आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रंटियर गांधी : \'बादशाह\'ची बखर ! (कुमार केतकर )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेरी मॅक्लुहान - Divya Marathi
टेरी मॅक्लुहान
‘गांधी’ हा जगप्रसिद्ध चित्रपट बनविला रिचर्ड अ‍ॅटेनबरो या ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शकाने; पण तो प्रदर्शित झाला, हॉलीवूडच्या माध्यमातून. त्यामुळे अ‍ॅटेनबरो हे ‘इंग्लिश-अमेरिकन’ म्हणूनही ओळखले जातात. अवघे जग ज्यांना ‘फ्रंटियर गांधी’ म्हणून ओळखते (खरे म्हणजे आता तर भारतीयांनाही त्यांचे विस्मरण झाले आहे!) त्या खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या जीवनावरील चित्तथरारक डॉक्युमेंटरी उर्फ चरित्रपट बनविला, एका कॅनडियन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिकेने- तिचे नाव टेरी मॅक्लुहान!
लडाख फिल्म फेस्टिव्हल, गोवा आणि पुणे फिल्म फेस्टिव्हल येथेही तो प्रदर्शित केला गेला आणि सर्व रसिक प्रेक्षक भारावून गेले. (जवळजवळ सर्वांनाच ‘गिल्ट फिलिंग’ने खजिल गेले. कारण ज्या माणसाने त्याच्या 98 वर्षांच्या दीर्घ आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगवासात काढली आणि शेवटचा तुरुंगवास 95व्या वर्षी भोगला; त्या महान माणसाची आपल्याला काहीच माहिती नाही, हे प्रत्येकाला जाणवले!)
टेरी मॅक्लुहान यांनी बादशाह खान यांचे चरित्र अमेरिकेत असताना वाचले आणि त्या पूर्णपणे ‘गांधीमय’ होऊन गेल्या; किंवा असेही म्हणता येईल, की त्या ‘बादशाह खानमय’ झाल्या. त्यांना जाणवले, की या समांतर महात्म्याला जगाने तेवढे महत्त्व दिले नाही. एकनाथ ईश्वरन या अमेरिकास्थित चरित्रलेखकाने बादशाह खान यांना नोबेल पुरस्कार मिळावा, म्हणून प्रयत्न केला. त्यांचे नावही संभाव्य नोबेल पुरस्कारांच्या यादीत गेले, पण तो सन्मान त्यांना दिला गेला नाही. (त्याच्या कारणात जाण्याची ही जागा नाही.) पण 1987मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले.
टेरी मॅक्लुहान यांनी बादशाह खान यांच्या संबंधात संशोधन सुरू केले. ती व्यक्ती एका महाचित्रपटाची नायक होऊ शकेल, असे त्यांना वाटले. त्या बादशाह खानच्या शोधात भारतात आल्या आणि त्यांनी त्यांची इच्छा सत्यजीत रे आणि श्याम बेनेगल या श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शकांजवळ बोलून दाखवली. त्या दोघांनी पाठराखण केल्यानंतर मॅक्लुहानबार्इंनी कामाला सुरुवात केली. त्यांना वाटले की, वर्ष-दोन वर्षांत चित्रपट (डॉक्युमेंटरी) पूर्ण होईल. पण जसजशा त्या विषयाच्या खोलात शिरल्या, पख्तुनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत या प्रदेशाच्या भूगोलात शिरल्या, गांधी आणि फ्रंटियर गांधींच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागल्या, तसतसा विषयाचा आवाका अधिक व्यापक होऊ लागल्या. विसाव्या शतकाच्या पूर्व मध्यान्हाला जेव्हा ‘खुदाई खिदमतगार’चे सैनिक बादशाह खानच्या कारवाँमध्ये सामील झाले होते, त्या एक लाख सैनिकांपैकी जेमतेम 70-80 हयात होते. त्यापैकी बहुतेकांना मॅक्लुहानबार्इंनी गाठले, तेव्हा ते 90 ते 105 या वयात होते. त्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून टेरी मॅक्लुहान यांनी तो काळ उभा करायचे ठरविले. परंतु 1988 ते 2009 या 22 वर्षांच्या त्यांच्या संशोधन काळात हा सर्व प्रदेश पुन्हा हिंसाचाराने भडकून उठला होता. दहशतवाद, यादवी, खून, कपट-कारस्थाने या गोष्टींनी दक्षिण आशियाला वेढले होते. (अजूनही आहे आणि आता या वर्षी अमेरिकेने त्यांचे सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घ्यायला सुरुवात केल्यानंतर हा वणवा अधिकच पसरणार आहे.) टेरी मॅक्लुहान या दहशतीच्या वातावरणात अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत या प्रदेशात लोकांना भेटत होत्या- चित्रीकरण करत होत्या, संहिता तयार करत होत्या. टेरी मॅक्लुहान यांच्या या साहसी दिग्दर्शन शैलीची आता जगाने नोंद घेतली आहे! त्या कोणत्या वातावरणात हे चित्रण करीत होत्या?
प्रत्येक घरामध्ये बंदुका, मशीनगन्स, हँडग्रेनेड्स. वयाच्या 10-12 वर्षांपासून प्रत्येक मुलाला खांद्यावर बंदूक बाळगायची सहज सवय. तारुण्यात प्रवेश केल्याबरोबर साधारणपणे दोन खांद्यांवर दोन मशीनगन्स. ‘मरणात खरोखर जग जगते’ या ओळीची साक्ष क्षणोक्षणी मिळावी, असे धकाधकीचे जीवन. स्थैर्य, शांतता, निवांतपणा अशा शब्दांनाही जीवनात स्थान नाही. राहायचंच मुळी हिंसेच्या वणव्यात!
अफगाणिस्तान-पख्तुनिस्तान-नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हणून ओळखला जाणारा भारत-पाकिस्तानच्या सीमेवरचा हा प्रदेश, गेली सुमारे दीडशे वर्षे असाच धुमसतो आहे. फरक पडलाच तर तो शस्त्रास्त्रांच्या आधुनिकतेत. काळानुसार. पूर्वी साध्या बंदुका-एकेक गोळी बंदुकीत घालून उडवायच्या. पुढे गळ्यात काडतुसांच्या माळा आणि फैरी झाडणा-या. त्यानंतर मशीनगन्स, कॅलॅश्निकोव, एके-47 आणि अंगावरच्या वेषात हँडग्रेनेड््स. आपण जितक्या सहजपणे मारू शकतो, तितक्याच सहजपणे मरू शकतो- पण त्याची धास्ती, चिंता, खेद, खंत चेह-यावर नाही. शरीराची कांती वाळवंट, डोंगर, वैराण परिसरामुळे लोखंडासारखी झालेली. डोळ्यात तेज आणि काहीशी बेदरकारी.
तसे पाहिले तर या प्रदेशात तेलाच्या विहिरी नाहीत, की सोन्याच्या खाणी नाहीत. परंतु भौगोलिक स्थान असे की, या प्रदेशातून गेल्याशिवाय दक्षिण आशियावर स्वारी करणे शक्य नाही. अलेक्झांडरपासून ते अरबांपर्यंत, मोगलांपासून ते ब्रिटिशांपर्यंत आणि सोव्हिएत युनियनपासून ते अमेरिकेपर्यंत अनेकांनी या प्रदेशाला (म्हणजेच येथील डोंगरी-वाळवंटी जीवन जगणा-या टोळ्यांना) आपल्या कब्जात आणण्याचे प्रयत्न केले. पण येथील लोकांची स्वाभिमानाची भावना इतकी तीव्र, इतकी उग्र आणि इतकी तेजस्वी की, त्यांना कुणीही नामोहरम करू शकलेले नाही. त्या बंदुका, त्या मशीनगन्स, ती बेदरकारी हे सर्व त्या स्वाभिमानाचे आविष्कार. खांद्यावरची मशीनगन म्हणजे, पठाणी टोळ्यांच्या पुरुषार्थाने झळझळणारे प्रतीक.
बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबात जन्माला आलेले. सर्व पठाण-पख्तुन-अफगाण विशेष (बादशाह खान यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशातील लोकांना, अफगाण किंवा पठाण असे संबोधले जायचे. परंतु ते स्वत: असे म्हणत, की आम्ही पख्तुन आहोत, तीच आमची खरी ओळख आहे.) अंगात सहज आलेले. जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य.
त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांचा जेव्हा जन्म (1890) झाला, तेव्हा या प्रदेशावर इंग्रजी साम्राज्याचा अंमल होता. इंग्रजांचे साम्राज्य बंदूक आणि डावपेच, दहशत आणि कारस्थान यावर उभे राहिलेले. पठाण टोळ्यांना अर्थातच, अशी परकीय राजवट चालणे शक्य नाही. पहिल्या महायुद्धाच्या (1914-1919) अगोदरपासून इंग्रज राजवट अधिकाधिक क्रूर होऊ लागली होती. (उदा. जालियनवाला बाग-1919) तिकडे पठाणी टोळ्या इंग्रजांना आव्हान देत होत्या. भारतातही स्वातंत्र्य भावना पसरू लागली होती. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मध्यमवयीन वकिलाने दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय, वंशद्वेष्ट्या सत्तेच्या विरोधात आंदोलन पुकारलेले होते; परंतु ते आंदोलन होते, सत्याग्रहाचे. अहिंसेने चाललेले. गोपाळकृष्ण गोखलेंनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन गांधीजींना भारतात पाचारण केले होते. गांधीजी भारतात आले, (1914) तेव्हा त्यांना ‘महात्मा’ हे बिरुद लावले गेलेले नव्हते. गांधीजींनी त्यांचे ‘अहिंसेचे’, ‘सत्याचे’, ‘आत्मशुद्धी’चे प्रयोग सुरू केले आणि अवघा देश फिरून त्यांनी लोक कसे जीवन जगतात, देशाची स्थिती कशी आहे, याचा प्रत्यक्ष शोध-वेध घेतला. गांधीजी जेव्हा हा शोध घेत होते, त्याच वेळेस बादशाह खान हे पख्तुनिस्तानमध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारांनी अहिंसेच्या विचाराकडे वळू लागले होते. बंदुकीने, म्हणजेच हिंसेने प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, डोळ्याचा बदला शत्रूचा डोळा फोडून घेतला तर क्रमात अवघे जग आंधळे होईल. अहिंसेने संघर्ष केला तर कदाचित लगेच विजय प्राप्त होणार नाही; पण पराभव तर नक्कीच होणार नाही आणि अंतिम विजय नक्कीच होईल, असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली होती. परंतु पख्तुन, पठाण, अफगाण लोकांना बंदुकीचा, शस्त्रांचा, संघर्षाचा त्याग करायला सांगणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि ‘पुरुषार्था’चाच त्याग करायला सांगण्यासारखे होते. बादशाह खान यांनी अहिंसक सेना स्थापन केली. त्या सेनेचे नाव ‘खुदाई खिदमतगार’ म्हणजेच, ‘ईश्वराचे सेवक’. बादशाह खान यांच्या या सेनेत एक लाखाहून अधिक ‘सैनिक’ सामील झाले.
बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे!
गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात 21 वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. ‘इस्लाम’ धर्म हा शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा आहे आणि इस्लामच्या नावावर हिंसा करणे, विद्वेष करणे, हे तर महंमद पैगंबराच्या शिकवणुकीचा अवमान करणे आहे, असे त्यांचे मत होते.
बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता, हे सिद्ध होते. गांधीजी आणि बादशाह खान दोघांना फाळणी मंजूर नव्हती; कारण धर्माच्या आधारावर देश तोडला जात होता आणि धर्मद्वेषातून हिंसेचा आगडोंब उसळू लागला होता. गांधीजींची 1948मध्ये 30 जानेवारीला हत्या झाली, तीसुद्धा त्याच विद्वेषाच्या वातावरणात. बादशाह खान यांचा गुरू, सहकारी, मित्र, सहाध्यायी, मार्गदर्शक गेला आणि गांधीवादी विचारांचा झेंडा बादशाह खान यांच्याकडे आला. पाकिस्तानला बादशहा खान यांचे तत्त्वज्ञान आणि ‘खुदाई खिदमतगार’चे कार्य मंजूर असणे शक्यच नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो देशद्रोह-धर्मद्रोह-पाकिस्तानद्रोह होता. साहजिकच पाकिस्तानने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि ब्रिटिशांनी जितका काळ त्यांना तुरुंगात डांबले नव्हते, तितका काळ पाकिस्तानने डांबले. त्यांचा शेवटचा तुरुंगवास घडला, तो त्यांच्या 95व्या वर्षी. वयाच्या 98व्या वर्षी 1988मध्ये 20 जानेवारीला बादशाह खान यांचे देहावसान झाले आणि ख-या अर्थाने भारतीय उपखंडातील गांधीपर्व संपले; विचार आणि मूल्यांचा वारसा ठेवून!
अहिंसेचा चित्रसंदेश
गांधीजींनी जेव्हा अहिंसेच्या तत्त्वाचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा पुरस्कार केला, तेव्हा जगभर ‘हिंसा’ हे न्याय प्रस्थापित करण्यासाठीही अपरिहार्य माध्यम आहे, असे मानले जात होते. भांडवलशाही, साम्राज्यशाही, वसाहतवाद, फॅसिझम आणि वर्णद्वेष ज्या हिंसेच्या आधारे उभे आहेत; त्यांचा पराभव मनपरिवर्तनाने, अहिंसेने, सत्याग्रहाने होणार नाही, अशीच बहुतेक विचारवंतांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची धारणा व श्रद्धा होती. मार्क्सवाद- लेनिनवाद असो वा प्रखर राष्ट्रवाद असो, दोघेही हिंसेच्या मार्गाचे समर्थक आणि प्रचारक होते.
त्यातूनच 1924 ते 1945 या काळात हिटलर आणि स्टॅलिन या प्रवृत्ती जन्माला आल्या. हिटलरशाहीचा पराभव प्रखर स्टॅलिनवादच करू शकतो आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीचा आधार जर हिंसा असेल तर त्याचाही मुकाबला हिंसेनेच केला जाऊ शकतो, हे तेव्हा प्रचलित राजकीय विचारप्रवाह होते. अशा काळात साध्याइतकेच साधन महत्त्वाचे आहे, असे सांगून हिंसेचा प्रतिकार अहिंसेनेच केला जाऊ शकतो, हे तत्त्वज्ञान मांडण्यात व ते प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यात विलक्षण धैर्य होते.
गांधीजी म्हणत, त्याप्रमाणे अंधकाराचा सामना अंधार करू शकत नाही; प्रकाश करू शकतो. अज्ञानाचा सामना अधिक अज्ञान करू शकत नाही, ज्ञानच करू शकते. हिंसेचा सामना हिंसा करू शकत नाही; अहिंसाच करू शकते. रिचर्ड अ‍ॅटेनबरोंनी ‘गांधी’ चित्रपट काढला तो केवळ व्यावसायिक यश मिळवण्यासाठी नव्हे; त्यांना गांधीजींचा विचार विविधांगांनी सर्वत्र फुलताना दिसला, म्हणून त्यांनी त्या युगपुरुषाचे चित्रण करायचे ठरवले.
नेमक्या त्याच भावनेतून टेरी मॅक्लुहान यांनी ‘द फ्रंटियर गांधी-ए टॉर्च फॉर पीस’ हा चित्रपट बनवला! गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कोणी सांगितले, तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. नेमके तेच विधान फ्रंटियर गांधींना अधिक प्रकर्षाने लागू आहे. सत्याग्रह आणि अहिंसा ही ‘शस्त्रे’ घेऊन बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचा ‘वेडेपणा’ सुचणा-या गांधीजींच्या आणि फ्रंटियर गांधींच्या चरित्राचा वेध कसा घेणार? पण, त्यांनी असे लाखो वेडे तयार केले. स्वत:ला सर्वात शहाणे समजणा-या ब्रिटिश राज्यकर्त्यांना या वेड्या फकिरांशी सामना करणे अशक्य झाले... आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते या अशा फकिरांमुळे!