कोयनेचे पाणी रेल्वेतून / कोयनेचे पाणी रेल्वेतून पठारावर

Aug 10,2012 10:21:20 PM IST

सहा वर्षांपूर्वी विधानसभेत प्रश्न चर्चेला आला. कोयना धरण आणि कोकणातून अरबी समुद्रात वाहून जाणा-या पाण्याचा उपयोग करता येऊ शकतो का, असा तो प्रश्न होता. नेहमीच्या प्रथेप्रमाणे लगेचच या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली. राज्याचे माजी जलसचिव एम. डी. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली भूशास्त्रज्ञ, कृषिशास्त्रज्ञ, अभियंते, भूजलतज्ज्ञ आदी दहा जणांच्या समितीने अभ्यास करून अहवाल सादर केला. प्रथेप्रमाणेच इतर अनेक अहवालांप्रमाणेच पेंडसे समितीचा अहवालदेखील धूळ खात पडला आहे. मात्र या अहवालाची आठवण करावी, अशी आजची पाणीटंचाईची स्थिती आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून दरवर्षी तब्बल ६७.5 टीएमसी पाणी (काठोकाठ भरलेल्या जायकवाडी धरणाच्या निम्म्याहून अधिक पाणी) कोकणातून अरबी समुद्राला मिळते. वीजनिर्मितीनंतर कोयनेतून थेट अरबी समुद्र गाठणारे पाणी सह्याद्रीपल्याडच्या पठारी प्रदेशात आणण्याची कल्पना कित्येक वर्षांपासून मांडली जात आहे. समुद्रात वाया जाणारे पाणी वळवता आल्यास मध्य महाराष्ट्रात शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून तीन-साडेतीन हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होते. कोकणात जाणारे पाणी सह्याद्रीवरून उचलून मध्य महाराष्ट्रात आणण्यासाठी ते वीज पंपाने खेचावे लागेल. त्यासाठी तब्बल पाच हजार दशलक्ष युनिटपेक्षाही अधिक विजेची गरज आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्र वीजनिर्मितीच्या बाबतीत ‘सरप्लस’ झाल्याखेरीज या पर्यायाचा विचारदेखील करता येणार नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोयनेचे वाया जाणारे पाणी वापरण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला. सद्य:स्थितीत 4 ते 1६ तासांपर्यंतचे भारनियमन राज्यात असल्याने कोयनेचे पाणी पंपाने खेचण्याची शक्यता दुरापास्त बनली आहे.
कोकणातील शेकडो गावांमध्ये वर्षाला सरासरी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यातील 30 टक्के पाऊस पुराच्या रूपाने थेट अरबी समुद्राला मिळतो. हे पाणी नेमके किती टीएमसी असावे, याची शास्त्रीय मोजदाद झालेली नाही. हे वाहून जाणारे पाणीदेखील पुरेपूर वापरता येऊ शकते. कोयनेतून वाहून जाणारे आणि पावसाळ्यात वाया जाणारे पाणी रेल्वेतून मुंबई, मध्य महाराष्ट्राच्या पठारी भागात नेता येईल, असे पेंडसे समितीने सुचवले आहे.
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये लोहमार्ग अस्तित्वात आले आहेत. डोंगर-कड्यांवरून कोसळणारे पाणी अडवून त्याचे तात्पुरते साठे या लोहमार्गांच्या नजीक करता येतील. याच ठिकाणी लघु जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून पाणी पॅकबंद अवस्थेत रेल्वेतून वाहून नेता येईल, अशी योजना आहे. यामुळे कोकणातील शेतीला वर्षभर पाणी मिळेल.

X