आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरणोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके-
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते
शरणागत दीनार्त परित्राण परायणे
सर्वस्यार्ती हरे देवी नारायणि नमोस्तुते

सूर्यास्ताची वेळ जवळ येऊ लागली आणि सर्वांच्या नजरा महालक्ष्मीच्या मूर्तीकडे वळल्या. सभामंडपात प्रचंड गर्दी असूनही कोणताही गोंधळ नव्हता. अचानक सूर्याची किरणे श्रीमहालक्ष्मीच्या पावलांवर पडली अणि जमलेल्या सर्वांनी अंबाबाईचा जयघोष केला. दरवर्षी 9 ते 12 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक करवीर शहराच्या मध्यभागी असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात जमलेले असतात. किरणोत्सव या नावाने ओळखल्या जाणा-या या निसर्ग चमत्काराला धार्मिकतेचेही कोंदण लाभले आहे. येथे येणारे अभ्यासकही बांधकामशास्त्राचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात. सूर्याचे दक्षिणायन सुरू असताना दक्षिण क्रांती आणि उत्तर क्रांती असे दोन प्रकार असतात. ही दक्षिण क्रांती साधारण 17 अंश असते. महालक्ष्मीचा गाभारा दक्षिणमुखी असल्याने सूर्यास्ताचा प्रकाश नेहमीच सभामंडपात पसरलेला असतो. मात्र असे असले तरीही महालक्ष्मीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाहीत. ती केवळ या सहा दिवसांतच पडतात. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पहिल्या दिवशी प्रथम देवीच्या पावलांवर पडतात. नंतर दुस-या दिवशी ती किरणे मूर्तीच्या मध्य भागाकडे सरकतात आणि शेवटच्या तिस-या दिवशी देवीच्या मुखमंडलावर सूर्यप्रकाश पडतो आणि उपस्थित भाविक महालक्ष्मीचा जयघोष करतात. या वेळी महालक्ष्मीची अलंकार पूजा बांधण्यात येते. किरणस्पर्श होत असताना देवीची आरती करण्यात येते. महालक्ष्मीची मूर्ती वालुकामय हीरकखंडमिश्रित रत्नशिलेची आहे. मूर्तीच्या भूमध्यभागावर पद्मरागमणी आहे. आख्यायिका आहे की महालक्ष्मी म्हणजेच पद्मावती ही व्यंकटेशाशी भांडून करवीर येथे आली होती. तिच्या सोडून जाण्याने एकाकी पडलेल्या तिच्या नव-याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या नव-याच्या म्हणजेच व्यंकटेशाच्या दुस-या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सूर्यनारायण स्वत: तेथे येतात. सातव्या किंवा आठव्या शतकातील हेमाडपंती पद्धतीची बांधणी असलेले हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा अनोखा आविष्कार म्हणावा लागेल. पृथ्वी फिरत असताना सूर्याची दिशा नेमकी कशी असेल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून या मंदिराची बांधणी झालेली आहे. सूर्यकिरणे केवळ वर्षातून दोन वेळाच गाभा-यात प्रवेशतात. त्यांना अडथळा होऊ नये यासाठी गरुड मंडप, महादरवाजा बांधताना त्या काळी काळजी घेण्यात आल्याचे दिसते. कोल्हापूर महानगरपालिकेने या सूर्यकिरणांच्या मध्ये येणा-या इमारतींना परवानगी देताना त्यांच्या उंचीवर मर्यादा घातली आहे. असा हा दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोत्सव एकदा तरी आवर्जून पाहण्यासारखा आहे.