मासिक पाळी, एमसी म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात त्या फक्त महिला. मान्य, की मासिक पाळी फक्त महिलांनाच येते. पण याचा अर्थ असा होत नाही की पुरुषांचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. खरे तर मासिक पाळीशी पुरुषांचा जवळचा संबंध अाहे. मासिक पाळी यायच्या आधी फिलोपियन ट्यूबमधून येणारे प्रत्येक स्त्रीबीज जन्मासाठी पोषक असते. गर्भाशय त्याच्या पोषणासाठी रक्ताचा स्तर आत तयार करते. म्हणजे जन्मा अाधीचं पहिलं पोषण तेच करते.
आपल्या जन्माआधी आपल्या आईच्या शरीरात पण हीच प्रक्रिया पार पडली आहे. मग अाता सांगा मासिक पाळीशी कसा पुरुषांचा संबंध नाही?
आई होणे हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे, असे म्हणतात. तिच्या आई होण्याचा उत्सव आपण साजरा करतो. मग ज्यामुळे तिला हे आईपण प्राप्त होते ती मासिक पाळी किळसवाणी कशी असू शकते? मुलगी वयात येते म्हणजे जेव्हा तिला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा आपण का उत्सव साजरा करत नाही? काही ठिकाणी होतही असेल. पण बहुतांश ठिकाणी आजच्या तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या युगातही मुलींना पाळी अाल्यानंतर त्यांना अस्पृश्याप्रमाणे वागणूक दिली जाते. तथाकथित सुशिक्षित समाजात आजही मुली या विषयावर मोकळेपणाने बोलत नाही. एवढेच काय तर सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी वडिलांकडे, पतीकडे पैसे मागतानादेखील त्यांना लाज वाटते. इथेच खरी महत्त्वाची भूमिका असते पुरुषांची. पुरुषांनी पुढाकार घेऊन ही चुप्पी तोडली पाहिजे. का आपण बोलायला लाजतो? घरी आई, बायको, बहीण, मुलगी यांच्यासोबत आपण या विषयावर संवाद साधला पाहिजे. जोपर्यंत हा संवाद होणार नाही, तोपर्यंत या विषयातील अज्ञान, गैरसमज दूर होणार नाही.
२८ मे हा जागतिक महावारी स्वच्छता दिवस. म्हणजे हा दिवस महिलांपुरता मर्यादित नाही. तर यात मोठ्या प्रमाणात पुरुषांनीही सहभागी झाले पाहिजे. हा विषय घेऊन जेव्हा मी ब-याच ग्रामीण, शहरी भागातील महिलांना, मुलींना प्रशिक्षण दिले तेव्हा एका तिरकस नजरेचा सामना मला नेहमीच करावा लागला. मासिक पाळीशी संबंधित सर्व माहिती एका पुरुषाने का द्यावी, पुरुषांना मासिक पाळी थोडीच येते, मग त्याला काय करायचे ही माहिती जाणून, ट्रेनर म्हणून पुरुष कसा काय, महिला ट्रेनर नाही का अशा एक ना हजार प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. खरे तर ट्रेनिंग महिलांसोबतच पुरुषांनाही देण्याची गरज आहे. माझ्यासोबत घडलेल्या काही प्रसंगांतून मला हे प्रकर्षाने जाणवले. ‘रेड डेज टू ग्रीन डेज’ हा उपक्रम किशोरावस्थेतील प्रत्येक मुलीपर्यंत पोहचावा यासाठी आम्ही शाळेतील मुलींसाठी ही कार्यशाळा घेतो. त्यासाठी मी शहरातील एका नामांकित शाळेतील मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो, त्यांना विषय सांगितला. तर ‘अरे, हा महिलांचा विषय आहे, तर तुम्ही आमच्या महिला शिक्षिकांसोबतच बोला, त्या तुमच्यासोबत कार्यशाळेत असतील,’ असे उत्तर मिळाले. तसेच काही मित्रांना जेव्हा कार्यशाळेला हजर राहा असे सांगितले, त्या वेळी एका मित्राचा ‘मी पुरुष आहे, मला थोडी येते मासिक पाळी. मग, मी काय करणार त्या कार्यशाळेत येऊन?’ असा सूर ऐकून धक्का बसला. सुशिक्षित वर्गात जर अशी उदासीनता असेल तर ग्रामीण भागातील अशिक्षित पुरुषांकडून काय अपेक्षा करणार. मासिक पाळी महिलांचा विषय असला तरी त्यात पुरुषांचा मोठा वाटा आहे, त्यांची मोठी जबाबदारी आहे, हे आपण विसरतो. आणि पुरुष, मला नाही येत मासिक पाळी, असे म्हणून कानाडोळा करून त्यातून बाजूला होतात.
स्त्री-पुरुष समानतेचे मोठे पर्व साजरे करत असताना एकीकडे अजूनही पुरुषप्रधान संस्कृती लख्ख जाणवते. अशा वेळेला घराचे आर्थिक बजेट बसविताना स्त्रियांचे फक्त काही सुझाव असतात, शेवटचा निर्णय मात्र पुरुषांचा असतो. यावेळी पुरुषांची जबाबदारी आहे की, ते सुझाव समजून घ्यावे आणि अगदी सहज मान्यही करावेत. महिन्याच्या बजेटमध्ये मिठाप्रमाणे सॅनिटरी नॅपकीनचादेखील अंतर्भाव असावा. ही तर झाली आर्थिक बाजू, पण यासोबत मानसिक जबाबदारीदेखील असते. आपल्या घरात आई, बायको, बहीण, मुलगी यांची प्रत्येक महिन्यात ४-५ दिवस विशेष काळजी घेण्याची जबाबदारी त्या घरातील पुरुषांची आहे. या काळात महिलांना होणारा त्रास, त्यांची चिडचिड समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्यांचा त्रास तर आपण घेऊ शकत नाही, तर किमान ‘काय तुझे हे प्रत्येक महिन्याचे नाटक आहे’ असे त्रासदायक शब्द तरी आपण वापरायला नको. या वेळी महिलांना गरज असते ती मानसिक आधाराची आणि तिचा तो आधार आपण आहोत, हे पुरुषांनी समजून घ्यावे.
महिन्यातील या दिवसात आईला, पत्नीला घरकामात थोडी मदत करून तिला आराम करू द्यावा. बहीण, मुलगी यांच्यावर चिडचिड करण्यापेक्षा त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवा, त्यांना काय हवे, याची विचारपूस करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरात खुला संवाद असावा. जर घरातील महिला पुरुषांसोबत या विषयावर बोलायला लाजत असतील तर पुरुषांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत बोलले पाहिजे.
या काळात महिलांचा आहार, स्वच्छता या विशेष काळजी घेण्याचे काम पुरुषांचे आहे. तसेच महिलांना काही त्रास असल्यास, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांची तपासणी करणे हीदेखील पुरुषांची जबाबदारी आहे. जोपर्यंत पुरुष स्वत: आपली जबाबदारी, आपला रोल ओळखून ही चुप्पी तोडणार नाही, तोपर्यंत याविषयी जगजागृती होणे अशक्य आहे. आतापर्यंत दुर्लक्षित मेन्सेसमध्ये पुरुषांचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येकाने तो ओळखावा.
आपण काय
करू शकतो?
— आई किंवा पत्नीची घरात अचानक चिडचिड सुरू झाल्यास त्यामागील कारण मासिक पाळी असू शकते. तिची नीट दखल घ्या, समजून वागा.
— या काळात त्यांना नेमक्या काय वेदना होत आहेत, यासंबंधी विचारपूस करून मलम लावणे, कंबर दुखत असल्यास शेकण्यासाठी साहित्य देणे, त्यांना बरे वाटेल असे वातावरण ठेवा.
— आई, पत्नी, बहीण, मुलगी यांच्यासोबत या विषयावर संकोच न ठेवता बोला, त्यानेही त्यांचा त्रास कमी होईल.
— दर महिन्याच्या बजेटमध्ये मिठाप्रमाणे सॅनिटरी नॅपकिनचाही अंतर्भाव असू द्या. त्यामुळे घरातील महिलांची धावपळ होणार नाही.
— ‘काय तुझे हे प्रत्येक महिन्याचे नाटक आहे,’ असे त्रासदायक शब्द वापरणे टाळा.
— सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवसात आईला, पत्नीला घरकामात थोडी मदत करून तिला आराम करू द्या.