Home »Magazine »Divya Education» Krishan Murthi's Incredible Education Perspective

कृष्णमूर्तींची अमोल शिक्षणदृष्टी

हेरंब कुलकर्णी | Jan 09, 2013, 12:39 PM IST

  • कृष्णमूर्तींची अमोल शिक्षणदृष्टी

एखाद्या गुरूने सत्संग करावा असेही ते बोलत नव्हते तर केवळ लोकांना त्यांच्या जगण्याच्या वास्तवाशी भिडवणे एवढी एकच मध्यवर्ती कल्पना त्या संवादाची होती. कृष्णमूर्ती जरी जन्माने भारतीय होते तरी ते विश्वनागरिक होते. भारतात ते फक्त 4 महिने हिवाळ्यात येत. इथेही संवादाचे कार्यक्रम होत. कृष्णमूर्ती स्कूल्समधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी ते बोलत. केवळ संवाद हेच माध्यम वापरून जगभर संचार करणारे कृष्णमूर्ती जगातील प्रमुख नेते शास्त्रज्ञ-कलावंत-लेखक यांच्यासाठी प्रेरणा बनले. संघटित धर्माचा पायाच त्यांच्या मांडणीने डळमळीत करून टाकला. राजकीय विचारसरणी, समाजवाद, समाजपरिवर्तनाच्या आपल्या कल्पना यांचा पायाच त्यांच्या मांडणीने काढून घेतला.

कृष्णमूर्तींचा जीवनप्रवासही अद्भुत वाटावा असाच आहे. भारतातल्या आंध्र प्रदेशात एका खेड्यात जन्मलेला सामान्य कुटुंबातला मुलगा. थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रमुखांना समुद्रकिनारी खेळणारा हा मुलगा त्याच्या डोळ्यातील विलक्षण तेज बघून त्यांनी निवडला. पालकांकडून त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून अनेकविध साधना करवून घेतल्या.

थिऑसॉफिकल सोसायटीच्या संकल्पनेनुसार कृष्णजी जगद्गुरू ठरणार होते. त्यासाठी त्यांच्याकडून करून घेतलेल्या साधनांचा अतिरेक झाला. कृष्णमूर्तींचा भाऊ नित्या या वातावरणात मृत्यू पावला. त्यानंतर कृष्णमूर्ती मुळापासून हलले. त्यांनी जगद्गुरू होण्याचे नाकारले. लाखो लोकांचे गुरुपद नाकारून सत्य ही पथहीन भूमी आहे. सत्याकडे जाणारा कोणताही रूढ मार्ग नाही. संघटित धर्म-पंथ हे करू शकत नाही, असे म्हणून कोट्यवधींच्या इस्टेट त्यांनी लाथाडली आणि फकीर होऊन लाखो भक्तांना नाकारून त्यांनी केवळ संवाद साधणे सुरू केले.

अनेक जण कृष्णजींचे तत्त्वज्ञान कोणते, असा प्रश्न विचारतात. पण जन्मभर कृष्णमूर्ती वाचणारा माणूससुद्धा या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. कारण एखाद्या आजारावर औषध मागण्यासारखी रेडिमेड उत्तरे मागण्याची आपल्याला सवय लागली आहे. त्यामुळे धार्मिक गुरू म्हटले की आपण लगेच साधनेची रेसिपी मागणार. पण कृष्णमूर्ती काहीच रेडिमेड सांगत नाहीत. ते केवळ तुमच्या मनातील भावभावना, विचार यांची तुम्हालाच तपासणी करायला सांगतात. आपल्याला तेच नको असते. आपण फी द्यायला तयार असतो, पण डॉक्टरने तपासावे अशी आपली सवय. त्यामुळेच गुरुचरणी आपण समर्पित होतो. कृष्णमूर्ती याला मानसिक आळशीपणा म्हणतात. स्वत:ला तपासायला आपण नकार देतो हे लक्षात आणून देतात.

शिक्षण हा कृष्णमूर्तींचा आस्थेचा विषय. ते हजारो शिक्षकांशी बोलत. विद्यार्थ्यांशी बोलणे हा तर त्यांच्या आनंदाचा भाग होता. त्या संवादांची पुस्तकं झाली. कृष्णमूर्ती शिक्षणातही काय करावे हे सांगत नाहीत. अशी चिरफाड करतात की काय असायला हवे हे सहजपणे स्पष्ट होत जाते. त्यांची आजच्या शिक्षणाची चिकित्सा हादरवून टाकते.

‘शाळा आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की तिथे कोणीच स्वत: म्हणून जात नाही. तिथे दाखल करावे लागते....’. हे त्यांचे वाक्य अस्वस्थ करून टाकते. कृष्णमूर्तींच्या चाहत्यांनी जगभर मुक्तमनांच्या निर्मितीसाठी शाळा सुरू केल्या. भारतात वाराणसी, आंध्र प्रदेशात ऋषी व्हॅली, पुण्याजवळ राजगुरुनगर आणि बंगळुरू येथे कृष्णमूर्ती स्कूल्स आहेत. या शाळांना त्यांनी पत्रे लिहिली. ती पत्रं प्रत्येक शिक्षक आणि पालकांनी वाचली पाहिजेत. एका पत्राच्या सुरुवातीला ते लिहितात की मंदिर- मशीद आणि चर्चपेक्षाही शाळा अधिक पवित्र आहे. कारण या तीनही ठिकाणी शिकण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. इतकी भेदक मांडणी ते करतात. कृष्णमूर्ती स्कूल्सचे वेगळेपण हा भारताचा ठेवा आहे. प्रत्येक शिक्षणप्रेमीने या शाळा अभ्यासायला हव्यात. आज परीक्षा बंद करून सातत्यपूर्ण मूल्यमापन करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा या शाळांच्या आधारे घेतला आहे. कारण ही पद्धती या शाळा गेल्या 75 वर्षे अमलात आणत आहेत.

थोर समाजवादी विचारवंत अच्युतराव पटवर्धन हे राजकीय जीवनाचा त्याग करून आयुष्यभर कृष्णमूर्तींसोबत राहिले. ऑनलाइन कृष्णमूर्ती या वेबसाइटवर समग्र कृष्णजी उपलब्ध आहेत. या लेखमालेत आपण कृष्णमूर्तींचे शिक्षणविषयक विचार, चिकित्सा पालक-शिक्षक-विद्यार्थ्याकडून ते काय अपेक्षित करतात याबाबतची मांडणी करणार आहोत. रेसच्या घोड्यासारखी विद्यार्थ्यांना पळायला लावणारी शिक्षक आणि पालकांची मनोवृत्ती प्रेम आणि संवेदनशीलतेने भरावी हीच त्यांची तळमळ आहे. ही भावना या लेखमालिकेतून त्यांच्याच शब्दातून संक्रमित करण्याचा हा प्रयत्न शिक्षक विद्यार्थी पालकांना नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो

Next Article

Recommended