आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kuldeep Deshpande Article About Smart Phone Application,technology, Divya Marathi

आपण सारे 'स्मार्ट' गोंधळाचे साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नंबर हॅक करून कोणालाही कॉल, धोकादायक अ‍ॅप बाजारात’, ‘लिव्ह-इन संबंध ठेवणे हा गुन्हा नाही, पापही नव्हे ’
वरील शीर्षके भिन्न विषयांच्या बातम्यांची. वरकरणी भिन्नच. परंतु बदलत्या सामाजिक वास्तवाला आणि संस्कृतीवरील परिणामांना दर्शवणारी. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानातून निर्माण होऊ घातलेल्या स्मार्ट गोंधळाला, संभ्रमाला अधोरेखित करणारी.

खरे तर तंत्रज्ञान बदलले की संस्कृतीही बदलू लागते. घराघरातील जात्यांची जागा मिक्सरने कधी घेतली, हे लक्षातही आले नाही. तेच तार, फोन, मोबाइल, स्मार्टफोनचे. घरात, कार्यालयात संवाद ‘व्हॉट्सअ‍ॅप ’ पुरता संकोचल्यासारखा झालाय, अशी सध्याची स्थिती. त्यातून नातेसंबंध दृढ होण्याऐवजी सामाजिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहेत. ही सर्वांनाच जाणवणारी गोष्ट आहे. तंत्रज्ञान दुधारी असते म्हणतात. म्हणूनच त्याचा विवेकाने वापर झाला तर चांगले, विधायक घडू लागते. तशी उदाहरणेदेखील समाजात दिसतात, नाही असे नाही. परंतु त्याचे प्रमाण अगदीच कमी आहे.

इजिप्तची क्रांती, युसूफझाई मलालाचे प्रकरण, भारतात अलीकडे झालेले आंदोलन ही तंत्रज्ञान आणि आधुनिक माध्यमांचा वापर करून सामाजिक क्रांती घडवण्याची साधने कशी प्रभावी ठरू शकतात याची उत्तम उदाहरणे ठरावीत. त्याची ताकद कोणीही नाकारू शकणार नाही. नाकारू नये. परंतु गेल्या पाचेक वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर खूप गुंतागुंतीचा झाला आहे, हे वास्तव आहे. वानगीदाखल अ‍ॅप्सचा वापर पाहता येईल. एका अ‍ॅपचे अप्रूप असताना दुसरा अ‍ॅप येऊन धडकतो. नवनवीन अ‍ॅप रोज येऊन आदळतात. परंतु पहिल्या अ‍ॅपचे साइड इफेक्ट निस्तरेपर्यंत दुसरा आल्याने भलतीच समस्या वाचायला मिळू लागली आहे. जणू अ‍ॅप नवीन समस्या घेऊन येत आहे, ते सांगणारी पहिली बातमी आहे. दहशतवाद्यांकडून गैरवापर आणि महिलांच्या छेडछाडीचे धोके त्यातून अधिक वाढताना दिसू लागले आहेत. प्रसारमाध्यमांतून तशा बातम्या येऊ लागल्या आहेत. पहिला अ‍ॅप स्मार्ट, त्याच्याशी दोन हात करणारा दुसरा अधिक स्मार्ट, अशी जणू स्पर्धाच सुरू आहे. प्रश्न मात्र जैसे थे. काही सुटलेही असतील. पण त्याचे प्रमाण अगदी अल्प.

त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या वापरात मश्गूल असलेल्यांचे नातेसंबंधांचे भानही सुटत चालले आहे की काय, असा विचार येतो. तंत्रज्ञानाप्रमाणेच नातेही संभ्रमाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. विवाहबाह्य संबंध, लिव्ह-इन, समलिंगी संबंध आदी प्रश्नांची गुंतागुंत वाढू लागली आहे. संवादाची जागा समस्यांनी घेतल्याचे चित्र दिसते. न्यायसंस्थेकडून यातील काही प्रश्न निकाली निघाले. काही नाकारले गेले. म्हणून ते अनुत्तरित. समस्या तशाच आहेत. हा संक्रमणकाळ असेल, अशी आशा करूया. आपण सारे तूर्त तरी या स्मार्ट गोंधळाचे साक्षीदार आहोत. इच्छा असली किंवा नसली तरीही.

kuldeep.d@dainikbhaskargroup.com