आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अथांग आणि अफलातून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुण खोपकर हा एक अफलातून आणि अथांग माणूस आहे. खरे म्हणजे, हे वाक्य वाचल्याबरोबरच तो आक्षेप घेऊ शकेल. ‘अफलातून’ या शब्दाच्या काय काय अर्थच्छटा आहेत आणि जगातला प्रत्येक माणूसच कसा अथांग असतो, यावर तो त्याच्या लाघवी आणि छद्मी भाषेत प्रबोधन करेल. त्याच्या आयुष्यात आलेल्या अस्सल अफलातून आणि अथांग माणसांबद्दल बोलेल वा त्यांची शब्दचित्रं लिहील.

अशा काही माणसांची शब्दचित्रे त्याच्या ‘चित्रव्यूह’ आणि ‘चलत्चित्रव्यूह’ या दोन संग्रहांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. त्या चित्रव्यूहांमधूनच खोपकरांच्या व्यक्तिचित्राच्या अनंत छटा आपल्याला दिसू लागतात; पण धुके जसे हातात पकडता येत नाही, तशा त्या छटा दिसल्या तरी त्या रेखाटणे कठीण आहे. किंवा भुंगा जसा विलक्षण वेगाने आणि अनपेक्षित दिशांनी निमिषार्धात आपल्यासमोरून जातो, तसेच काहीसे खोपकर आपल्याला हुलकावणी देऊन बागेतील कुठच्या तरी फुलांच्या थव्यांकडे जाताना दिसतात आणि दिसेनासे होतात. या दोन पुस्तकांचा संच वाचताना वाचकांना जो हा अनुभव येतो, तोच त्यांना जवळून ओळखणा-यांनाही येतो.

अरुण खोपकर फक्त सिने-दिग्दर्शक नाहीत, जरी चित्रपट हा त्यांचा मुख्य ध्यास आहे. त्यांचे चिंतन-मनन आणि प्रत्यक्ष मनस्वी काम चित्रपटासंबंधात आहे; पण प्रत्यक्षात त्यांना अनेक युरोपीय भाषा अवगत आहेत-जर्मन, फ्रेंच, रशियन. खोपकरांना साहित्याची, संगीताची, चित्रकलेची आणि त्याचबरोबर तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांची जशी सखोल जाण आहे, तशी फारच कमी मराठी अभिजनांना आहे. पण म्हणून त्यांना लौकिक अर्थाने ‘विद्वान’ असे संबोधणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. कारण बहुतेक ‘विद्वज्जन’ सामाजिक- सांस्कृतिक बांधिलकी मानत नाहीत. खोपकर कट्टर बांधिलकीवादी आहेत, पण म्हणून ते प्रचाराला कला असे संबोधत नाहीत आणि काही बांधिलकीवादी जसे स्वत:ला विचारसरणीच्या चौकटीत घट्ट अडकवून घेतात तसे खोपकर घेत नाहीत. मार्क्सवादामुळे मन खुले होते आणि समाजातील सुप्त व प्रगट संघर्षांचे भान येते, असे त्यांना वाटत असावे.

या दोन पुस्तकांमध्ये ज्या व्यक्तिचित्रांचा समावेश आहे, त्यावरूनही खोपकरांच्या कलेबद्दलच्या विचारांची आपल्याला ओळख होते. ‘चित्रव्यूह’मध्ये मामा वरेरकर (आजोबांची बंडी), पु. ल. देशपांडे (ऑल इंडिया रेडिओ), सुधीर पटवर्धन (मुंबईचा चित्रकार) आणि सर्वसामान्य कष्टकरी कामगार (भाषावार प्रांतरचना) आणि ‘चलत् चित्रव्यूह’मध्ये ऋत्त्विक घटक (रॉयल टायगर ऑफ बेंगॉल), नारायण सुर्वे, दादू इंदुरीकर, भास्कर चंदावरकर, मनी कौल (जे न देखे रवी...) यांची वेधक शब्दचित्रे आहेत.

खोपकरांनी ‘हाथी का अंडा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली. ती गोष्ट आहे एका पुस्तकवेड्या मुस्लिम रद्दीवाल्याची. म्हटले तर हा चित्रपट लहान मुलांचा; परंतु प्रत्यक्षात तो ‘एका लहान मुलाच्या दृष्टीतून दिसलेल्या एका थोर माणसाबद्दलचा चित्रपट’ आहे, असे खोपकर म्हणतात. हा चित्रपट खोपकरांनी (मनाने!) भास्कर शेट्टी नावाच्या अनामिक राहिलेल्या माणसाला अर्पण केला आहे. हा भास्कर शेट्टी कोण, तर एक पानवाला. शिवाजी पार्कला पानाच्या गादीवर बसणारा. अरुण जेव्हा तीन-साडेतीन वर्र्षांचा होता तेव्हा या पानवाल्याच्या मांडीवर बसून गि-हाइकांना पानेही बनवून द्यायचा; पण त्याचे भास्कर शेट्टीबद्दलचे आकर्षण होते ते केवळ त्या पानाचे आणि गादीवरील पितळेच्या चकचकीत भांड्यांचे नव्हे; भास्करला अनेक भाषांबद्दल आणि ‘बोलीज्ञान’ कुतूहल होते. तुळू त्याचीच भाषा. मराठी परिसरात वास्तव्य असल्यामुळे मराठी. भास्कर उर्दू शिकत होता. कानडी तर त्याची घरचीच भाषा. तो शिवाजी पार्कच्या बंगाल क्लबमध्ये बंगाली शिकायला जात असे. तो हिंदी शिकला आणि हिंदीतील अभिजात साहित्य वाचू लागला. अगदी प्रेमचंदसुद्धा. मुंबईत गुजराती भाषा यायला व्यावसायिकांना फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. बाकी दक्षिणेतल्या सर्वच भाषा. असा हा ‘बारा भाषा येणारा माणूस’ म्हणजे भास्कर शेट्टी. (‘बारा भाषा येणा-या’ या भास्कर शेट्टीचे दुकान शिवसेनेच्या दंगलीत जाळले गेले. त्याच्या बहुभाषिक पुस्तक संग्रहासकट.)

खोपकर यांच्या या निबंध आणि व्यक्तिचित्रांच्या संग्रहात जी स्मृतिचित्रे येतात, ती फक्त त्या व्यक्ती व त्या प्रसंगापुरती मर्यादित नाहीत. त्यातून जीवनाकडे, कलेकडे आणि एकूण समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन प्रगट होतो. तो दृष्टिकोन हाच या संग्रहाचा व्यवच्छेदक घटक आहे, असे म्हणता येईल. पुस्तकप्रेम हे खोपकरांच्या जीवनातील सर्वात प्रगल्भ, नाजूक आणि तेजस्वी अंग. (त्याबद्दल त्यांचा स्वतंत्र लेख याच अंकात प्रसिद्ध करत आहोत, त्यामुळे येथे वेगळे काही लिहिण्याची गरज नाही.) कोणतीही कला असो वा जीवनातील कोणतीही घटना, भेटणारी व्यक्ती असो वा पाळलेला (वा न पाळलेला) प्राणी, विश्वाचे आकलन असो वा अनाकलनीय अशा जीवसृष्टीबद्दलचे गूढ; या सर्वांशी माणसाचा संबंध येतो तो आपल्या इंद्रियांमार्फत. कानांशिवाय संगीताचा आनंद, दृष्टीशिवाय चित्रपट वा चित्रकलेचा आनंद, स्पर्शाशिवाय जवळिकीतील सुख (वा नफरत), गंधाशिवाय फुले वा अत्तर वा परिसर, जिभेशिवाय विविध आहारातील भन्नाट चवी व त्यातील रसास्वादानंद - हे काहीच शक्य नाही. अवघे आयुष्यच नीरस, बेचव, आनंदरहित आणि अर्थशून्यही होईल.

‘चित्रव्यूह प्रवेश’ या पुस्तकाच्या प्रवेशद्वारात शिरल्याबरोबर खोपकर आपल्याला त्यांच्या अचाट संग्रहालयाची एक भावनिक, बौद्धिक सहल घडवतात. ‘ही अंशचित्रं कुठल्याही आधीच तयार असलेल्या अमूर्त कल्पनेतून निर्माण झालेली नाहीत... एखादं चित्र क्षणचित्र आहे, दुसरं चिरचित्र आहे, तर तिसरं प्रवाही चलत्चित्र आहे... या लेखसंग्रहात दृश्यचित्रांबरोबर ध्वनिचित्रंही आहेत. ध्वनीची जाणीव (आपल्याला) गर्भाशयातच येते. दृष्टीसारखं तिला जन्मापर्यंत थांबावं लागत नाही. दृष्टी कितीही दूरवर पोहोचली तरी शेवटी पाठीला डोळे नसतात... अनेक ध्वनिचित्रे स्मृतीत खोदलेल्या शिल्पांसारखी किंवा गुहाचित्रांसारखी दीर्घायुषी असतात... ध्वनीपेक्षा शरीराच्या निकट येणारी संवेदना म्हणजे गंध... स्पर्र्शचित्र आपल्या अंगाला खेटून उभं राहतं... क्षणभंगुर असलं तरीही... या चित्रव्यूहातील सारी चित्रं ही रसचित्रं व्हावीत ही इच्छा... सर्व इंद्रियांना जागं राहायला लागणं (या चित्रव्यूहाचा संवेदनास्वाद घेण्यासाठी)’

खोपकरांच्या दोन्ही पुस्तकांतील मराठी भाषा हा खरे तर एक स्वतंत्र लेखन वा अभ्यासविषयच आहे. असे ओजस्वी आणि देखणे, लयबद्ध आणि संकल्पनासंपृक्त, विचार प्रवर्तक आणि विचारप्रक्षोभक मराठी हल्ली फारसे वाचायला मिळत नाही.
विशेष म्हणजे, ‘बेगम बर्र्वे’सारखे चाकोरीबाहेरचे विषण्ण करणारे नाटक असो वा रशियातील मन विदारक करणारा अनुभव, मांजराच्या मनोव्यापाराचे उत्कट विश्लेषण असो, जपानी सिनेमा, फिल्म इन्स्टिट्यूटमधील अनुभव असोत वा चार्ल्स कोरियांची सर्जनशील स्थापत्यकला व त्या कलेची विलक्षण सांस्कृतिकता- खोपकरांची शब्दकला कशालाही कवेत घेऊ शकते. खोपकर हे एकाच नव्हे, तर अनेक पठड्यांमधून, विचारप्रवाहांमधून, गटांमधून, चळवळींच्या माध्यमातून, मोर्च्यांमधून फिरले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये, लोकांमध्ये, संस्कृतींमध्ये त्यांचा वावर झाला आहे. प्रत्येक अनुभव ओतप्रोतपणे घ्यावा, प्रत्येक विचार बौद्धिकतेच्या सर्व कसोट्यांवर घासून घ्यावा, प्रत्येक रसास्वाद पूर्णपणे घ्यावा आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करावा, असे खोपकरांना वाटते.

त्या क्षितिजाला भिडू पाहणा-या प्रवासवाटा आणि त्यावरील मुक्तछंदी प्रवास हे सर्व तसे अफलातूनच! खोपकरांच्या अथांगाचा की अथांगाच्या शोधात असणा-या अरुणचा हा चित्तवेधक प्रवास आहे!