आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृष्णमूर्ती स्कूल्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णमूर्ती स्कूल्स याचा अर्थ कृष्णमूर्तींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शाळा. स्वत: कृष्णमूर्ती कोणत्याही संस्था, संघटना स्थापनेच्या विरोधात होते, परंतु त्यांच्या अभ्यासकांनी पुढाकार घेऊन जगात 7 ठिकाणी ज्या शाळा काढल्या त्यांना कृष्णमूर्ती स्कूल्स म्हटले जाते. ‘स्कूल्स’ या शब्दाशी इंग्रजीत एखाद्या विचारसरणीची परंपरा असा अर्थ जोडला जातो. परंतु कृष्णमूर्ती मुळातच स्वत:चे असे कोणतेही तत्त्वज्ञान सांगत नसल्याने या शाळा विशिष्ट विचारसरणीच्या आधारावर उभ्या नाहीत. किंबहुना विचारसरणी, संघटित धर्म, विचारांचे साचे यापासून या मुलांना मुक्त आणि स्वतंत्रपणे विकसित करण्यासाठीच या शाळा आहेत.

आजपर्यंतच्या लेखांमध्ये कृष्णमूर्तींनी आजच्या शिक्षणपद्धतीवर केलेली टीका आपण वाचलीत. प्रत्येक गोष्टीवर त्यांचे तुटून पडणे बघितल्यावर असे वाटते की यांना काहीच कसे मान्य नाही? पण ‘नेति नेति’ करत जेव्हा आपण कृष्णमूर्ती शाळा बघतो तेव्हा कृष्णमूर्ती शिक्षण कशाला म्हणायचे ते उमगते.

भारतात उत्तर प्रदेशात वाराणसी, चेन्नई, आंध्र प्रदेशात ऋषिव्हॅली, बंगलोर व महाराष्ट्रात राजगुरुनगरजवळ सह्याद्री अशा 5 शाळा आहेत. परदेशात ब्रॉकवूड पार्क व ओहयो या ठिकाणी दोन अशा जगभरात 7 शाळा आहेत. मागील 75 वर्षांत स्थापन केलेल्या या शाळांनी जगातील शिक्षणाला दिशा दिली.

या सर्व शाळा अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहेत. वाराणसीची राजघाट ही शाळा तर गंगा आणि यमुना नदीच्या मध्यभागी सारनाथच्या जवळ आहे. ऋषिव्हॅली आणि बंगलोरच्या शाळेतील जंगल मोहवून टाकते. महाराष्ट्रातील सह्याद्री ही शाळा तर चासकमान धरणाच्या टेकडीवर आहे. परदेशातील शाळाही रम्य ठिकाणी आहेत. स्वत:कडे तटस्थ बघायला निसर्ग खूप मदत करतो. निसर्गात आपण विनासायास स्वत:चे अवलोकन करू लागतो. कृष्णमूर्तींना निसर्गाच्या निरीक्षणाची खूप ओढ होती. त्यांच्या लेखनाची सुरुवात निसर्ग वर्णणानेच होते.

या शाळांमध्ये बक्षीस आणि शिक्षा या दोन्हीही गोष्टींना बंदी आहे. त्यामुळे कोणत्याही स्पर्धा होत नाहीत. कोणत्याही महत्त्वाकांक्षा पेरल्या जात नाहीत. केवळ मुले सादरीकरण करतात. आज आपण शाळांमधून शिक्षा करायला विरोध करतो. पण या शाळांच्या स्थापनेपासून हा दृष्टिकोन आहे. आज आपण परीक्षाविरहित मूल्यमापनाकडे वळत आहोत. भारतीय शिक्षणाला ही मूल्यमापन प्रणाली कृष्णमूर्ती शाळांनी दिली हे या शाळांचे अपूर्व योगदान आहे. या शाळांमध्ये पूर्वीपासूनच परीक्षा नाहीत. अनौपचारिकपणे शिक्षक मुलांच्या वर्तनाच्या नोंदी करतात. अध्यापनाची निरीक्षणे नोंदवतात आणि त्याआधारे मुलाला मार्गदर्शन केले जाते. ‘परीक्षा हवी की नको’ हा वाद घालणा-यांनी जरुर कृष्णमूर्ती शाळांचा अभ्यास करावा.

शिक्षक व विद्यार्थ्यांचे संबंध खूप मित्रत्वाचे आहेत. मुलांच्या निवासस्थानाजवळच शिक्षकांचे निवासस्थान आहे. ते एकत्र जेवतात. एकत्र राहतात. त्यामुळे संबंध खूप स्नेहपूर्ण आहेत. संगीत हा शाळेत अविभाज्य भाग आहे. सकाळी प्रार्थना नसते. तर सर्व जण गोलाकार बसून वाद्यांच्या तालावर काही गीते, संस्कृत गीते म्हणतात. ते इतके सुंदर असते की दिवसभरासाठी मुलांची भावदशाच बदलते. कधी-कधी फक्त संगीत ऐकविले जाते. जयंती-पुण्यतिथी असे उपदेशपर कार्यक्रम नसतात. कृष्णमूर्तींचीही जयंती, पुण्यतिथी साजरी केली जात नाही. मी एकदा विचारले की, मुलांना तुम्ही कृष्णमूर्ती कसे शिकवता? त्यांचे उत्तर होते की ख्रिश्चन शाळेत बायबल शिकवतात तसा आम्ही कृष्णमूर्ती शिकवत नाही. कृष्णाजींचे फोटोही नाहीत. ते म्हणाले की कृष्णमूर्तींना अपेक्षित संवेदनशील, मुक्त मन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटली तर ते कृष्णमूर्ती वाचतील. हा उदारमतवाद समजण्यापलीकडचा आहे.

रोज संध्याकाळी ‘अस्ताचल’ हा उपक्रम नितांतसुंदर आहे. सूर्यास्त होताना सर्व विद्यार्थी मावळत्या सूर्याकडे बघत राहतात. सूर्य डोंगराआड जाताना सर्वत्र शांतता असते. सूर्य मावळतानाच शांती, पक्ष्यांचे गुंजन मुलं अनुभवतात आणि शांतपणे चालू लागतात... दिवसभर टीव्ही आणि कॉम्प्युटर बघणारे आपण आणि आपली मुलं मावळतीचा सूर्य रोज बघण्याचा संकल्प कृष्णमूर्तींच्या साक्षीनं करूया...

herambrk@rediffmail.com