आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Ramavat Article About Korku Tribal People

'अनुभूती'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही वर्षांत कुपोषण कमी करण्यासाठी कोरकू आदिवासी भागात नीड्स संस्थेद्वारे ‘नैवेद्यम्- ग्रेन बँक’ हा कार्यक्रम राबवत असताना लक्षात आलं की, आवश्यक त्या प्रमाणात धान्य गोळा होत नाही. मग काय करावं जेणेकरून युवक यासाठी पुढे येतील, याचा विचार करू लागलो. पण जोवर त्यांना सत्य स्थिती माहीत नसेल, आदिवासींबद्दल माहिती नसेल तोवर हे कठीण आहे, हे लक्षात आलं. मग सुचलं की, या मित्रांना कोरकू आदिवासी समाजाची, त्यांच्या विश्वाची सफर घडवू या, अनुभूती देऊ या. कारण अनुभूती तर आत्म्याला जाणवणारी गोष्ट आहे! नंतरच बंध जुळतील आणि कुपोषण कमी करण्याच्या कामी अाणखी हात एकत्र येतील. या शिबिराचे तीन पैलू आहेत – एक तर आयोजक म्हणून अगदीच नवाड्या, कॉलेजगोइंग मुलामुलींचा समूह ज्यांनी कधीच असा अनुभव घेतला नाही, त्यांनीच या शिबिराचं आयोजन-नियोजन, संपर्क आणि आर्थिक गणितं अशा सगळ्याच गोष्टी शिकायच्या, हा सर्वात मोठा टास्क. म्हणजेच अनुभूतीचे आयोजक एफवाय, टीवायचे मुलंमुली. ज्यात या कॅम्पेनमध्ये त्यांना स्वतःला खूप खूप कष्ट करावे लागतील. कॉलेज कॉलेज फिरून, कट्ट्याकट्यावर बसून लोकांना आपली कन्सेप्ट सांगावी लागेल.

दुसरा पैलू – जसे आदिवासी बांधव प्रवास करतात त्याच मीटरगेज रेल्वे गाडीत आणि तेही जनरलमध्ये प्रवास करावा, जेणेकरून आदिवासी कसं जीवन जगतात, हे कळेल. गावात एका अनोळखी कोरकू परिवारात सदस्य म्हणून राहायचं, त्यांचं आणि त्यांच्यासोबत काम करायचं, तसंच जगायचं, हा विलक्षण अनुभवाचा क्षण. सोबतच त्यांची संस्कृती किती प्रगल्भ आहे, जे जवळून पाहायचं भाग्य. घरात खायला दाणा नसेल, रोज बुटलंभर तेल विकत आणावं लागत असेल तरी पाहुण्यांचं आदरातिथ्य कसं करायचं, ते त्यांच्याकडून शिकायचं. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गावात त्यांची संस्कृती जपली जावी म्हणून त्यांच्याच परिसरात त्याच्या परंपरा जपत त्यांना रोजगार मिळावा, हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घ्यायचे. त्याचा मोबदला म्हणून, व्याख्याता जसं मानधन घेतो तसं त्यांना द्यावं. त्यांना रोजगार मिळावा, असा उद्देश ठेवून आखलेला हा कार्यक्रम; ज्यात त्यांची वाद्यं, नृत्य, गिर्यारोहण, पारंपरिक दागिन्यांचं प्रदर्शन, घरातील व शेती साहित्याचे प्रदर्शन यांचा अनुभव घ्यायचा आणि मोबदल्याच्या रूपात धान्य, रोख रक्कम द्यायची. जेणेकरून संस्कृती जपली जाईल, रोजगारही निर्माण होईल. कारण रोजगाराअभावी पूर्ण गावंच्या गावं स्थलांतर करतात. यात महिला आणि मुलांचे असह्य हाल होतात. त्यांच्यावर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार होतात. म्हणून गावातच रोजगार निर्माण करण्याचा हा प्रयत्न. ज्या घरात आपण सदस्य म्हणून राहिलो, जेवलो, तिथलं आपल्या वाटचं आणि त्याहून थोडं जास्त अन्नधान्य त्यांना द्यायचं.

तिसरी बाजू अशी की, गावातील गरजा ओळखून आपण त्यासाठी जे आपल्या गुण, कौशल्याने शक्य आहे ते करायचं. त्यात आर्थिक मदतीपासून स्वतःच्या कौशल्याने निर्माण करता येणाऱ्या रचनात्मक कामाचाही समावेश असेल. सदस्य म्हणून त्या कुटुंबासाठी जबाबदार बनावं. हेच साध्य झालंय या अनुभूतीतून. चांगली नाती निर्माण झाली. लोकांनी गावं दत्तक घेतली. आमची मुलं त्या कुटुंबात दत्तक गेली. असं शिबिर म्हटलं की, पहिला प्रश्न उठतो तो मुलींच्या सुरक्षिततेचा. पण लैंगिक अत्याचार या आदिवासींमध्ये घडत नाहीत. तसंच एखादा गरीब कोरकू भुकेने मरेल, पण अपयशाने खचून आत्महत्या करणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, महिलांचे स्थान तिथे बरोबरीचे आहे. खरं अर्थशास्त्र येथे कळतं, मर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालणाऱ्या आदिवासी समुदायाकडून. कोरकूंचे स्थलांतर थांबवण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. त्यांच्या सुंदर आणि विलक्षण अशा संस्कृतीला जपून त्यांचेच प्रदर्शन आणि अनुभूती दुसऱ्यांना देऊन जर एका गावात रोजगार निर्माण होत असेल तर आम्ही केलेला प्रयत्न एका परिवाराची चूल बारा महिने नक्कीच पेटवण्यासाठी प्रेरक ठरेल, अशी आशा वाटते.

कृष्णा रामावत, अकोला
krishna.ramavat@gmail.com