त्यातील काही गोष्टी जमायला लागल्या. आपण उलटसुलट उड्या मारायच्या म्हणजे आपला फ्रॉक उडतो आणि आपली चड्डी दिसते हे कोजागिरीला जाणवायचे. तिने विचार केला आपण विशालसारखे कपडे घालायचे.
‘बागेत जाण्यासाठी तयार झालात का?’ आजोबांनी विचारले. विशाल तर नेहमीच तयार असायचा. कोजागिरीही आज हाफ पँट आणि टी शर्ट घालून तयार झाली. ‘हे कपडे घालून तू बागेत का येतेस, चांगला फ्रॉक घालून ये,’ आजोबांनी सागितले. ‘मला विशालसारख्या कसरती करायच्यात, त्यामुळे मी पँट घालून येणार. माझा फ्रॉक उडतो.’ कोजागिरीने मोठ्यामोठ्याने आजोबांना सांगितले. ‘पण हे कपडे तुला छान दिसत नाहीत. फ्रॉक कसा छान दिसतो,’ आजोबांचे आपले सुरूच होते.
कोजागिरी ऐकायला तयार नव्हती. तिला कधी एकदा बागेत जाऊन विशालबरोबर सर्व प्रकारच्या कसरती करायला मिळतील असे झाले होते. ‘आज आपण बागेतच नको जायला. तुम्ही घरी खेळा,’ आजोबांनी सांगून टाकले.
इतका वेळ हे संवाद शांता ऐकत होती. आता मात्र तिला राहावले नाही. बाहेर येऊन वातावरण बदलण्याच्या दृष्टीने ती म्हणाली, ‘मुलांना बागेत उड्या मारायला, कसरती करायला जायचे आहे. शेवटी त्यांना मनाजोगते हुंदडता आले म्हणजे झाले. ड्रेस कोणताही असो. ते आपण त्यांच्यावरच सोडू.’
असे म्हटल्यावर आजोबांचा चेहरा पडला होता. कोजागिरीने फ्रॉकच घालावा, असे आपल्याला वाटते हे फारसे बरोबर नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. कुठे तरी मनात ‘मुलींनी कसे मुलीसारखेच कपडे घालावेत म्हणजे त्या छान दिसतात, मुलींसारख्या’ हे त्यांना जास्त बरोबर वाटत होते.
‘चला. आज आपण सर्वच मिळून बागेत जाऊ,’ आजोबांचे अवघडलेपण कमी करण्यासाठी शांता म्हणाली. त्यावर विशाल आणि कोजागिरी दोघांनी टुणकन् उडी मारली. आजोबांचा हात धरून त्यांना चपला घालायला लावत कोजागिरी म्हणाली, ‘चला नं, आजोबा.’ आजोबाही दिलखुलास हसले.
शांताच्या डोळ्यांसमोर त्यांच्या घरातल्या जुन्या लाकडी पेटीतील तिच्या आईने शिवणक्लासमध्ये नमुन्यासाठी शिवलेली पांढरी हाफ पँट, ती घालण्यासाठी सतत हट्ट करणारी लहानपणची ती स्वत: उभी राहिली. ती हाफ पँट घडीही न उलगडता पेटीच्या तळाशी पडून राहिली होती. कोजागिरी मात्र सराइतासारखी मनमुराद धडपडत सर्व कसरती करण्यात मस्त होती.