आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लैला मजनू'ची न संपणारी गोष्‍ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लैला-मजनूच्या प्रेमाची साक्ष देणारी समाधी राजस्थानमधील बिजनौर (ता. अनुपगढ, जि. श्रीगंगानगर) या गावी अस्तित्वात आहे. या गावी दर वर्षी १५ जून रोजी यात्रा भरते. यात्रेच्या ठिकाणी आसपासच्या गावातले-शहरांतले प्रेमी युगुल जमतात. प्रेमाची व एकसाथ राहण्याची शपथ घेतात. त्यांची अशी श्रद्धा आहे की, लैला-मजनूचे प्रेम मान्य नसल्याने त्यांचा जीव घेण्यात आला व तो दिवस १५ जूनचा होता. आता ही तारीख खरी की खोटी माहीत नाही; पण हरियाणामधील मनोज-बबली या प्रेमी जोडप्याला खाप पंचायतीने मारून टाकले तो दिवसही १५ जून २००७चा!
चार वर्षांपूर्वी अामीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या बहुचर्चित कार्यक्रमात खाप पंचायतीवरील एका भागात मनोज-बबली यांच्या संदर्भात चर्चा झाली होती. त्यात पंचांनी सगोत्र विवाहाचे समर्थन केले होते. इतकेच नाही, तर या खुनाचा विरोध करत असलेल्या एका धाडसी व्यक्तीचीही अामीरने त्या वेळी सर्वांना ओळख करून दिली होती. अर्थात, पंचांना याचा संताप आल्याने त्या व्यक्तीस हा कार्यक्रम प्रसारित होण्याअगोदरच संपविण्यात आले होते. खाप पंचायतीचा हा धाक अजूनही कायम आहे. सगोत्र विवाह केल्यावर उत्तरेकडील राज्यात आजही तितक्याच खुनशीपणे जीव घेतला जातो. हरियाणाच्या खाप पंचायतीची एक धक्कादायक माहिती अशी आहे की, ‘ऑनर किलिंग’ करण्यात महिलाच पुढे असतात. एका सर्व्हेनुसार भारतात दरमहा दोन, तीन तरी ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडतात. असे जीव घेण्यात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र हा पंजाबसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
खाप पंचायतीला विविध प्रदेशांत विविध नावे आहेत. सालीशी सभा, जात पंचायत, गावकी, व्हीलेज कोर्ट. ही नावे वेगळी वाटत असली तरी त्यांची कार्यपद्धती एकच आहे. जातीची (खोटी) प्रतिष्ठा जात पंचायतीकडून नियंत्रित केली जाते. बहुतांश जातीत जात पंचायतीचे वर्चस्व आहे. जातपंचायत म्हणजे, जातीमधील जातीयवाद आहे. जात बांधवांच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांवर ही पंचायत नियंत्रण ठेवते. कायदे बनवते, स्वतःच न्यायनिवाडे करते. एरवी, विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र, जातीतील कोणताही विवाह पंचांच्या संमतीशिवाय करताच येत नाही. मुला-मुलीच्या मागील पाच पिढ्यांचा शोध घेत त्यात काही खोट निघाल्यास पंच तो विवाह फेटाळून लावतात. कुणी मुलीने आंतरजातीय विवाह केल्यास तिच्या अंत्यसंस्काराचे विधी आईवडिलांना तिच्या जिवंतपणीच घालावे लागतात. मुलगी मेली, असे समजून तिच्याशी संबंध तोडले नाही, तर त्यांनाही जात बहिष्कृत केले जाते. आपल्या जातीत इतर जातीचा संकर होऊ नये, आपली जात शुद्ध राहावी, याची काळजी पंच घेतात. कुणी आंतरजातीय विवाह केल्यास ते देवाच्या इच्छेविरुद्ध आहे, असा पंचांचा दावा असतो. त्यामुळे अशी नवी पिढी जगात येण्याअगोदर गर्भवती महिलांना संपवले जाण्याच्या घटना उघडकीस येत राहतात.
मागील आठवड्यात सोलापूरमध्ये अशीच एक ‘ऑनर किलिंग’ची घटना उघडकीस आली. कोल्हापूरमध्ये मागील वर्षी एक प्रकरण घडले. अहमदनगर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडतात. तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे झालेल्या एका ऑनर किलिंगच्या मागेे जातपंचायतीचा दबाव असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समोर आणले. अंनिसकडे ‘जात पंचायत’च्या आलेल्या तक्रारींमध्ये बहुतेक आंतरजातीय विवाह केल्याने बहिष्कृत केल्याच्या आहेत.
भारतात जात आणि पितृसत्ता यांच्यातील संबंधामुळे आंतरजातीय विवाहात अडसर येतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंतासाठी विषमतेला आधार देणाऱ्या धर्मग्रंथांची चिकित्सा व आंतरजातीय विवाह हे उपाय सांगितले आहेत. ‘रक्त संबंधानेच आपुलकीची भावना निर्माण होते. सामाजिक जीवनात एकसूत्रीपणा आणणारी शक्ती या दृष्टीने हिंदूंना आंतरजातीय विवाहाची अत्यंत आवश्यकता आहे’, असे मत त्यांनी ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट्स’ या ग्रंथातून मांडले. पण बहुतांशी आंतरजातीय विवाह प्रेमसंबंधातूनच होतात. जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.
‘सैराट’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरूनही बरीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्या देशभरात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पटकन स्वीकारले जात नाही. आंतरजातीय विवाह करणे आजही समाजात अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. प्रत्येक जातीला आपल्या जातीच्या शुद्धतेसाठी जातीअंतर्गत विवाह गरजेचे वाटतात. असे असले तरी मिझोरममध्ये सर्वात जास्त म्हणजे, ५५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. ‘इंडियन ह्युमन डेव्हलपमेंट’ने केलेल्या या सर्व्हेमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणानुसार भारतात फक्त ५ टक्के आंतरजातीय विवाह होतात. दरम्यान, भारतात स्वजातीय विवाह होण्याचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे. तेथे ९९ टक्के नागरिक त्यांच्याच जातीतील व्यक्तीशी विवाह करतात. पंजाबमध्ये ९७ टक्के विवाह स्वजातीत होतात. त्यामुळे ही दोन राज्ये ऑनर किलिंगमध्ये अग्रस्थानी आहेत.
आपल्याकडे ‘ऑनर किलिंग’ची चर्चा होते; पण ‘ऑनर क्राइम’ची होत नाही. ‘सैराट’मधील ऑनर किलिंगबदल चर्चा झाली; पण जात पंचायतीत बापाने अपमानास्पद तोंड झोडून घेण्याच्या शिक्षेबद्दल कुणी बोलले नाही. जात पंचायतीकडून महिलेला परपुरुषाचा झालेला स्पर्श, हे पाप समजले जाते; आंतरजातीय विवाह तर दूरच. पुन्हा जातीत घेण्याचे विधीही अमानुष असतात. दोन्ही परिवारांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. खरे तर घटनेच्या कलम २१ नुसार, व्यक्तीला मानवी प्रतिष्ठेसह जीवन जगण्याचा अधिकार आहे. कलम १९नुसार व्यक्तीला मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु जात पंचायतीच्या कार्यपद्धतीमुळे यावर गदा येते. ‘अंनिस’च्या मोहिमेमुळे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जात पंचायतीच्या अमानुष शिक्षांमुळे प्रसारमाध्यमांनी तो विषय लावून धरला. त्यामुळे जात पंचायतीच्या मनमानी विरोधात कायदाही आला. या कायद्यामुळे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळणार, हे एका पातळीवर खरे असले तरीही आंतरजातीय विवाहातल्या अडचणी लक्षात घेता नवीन कायदा होणे गरजेचे आहे. तसा तो वेळीच नाही झाला तर कधी काळी लैला-मजनूच्या वाट्याला आलेले मरण यापुढेही टळणार नाही.
प्रेमाची जत्रा!
नुकतेच प्रेमात पडलेल्या, प्रेम परिपक्व झालेल्या किंवा अगदी प्रेमविवाहाचाही सुवर्णमहोत्सव झालेल्या जोडप्यांसाठी लैला आणि मजनू हे दोघे म्हणजे आदर्श प्रेमवीर... प्रत्येक आदर्शामागे एक कथा असतेच. त्यातून लैला-मजनू कसे सुटतील? पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील बिजनौर हे गाव. लैला-मजनूच्या प्रेमाला दोघांच्याही घरच्या मंडळींचा विरोध होता. त्या वेळी त्यांनी आजच्यासारखेच केले... ‘हम ने घर छोडा है, रस्मों को तोडा है’ असे गाणे लैला-मजनू गायले नसतील; पण कृती मात्र गाण्यातल्यासारखीच केली. ते दोघेही आपापल्या घरांतून पळाले. पिण्याच्या पाण्याच्या शोधात ते बिजनौर गावी येऊन पोहोचले. याच गावी असलेल्या लैला-मजनू यांच्या कबरींचे दर्शन घेण्यासाठी हजारो लोक येत असतात. न चुकता. दरवर्षी. यंदाचे वर्षही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. लैला-मजनूच्या नावे भरणाऱ्या जत्रेत इतर जत्रेसारखेच रंगीबेरंगी वातावरण असते. एका बाजूला विविध वस्तूंचा जंगी बाजार, तर दुसऱ्या बाजूला कव्वाली, कुस्त्यांची दंगल, व्हॉलीबॉल स्पर्धा असे नानाविध मनोरंजन प्रकार सुरू असतात. मात्र या जत्रेच्या बाजारात प्रेम विकले जात नाही, हे अजून एक सुदैव. शेवटी, अजोड प्रेमाची संकल्पना शाश्वत आहे. तिला एक मूल्याधार आहे. तिच्यावर सर्वांचाच समान हक्क आहे. असायलाच हवा. कारगिलचे युद्ध होण्याआधी ही मजार पाकिस्तानी नागरिकांनाही खुली होती. त्यानंतर मात्र आता त्यांच्या इथे येण्यावर भारतात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. देशभरातून आता दरवर्षी हजारो लोक येतात. लैला-मजनूच्या कबरीवर चादर घातली जाते व प्रार्थना म्हटल्या जातात. प्रेमी युगुले लैला-मजनूच्या प्रेमाला साक्षी ठेवून आपल्या प्रेमाचे प्रतिबिंब त्यात पाहतात.
कृष्णा चांदगुडे
krishnachandgude@gmail.com
बातम्या आणखी आहेत...