आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Krishna Tidke Story About Shweta Karwa From Jalna

जालन्याची Google गर्ल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाने किंवा मुलीने दहावी/बारावीत 95 टक्क्यांच्या वर मिळवले की जन्माचे सार्थक झाले, असे अनेक पालकांना वाटते. परंतु यापेक्षा कमी गुण मिळवूनही चांगली नोकरी आणि पुढे चांगले करिअर करता येते, हे आपल्यापैकी अनेक जण विसरून जातात. इतके गुण न मिळवताही केवळ अंगभूत गुणवत्तेच्या आधारे गुगल या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी पटकावणारी जालन्याची श्वेता करवा ही याचे उत्तम उदाहरण.
अवघ्या 22 वर्षांच्या श्वेताला गुगल यूएस या कंपनीने तब्बल 1 कोटी रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली आहे. श्वेता सध्या दिल्ली आयआयटीमध्ये मॅथेमॅटिक्स अँड कॉम्प्युटर या विषयातील एमटेकच्या अंतिम वर्षात शिकत आहे. श्वेताने 10 इतर प्रतिष्ठित कंपन्यांच्या मोठ्या पगाराची ऑफर बाजूला ठेवून गुगलची निवड केली आहे. कमी वयात इतके मोठे यश मिळवलेल्या श्वेताला दहावी आणि बारावी परीक्षेत किती गुण मिळाले असतील याचा विचार केला तर मुलांकडून टक्केवारीचा हव्यास ठेवणे निरर्थक आहे हे स्पष्ट होते. श्वेताला दहावीत 82 तर बारावीत विज्ञान शाखेतून 83 टक्के मिळाले होते. मात्र पालकांनी तिला तिच्या अभ्यासापासून करिअर निवडीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच आई-वडील स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही तिला मनाप्रमाणे आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करता आली.
० अपयशाने खचले नाही
श्वेताला अनेक वेळा निराशाही आली. मात्र ती कधी डगमगली नाही. ‘दहावीत 82 टक्के गुण मिळाल्याने मी निराश झाले. मात्र निकाल हाती येईपर्यंत माझी आयआयटीची तयारी सुरू झाली होती व पहिल्या मंथली टेस्टचा निकाल माझ्या मनासारखा लागला होता. त्यामुळे माझी निराशा दूर झाली. त्याशिवाय जेईई परीक्षेत किमान 300 पर्यंत रँक मिळेल असे वाटले होते. पण मला 722 रँक मिळाली. पण खचून न जाता मी पुन्हा नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने सुरुवात केली.’ त्याचा मला निश्चित लाभ झाल्याचे ती म्हणाली.
० आत्मविश्वासाने दिली मुलाखत
‘जॉबसाठी मी गुगल यूएस, रॉकेट फ्युएल आणि गोल्डमन सॅक्स असा प्राधान्यक्रम ठरवला होता. एकाच दिवशी 7 कंपन्यांच्या मुलाखती होत्या. सकाळी मुलाखती सुरू झाल्या तेव्हा काही प्रमाणात चिंता होती. मात्र अभ्यास चांगला झालेला होता, म्हणून चिंता सोडून आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जायचे ठरवले. त्यामुळे सुरुवातीच्या मुलाखतीमध्येच मला गोल्डमन सॅक्सने मोठी ऑफर दिली. एक जॉब हातात असताना मी निश्चिंत झाले. त्यामुळे माझे ध्येय असलेल्या गुगल यूएसची मुलाखत सुरू झाली तेव्हा मी टेन्शनफ्री झाले व मला मोकळेपणाने मुलाखत देता आली. मुलाखतीत उत्तर बरोबर की चूक यापेक्षा तुम्ही उत्तराच्या किती जवळ पोहोचता, त्यासाठी तुमची विचारप्रक्रिया काय होती, याचा विचार केला जातो. त्यामुळे उत्तर देता आले नाही तरी चालेल, परंतु प्रत्येक उत्तराला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. कॅम्पससाठी मी चार महिने सलग 18 तास अभ्यास केला होता, या काळात फक्त दोन चित्रपट पाहिले, अन्य वेळ अभ्यासात घालवला. मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणेही टाळले. त्यामुळे माझी तयारी चांगली झाली होती.
० फॉर्मल ड्रेस आणि हाय हिल्स
‘एकाच दिवशी विविध कंपन्यांच्या मुलाखती मी दिल्या. फॉर्मल ड्रेस, त्यावर ब्लेझर आणि हाय हिल्सचे शूज असा पेहराव होता. त्यामुळे आयआयटीच्या मोठ्या कॅम्पसमध्ये एका मजल्यावरून दुस-या मजल्यावर जाताना फार त्रास झाला. मुलाखतींचे टेन्शन होतेच. एका क्षणी, आता बस्स... बंद करावे हे सारे असे वाटले. परंतु गुगलची एक मुलाखत बाकी होती आणि माझे स्वप्न तेच होते. त्यामुळे हा थकवा विसरून त्या मुलाखतीला गेले.’
० आईचेही योगदान
श्वेताची आई प्रतिभा जालन्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. परंतु श्वेताने आयआयटीच्या तयारीसाठी कोट्याला क्लास सुरू केल्यानंतर त्या प्रॅक्टिस सोडून मुलीसोबत तिकडे गेल्या. आयआयटीची तयारी करत असताना तिला मानसिक आधार देणे आवश्यक होते म्हणून आपण दोन वर्षं श्वेतासोबत कोटा येथे राहिल्याचे डॉ. प्रतिभा यांनी सांगितले.
० तिला स्वातंत्र्य दिले
‘जालन्यात आमचा दवाखाना आहे, त्यामुळे तिने वैद्यकीय क्षेत्रात यावे अशी अपेक्षा मी तिच्याकडे ती आठवीत शिकत असताना व्यक्त केली होती. मात्र, माझे गणितावर प्रेम आहे, मी तो विषय सोडणार नाही, असे तिने सांगितले होते. त्यामुळे त्यानंतर आम्ही तिला या संदर्भात कधीही विचारणा केली नाही.’ तिचे करिअर निवडण्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे डॉ. महेंद्र करवा यांनी सांगितले.
० विचार थोपवणार नाही
गुगलमध्ये एक कोटीचे पॅकेज मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमधून आल्यानंतर श्वेता रातोरात स्टार झाली. तिला अनेक शाळा-महाविद्यालयांमधून बोलावणे सुरू झाले आहे. दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याची संधी मिळाली असताना त्यांनी विविध प्रश्न विचारले, ‘तेव्हा मी त्यांच्यावर माझे विचार थोपवले जाऊ नयेत, याची काळजी घेतली. एखादी परिस्थिती ‘पर्सन टू पर्सन’ वेगळी असू शकते, असे मला वाटते म्हणून मी कुणावर माझे विचार थोपवणार नाही,’ असे ती स्पष्ट सांगते.