आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या शिक्षणावर कृष्णजींचे आक्षेप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आजच्या शिक्षणव्यवस्थेवर कृष्णमूर्ती अगदी नेमकेपणाने आघात करतात. ते म्हणतात की, आजच्या शिक्षणव्यवस्थेच्या या प्रचंड साच्यातून ठरावीक साच्याचीच माणसे बाहेर पडतात. हे सारे लोक सुरक्षिततेच्या हव्यासाने पछाडलेले असतात. परंपरेने चालत आलेल्या या साचेबंद शिक्षणपद्धतीमुळे स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची शक्तीच खुरटून जाते.

कृष्णमूर्तींचे हे आक्षेप अत्यंत टोकदार आहेत. या आक्षेपांनी आपल्या हे लक्षात येते की ते शिक्षणातून मिळणारा रोजगार, बदलणारी आर्थिक परिस्थिती याला ते फार महत्त्व देत नाहीत. शिक्षणातील पदव्यांनी जी आपली प्रतिष्ठा वाढते त्या प्रतिष्ठेलाही ते किंमत देत नाहीत. ते केवळ आतून बहरणारे व्यक्तिमत्त्व आणि स्वत:च्या जगण्याचे अवलोकन करणारे धारदार मन यालाच ते शिक्षणाचे उपयोजन म्हणतात.

आजूबाजूला बघितले तर आज शिक्षणाने अनेकांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. हातात पैसा आला. पैशाने राहणीमान सुधारले. पण जेव्हा या माणसांची आपण चाचपणी करतो तेव्हा लक्षात येते की ही माणसे केवळ एका साच्यातीलच आहेत. त्यांच्या विचारांना एकच साचा आहे. त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा एकाच साच्यातील आहेत. गर्दीतली माणसे केवळ समूहाचा भाग आहेत. त्यांना स्वत:चा चेहरा नाही. त्यांच्या डोळ्यात कोणतीही चमक नाही. विचारात कोणताही निखारा नाही. संवेदनेची पातळी उंचावली नसल्याने ही सामान्य वकुबाची माणसे केवळ पैशाचा वापर करून वस्तूंचा, भौतिक सुखाचा मारा करून स्वत:ला आनंदी ठेवण्याचा व इतरांवर प्रभाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हे परखड विश्लेषण मनामन पटते. आपले राजकारणी, आपले नोकरशहा, आपले लेखक-कलावंत सुखीसमृद्ध जीवनाचे जे चित्र आपल्यापुढे ठेवतात, तो साचा सारखाच असतो. आपल्या विकासाच्या सर्व कल्पनासुद्धा एका घाण्याभोवती फिरतात.

आपण सारे एका साच्यात फिरत राहतो. कारण साच्याबाहेर जाण्याची आपल्याला भीती वाटते. यामुळेच आपण आपल्या अंत:प्रेरणेला साद देण्यापेक्षा तडजोड करत परिस्थितीशी समायोजन करतो. परिणामांचा विचारच आपल्याला जास्त भेडसावतो. तेव्हा आपण समूहाचा, कळपाचा भाग बनून आपल्या प्राणिप्रेरणेला प्रतिसाद देतो. या भेकडपणातूनच आपल्यातील शौर्य समूहात प्रकटत असते. आजचा मध्यमवर्ग हिंसा सांगणारी विचारसरणी का स्वीकारतो याचे उत्तर यात मिळते. सुरक्षिततेच्या भीतीने कळपात घुसणारा वर्ग नकळत हिंसेची, भडक भाषेची आणि सोप्या उत्तरांची भाषा स्वीकारतो. कृष्णमूर्तींना सुरक्षिततेच्या भिंती पाडून जीवनाला थेट सामोरी जाणारी माणसे घडत नाहीत याचे शल्य आहे. सुरक्षितता झुगारणाराच काही निर्मिती करू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास आहे. मनाला कोणत्याही साच्याचे गुलाम व्हायला म्हणूनच त्यांचा विरोध आहे. त्यांचे स्वत:चे जीवनही तसेच ते जगले. ऑर्डर ऑफ स्टार या संस्थेचे जगद्गुरूपद आणि त्या संस्थेची करोडो रुपयांची संपत्ती क्षणात लाथाडून ते मुक्त होतात. सुरक्षिततेने पछाडलेला कोणीही असा निर्णय करू शकत नाही. मुक्त मनाच्या निर्मितीला सुरक्षिततेची ओढ हीच जबाबदार असते. आजचे शिक्षण साचेबद्ध जगण्याची आणि सुरक्षिततेची ओढ निर्माण करते, हाच त्यांचा आक्षेप आहे.

आजचे शिक्षण स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची क्षमताच मोडून टाकते, हा त्यांचा आक्षेप आहे. ते म्हणतात, हे शिक्षण ‘हाऊ टू थिंक’ शिकवत नाही तर ‘व्हॉट टू थिंक’ हे शिकवते. विचार कसा करावा हे शिकवत नाही तर कोणता विचार करावा हे शिकवते. आजच्या विचारशून्य युगाच्या निर्मितीचे मूळ कारण शिक्षणाच्या या अपयशात असल्याचे ते इतक्या सहजपणे लक्षात आणून देतात. आमची राज्यव्यवस्था, धर्मसत्ता आम्हाला केवळ हाच विचार अंतिम आहे, त्याला पवित्र मानायला सांगते.

शिक्षणव्यवस्था केवळ या संकल्पनांचे वाहक म्हणून काम करते. शिक्षकांची भूमिका केवळ रिंगमास्टरची राहते. प्रस्थापित विचारसरणी मुलांच्या डोक्यात कोंबणे म्हणजे शिक्षण असेच शिक्षणाचे स्वरूप झाल्याचे ते लक्षात आणून देतात. आज लोक वाचत नाहीत. उथळ जीवन जगतात.सोप्या उत्तरांना भुलतात. जीवनाच्या समस्यांसाठी बुवा-बाबांना शरण जातात. स्वत:च्या मनोव्यापारांचे विश्लेषण करू शकत नाहीत. याचे कारण आमच्या शिक्षणानेच ते आमच्यात रुजवले नाही. इथल्या व्यवस्थेला पाहिजे असलेले पपेट्स-बाहुल्या फक्त या व्यवस्थेने निर्माण केल्या आहेत. इतकी धारदार सूत्ररूप मांडणी ते करतात. ‘वेटिंग फॉर गोदो’ नाटकात एक पात्र दुस-याला आज्ञा देताना म्हणते ‘थिंक बिग.’ आम्ही सांगतो तोच विचार करण्याची आज्ञा असू शकते. इथली व्यवस्था शिक्षणव्यवस्थेला हाच आदेश देते आहे आणि आपण सारे या व्यवस्थेचे विचारशून्य बळी आहोत, हेच कृष्णमूर्ती आपल्या लक्षात आणून देतात.

herambrk@rediffmail.com