आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णमूर्तींचे ‘बघणे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखात आपण कृष्णजी श्रवण कशाला म्हणतात ते बघितले. ते वाचल्यावर आपल्याला ऐकायला शिकावे लागेल हे लक्षात येते. तीच बाब बघण्याची आहे. कृष्णजी म्हणतात की, आपण बघतच नाही. अशा वेळी आपला अहंकार त्यांना विचारील की, आम्ही काय आंधळे आहोत की काय...

ही बाब पुन्हा बिरबलाच्या डोळस आणि आंधळे यांच्या गोष्टीसारखीच आहे. आपल्याला डोळे आहेत याचा अर्थ आपल्याला बघता येतेच असे नाही. ते म्हणतात, ‘वृक्षाकडे तुम्ही कसे पाहता... शब्द मध्ये न आणता वृक्ष चंद्राची कोर किंवा आकाशातील एखादा तारा कधी पाहिले आहेत का... शब्दांच्या मध्यस्थीशिवाय, लुडबुडीशिवाय हे तुम्ही कधी पाहिले आहेत का? कारण शब्द म्हणजे प्रत्यक्षातील तारा, चंद्र नव्हे. म्हणून शब्द बाजूला ठेवून तुम्ही कधी पाहू शकता काय... तुमच्या पतीकडे-पत्नीकडे शब्दाशिवाय, तुमच्या अगदी जवळच्या संबंधाच्या आठवणीशिवाय, भूतकाळातील स्मृतीशिवाय आपण पाहू शकतो काय... शब्दांशिवाय साचत आलेले अपमान, दुखापती बाजूला ठेवून तुम्ही कधी पाहिलेले आहे काय... तुमच्या मनात तयार केलेल्या प्रतिमांशिवाय पाहू शकाल त्याच वेळी तुम्ही व ते यात योग्य तो संबंध प्रस्थापित होईल.’

हे वाचल्यावर लक्षात येते की, आपण या पद्धतीने कधीच बघितले नाही. शाळेत आपण ज्याला शिक्षण म्हणतो, त्यात इतक्या साध्या -सोप्या गोष्टी कधी शिकवल्याच जात नाहीत. श्रवण आणि बघणे या बाबींची कृष्णजींची संकल्पना बघितली की वाटते, हीच खरी जीवनकौशल्ये आहेत. ही कौशल्ये आम्हाला कधी शिकवलीच गेली नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी पंडित झालो. पैसे कमावले, पण आमच्या साध्या साध्या कृतीत आम्हाला आनंद घेता आला नाही. साधे फूलझाडाचे पानझाड आम्ही या नजरेने बघू शकलो नाहीत. त्यामुळे आमच्या उथळ जगण्याला उत्तेजित करायला आम्ही टीव्ही, मासिके, कामुक वाङ्मय, खेळांचे सामने आणि इंटरनेट गरजेचे झाले. इतके सारे बघूनही त्या बघण्याला उंची किंवा खोली आली नाही.

आमच्या सौंदर्याच्या रसग्रहणावरही ते असाच आक्षेप नोंदवतात. ते म्हणतात, ‘किती लोक पर्वताकडे-मेघांकडे पाहतात... लोक त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकतात. त्यावर काही टीकाटिप्पणी करतात व लागलीच पुढे चालू लागतात. येथे शब्द हावभाव व भावना या गोष्टीआड येत असल्याने खरेखुरे पाहणे घडून येत नाही. सामान्यत: एखादे फूल बघितले की, त्याला नाव देण्यात येते, त्याचे वर्गीकरण करण्यात येते आणि तेथेच सारे संपते. एखाद्या कमानीतून किंवा खिडकीतून एखादे चित्र पाहिले की, लागलीच म्हणता, हे चित्र मध्ययुगीन चित्रासारखे आहे. तुम्ही पूर्वग्रह व चिंता घेऊनच हे सारे बघता.. समोर सूर्यप्रकाशाने उजळलेला पर्वत, त्याचे प्रथम दर्शन घेणे, हा पूर्वी कधीही पाहिला नव्हता अशा वृत्तीने तो पाहणे, शून्यतेमध्ये न्हाऊन निघालेल्या डोळ्यांनी तो पाहणे, ज्ञानसंभाराने न भारावलेल्या दृष्टीने तो पाहणे हा अनुभव अलौकिक आहे...’

मला वाटते या थेट मांडणीवर स्पष्टीकरण गरजेचे नाही. जेव्हा आपण एखादी बाब बघू तेव्हा ते प्रतिमाविरहित बघायचे. पण सुरुवातीला पूर्वग्रह प्रतिमा येणारच. कृष्णजी त्याला वगळायला सांगत नाहीत, तर ती बाब बघताना तुमच्या मनात उठणारे तरंग पूर्वग्रह यांचेही ते अवलोकन करायला सांगतात. दिसणारी वस्तू बघणारा यासह अवलोकन करताना लक्षात येते की, द्रष्टा आणि दृश्य हे एकच असते. कृष्णमूर्ती शाळेत रोज संध्याकाळी मुलांना सूर्यास्ताच्या वेळी जाणीवपूर्वक सूर्यास्त, पक्षी, डोंगर बघायला सांगत. यातून या प्रकारचे बघणे होऊ लागते. कोणत्याही शाळेतला शिक्षक असे प्रयोग करू शकतो. मुलांना सातत्याने निसर्गाचे असे निरीक्षण करायची संधी दिली तर हे घडू शकते. स्वत: कृष्णमूर्ती अशा रीतीने बघायचे. बघताना ते अतिशय उत्कटतेने बघायचे. गोपीनाथ तळवळकरांनी कृष्णजींवर लिहिलेल्या एका छोट्या पुस्तकात एक आठवण सांगितली आहे. त्यांना कृष्णजींना बुद्धावरचे त्यांचे पुस्तक भेट द्यायचे होते. वेळ खूप कमी होता. कृष्णजींना विमान पकडायचे होते. तळवळकर लिफ्टच्या दरवाजाजवळ उभे राहिले. मिनिटाची भेट होणार होती. कृष्णजींनी पुस्तक घेतले आणि त्यांच्याकडे प्रेमाने बघितले. मात्र, तळवळकर लिहितात,‘त्यांनी माझ्याकडे असे पाहिले की आयुष्यभर ते जणू माझाच विचार करत होते...’’