आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishanmurty One Introduction: If Krishanmurty Is Teacher

कृष्‍णमुर्ती एक परिचय: कृष्णमूर्ती जर शिक्षक असते तर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणावर इतकं बोलणारे कृष्णमूर्ती जर खरंच शिक्षक झाले असते तर....ही कल्पनाच रम्य वाटते. एकदा मुलांशी बोलताना कृष्णमूर्तींनी मी जर शिक्षक असतो तर मी तुमच्याशी कसे वागलो असतो हे स्पष्ट केले. ते म्हणतात....
‘मुलांनो, मी जर शिक्षक असतो तर प्रथम तुम्ही मला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारावे अशी मागणी मी केली असती.... ज्ञानाबद्दलचे प्रश्न नव्हेत, ते तर सोपे आहेत.... पण कसे अवलोकन करावे, टेकड्यांमागे कसे पाहावे, त्या चिंचेच्या झाडाकडे कसे पाहावे, पक्ष्यांचे गाणे कसे ऐकावे, ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा मागोवा कसा घ्यावा, असले प्रश्न मी विचारायला सांगितले असते. तुम्हाला या पृथ्वीचे, या सृष्टीचे दर्शन करण्यास, भूमीचे सौंदर्य अवलोकन करण्यास, मातीची लाली पाहण्यास मदत केली असती. मग मी म्हटले असते ‘हे पाहा, त्या शेतक-याकडे पाहा... ते खेडूत पाहा, त्यांच्या दारिद्र्याकडे, दुर्दशेकडे, गलिच्छतेकडे फक्त पाहा... सध्या जसे तुम्ही त्यांच्याकडे संपूर्ण उपेक्षेने, बेपर्वाईने पाहता तसे पाहू नका... तुम्ही त्या झोपड्या बघितल्या आहेत का... मी तुम्हाला तिकडे बघायला सांगेन. म्हणजेच तुम्हाला कोमल अंत:करणाचे संवेदनशील बनवीन आणि तुमच्याभोवती घडणा-या प्रत्येक गोष्टीबद्दल, घटनेबद्दल तुम्ही निष्काळजी, बेपर्वा असलात तर तुम्ही संवेदनशील होऊ शकणार नाही.... मग मी म्हणेन, ‘प्रज्ञावंत सुज्ञ असायचे म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही कसे चालता, कसे बोलता, कसे जेवता या सर्वांचे तुम्हाला भान असले पाहिजे.... तुमच्या अन्नाबद्दल मी तुमच्याशी बोलेन. मी तुम्हाला सांगेन हे पाहा, तुम्ही अवलोकन करा, चर्चा करा, कोणतेही प्रश्न विचारायला भिऊ नका. कसे वाचावे, कसे लिहावे, कसे शिकावे याविषयी मी बोलेन... आम्हाला खिडकीच्या बाहेर पाहायचे आहे असे तुम्ही म्हणालात तर मी म्हणेन, जे जे वाटते ते ते पाहा आणि सर्व बघून झाले की तुमच्या पुस्तकाकडे तितक्याच आस्थेने रस घेऊन पाहा.... मग मी म्हटले असते की पाहा या पुस्तकांच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रज्ञावंत होण्यास मदत केली आहे...केवळ भरपूर माहिती व ज्ञान तुम्हाला देणे एवढेच त्याचे कार्य नसते... तर तुम्हाला जीवनाचा व्यापक संपूर्ण विस्तार, त्याचे सौंदर्य, तसेच त्यातील गलिच्छपणा, ओंगळपणा दाखवणे हेही शिक्षणाचे कार्य असते... जीवनातील आनंद, मौज, भय, व्यथा सारे काही दाखवले पाहिजे म्हणजे तुम्ही ही शाळा सोडून जाल तेव्हा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे व्हाल... विचारशून्य, विनाशक, बेपर्वा न होता जीवनात आपली प्रज्ञा उपयोगात आणणारे व्हाल.’’


हे वाचले तरी शिक्षकाकडून कृष्णजी कोणत्या अपेक्षा करतात हे लक्षात येते. त्यांना एकाच वेळी विद्यार्थी संवेदनशील व जिज्ञासू बनायला हवा आहे. त्याची चौकसता पुस्तकांना भेदून सर्व जगाची चौकशी करणारी हवी आहे. निसर्गाचे अवलोकन करणारे मन हवे आहे. जीवनातील सौंदर्य व दृष्टता याविषयी सजगता अपेक्षित आहे. गरिबांविषयी संवेदना जपणारे मन त्यांना हवे आहे. पण त्यात सामाजिक भूमिकेपेक्षा माणूस म्हणून संवेदना जास्त गहिरी आहे. मुलांना कोणतीही कडक शिस्तीत न बांधणारी व स्वातंत्र्य देणारी त्यांची दृष्टी आहे. घडणा-या प्रत्येक गोष्टीबद्दल ते मुलांना सजग करण्याविषयी शिक्षकांकडे आग्रह धरतात...