आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगड्या शैलीचा चित्रकार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांबड्या-पांढ-या रश्श्यासाठी, झणझणीत मिसळीसाठी आणि रांगड्या माणसांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरला चित्रकलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या समृद्ध परंपरेत आबालाल रेहमान, बाबूराव पेंटर, चंद्रकांत मांडरे अशा दिग्गजांनी नावं घेता येतील. या मुशीमध्ये वाढलेले संजय शेलार चित्रकार म्हणून आज देशात तसेच परदेशात आपला ठसा उमटवत आहेत.
कोल्हापूरच्या वास्तववादी परंपरेमध्ये संजय शेलार यांची चित्रकार म्हणून जडणघडण झाली आहे. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. तीच त्यांची पॅशन होती हे त्यांच्या त्या वेळच्या चित्रांवरून लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी चित्रकलेमधूनच औपचारिक शिक्षण घेतलं. कोल्हापूरच्या कलानिकेतन महाविद्यालयात त्यांनी जी. डी. आर्ट ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ चित्रकार होण्याचे ठरवले.
पोर्ट्रेट पेटिंग यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यावसायिक पोर्ट्रेट्स तयार करण्याचे ते काम करतात. याशिवाय त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी ते फिगर पेटिंग, लँडस्केप्स आणि स्टिल लाइफदेखील करतात. चित्रासाठी वेगवेगळे विषय शोधून वेगवेगळ्या रंगमाध्यमांमध्ये त्यांनी केलेली कामे समीक्षक तसेच रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत.
प्रामुख्याने शेलार हे ऑइल रंग माध्यमात काम करत असले तरी वॉटरकलर, अ‍ॅक्रॅलिक, पेस्टल्स, ओपेक कलर या माध्यमांमध्येही त्यांनी काम केले आहे. आजवर त्यांची मुंबई येथल्या ‘नेहरू सेंटर आर्ट गॅलरी’, ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ तसेच पुण्यातल्या ‘रे आर्ट गॅलरी’ इ. महत्त्वाच्या गॅल-यांमध्ये त्यांची सोलो प्रदर्शनं झाली आहेत. याशिवाय ते चित्रकलेशी संबंधित संस्थांमध्ये डेमो देतात. चित्रकलेवरच्या कार्यशाळाही आयोजित करतात. आजवर त्यांनी 60 पेक्षा जास्त संस्था आणि इन्स्टिट्यूट्समध्ये चित्रकलेचे डेमो आणि कार्यशाळा यांमध्ये सहभाग घेतला आहे.
‘इंटरनॅशनल आर्टिस्ट’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकामध्ये त्यांची चित्रे छापून येण्याचा मान त्यांना मिळाला आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये त्यांची चित्रं प्रसिद्ध झाली आहेत. मराठीतल्या महत्त्वाच्या दिवाळी अंकांपैकी एक असलेल्या दीपावली अंकाच्या मुखपृष्ठावर त्यांचे एक चित्र प्रसिद्ध झालेले होते. ते चांगलेच गाजले. एक सोज्ज्वळ स्त्री झाडाजवळ उभी असून तिच्या चेह-यावर ऊन पडले आहे. उन्हामुळे खुललेले तिचे सौंदर्य शेलार यांनी मोजक्या फटका-यांतून सुंदरपणे टिपले आहे.
‘स्टिल लाइफ’ आणि ‘स्केचिंग अँड ड्रॉइंग’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांमध्ये त्यांची विषय सोप्या व साध्या पद्धतीने समजावून सांगण्याची हातोटी दिसून येते. ‘स्टिल लाइफ’ या पुस्तकामध्ये केवळ शालेय अभ्यासापर्यंत मर्यादित असलेला विषय वेगवेगळ्या अंगांनी विस्ताराने मांडला आहे. चित्र काढताना चित्राचा विषय काय आहे हे महत्त्वाचे नसून ते कसे काढतो आहे हे महत्त्वाचं असल्याचं शेलार यांना वाटतं. रोजच्या साध्या वाटणा-या दृश्यांमध्येही चित्र लपलेलं असतं असं ते सांगतात.
शेलार यांना मानाचे समजले जाणारे ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ मेडल मिळाले आहे. तसेच 2002 मध्ये ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ व 2002 व 2009 सालचा ‘महाराष्ट्र शासन’ यांचा पुरस्कार मिळाला आहे.
कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेल्या या चित्रकाराने आजवर अनेक व्यावसायिक तसेच सर्जनशील कामं केली आहे व ते करत राहतीलच. त्यामुळे चित्रकलेकडे करिअरच्या दृष्टीने पाहणा-यांसाठी हे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरेल.
sakhadeopranav@gmail.com