आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 च्या डायरीची पाने...(कुमार केतकर )

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणखी दोन दिवसांनी 2014 वर्षाची सुरुवात होईल. कसे जाईल हे वर्ष? काय चांगले आणि काय वाईट लिहून ठेवले आहे, या वर्षाच्या 365 दिवसांच्या दैनंदिनीत? त्या रोजनिशीचे प्रत्येक पान उलगडत जाईल तसतसे आपल्याला कळत जाईल, काय लिहून ठेवले आहे. परंतु भविष्यातील त्या डायरीची पाने आपल्याला अगोदर कळावीत, त्या उद्या होणा-या ‘रोज’ची निशी आजच कळावी, असे प्रत्येकाला वाटत असते. या भावनेवरच ज्योतिषी मंडळी कुंडली मांडून, ग्रह-ता-यांना साक्षीला घेऊन त्या रोजनिशीत डोकावून पाहतात.आपणही ती पुढच्या वर्षीची डायरी उघडून पाहायचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी ग्रह-ता-यांची साक्ष घ्यायची गरज नाही. प्रचलित वास्तवाचे (शक्यतो) अचूक मापन, संभाव्य घटनांचा अंदाज, ज्या गोष्टींचे वेळापत्रक आजच माहीत आहे, त्या गोष्टी कशा उलगडत जाणार याचा वेध आणि नियती कोणकोणते पर्याय देईल याबद्दलचे मापन काही प्रमाणात आपणही करू शकतो.
जगातील सुमारे सात अब्ज लोकांपैकी प्रत्येकाची डायरी तयार आहे! (म्हणजे देव, दैवगती, नियती यांनी ती लिहून ठेवली आहे, असे नाही. कारण त्या रोजनिशीत आपण हस्तक्षेप करून ते पान, म्हणजे तो दिवस आपल्याला पाहिजे तसा आपण लिहू शकतो, बदलू शकतो वा पानच फाडून फेकून देऊ शकतो. पण नियतीवादी म्हणतात, की तो बदल तुम्ही कसा करणार, हेही त्याच नियतीने पूर्वनिश्चित केले आहे! असो.)प्रत्येक व्यक्तीच्या वा कुटुंबाच्या (आणि परस्परांच्या) आयुष्याची रोजनिशी अनेक प्रकारची वळणे घेत जाईल. त्याचप्रमाणे देशाची रोजनिशीही अनेक वळणे घेत जाईल. काही दुर्दैवी-काही आशादायी, काही धक्कादायक, काही अपेक्षित- काही अनपेक्षित.या लेखात मी त्या 2014च्या रोजनिशीत शिरण्याचा प्रयत्न केला आहे; पण माझाही काहीसा गोंधळ उडाला आहे. कारण त्या भविष्यकालीन अंधा-या खोलीत मला चार डाय-या दिसत आहेत. नक्की कोणती डायरी आणि त्यातील कोणती पाने ‘खरी’ ठरतील?
मला कुतूहल ‘माझ्या’ भविष्यकालीन डायरीत नव्हते. कारण माझी दैनंदिनी अखेरीस देशाच्या दैनंदिनीचा एक भाग आहे. म्हणून मी थेट 2014च्या राजकीय घटनांची नोंद असलेल्या चार-पाच डाय-यांची पाने चाळायला सुरुवात केली.
डायरी क्रमांक 1 : 10 एप्रिल ते 10 मेच्या दरम्यान देशव्यापी लोकसभा निवडणुका होतील. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला 182 जागा मिळतील. काँग्रेस पक्षाला 111 जागा मिळतील. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भाजपला सरकार बनवण्यासाठी पाचारण करतील. नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणा-या 273 खासदारांची यादी सादर करण्यास सांगितले जाईल. परंतु भाजपला आणखी 91 खासदारांची खात्रीलायक यादी सादर करण्यासाठी काही वेळ हवा, अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली जाईल. राष्ट्रपती त्यांना सात दिवसांची मुदत देतील. परंतु मोदींच्या उतावीळ समर्थकांना हे सात दिवस म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे, असे वाटल्याने देशभर ‘मोऽऽदी-मोऽऽऽऽऽऽदी’ अशी नारेबाजी, मिरवणुका आणि थोड्याफार मारामा-याही होऊ लागतील. इतर प्रादेशिक पक्षांशी मनधरणी (आणि घोडेबाजार) सुरू होईल. देशभर जो दबाव-धिंगाणा होईल, त्यामुळे त्या दहशतीखाली मोदींना पंतप्रधानपदाची शपथ घेण्याएवढी सदस्यासंख्या मिळेल. नमोंचा शपथविधी होईल. ते पहिल्या 15 दिवसांतच काही सनसनाटी घोषणा करतील आणि त्यामुळे त्यांच्या आघाडीत सामील न झालेले लहान-मोठे-प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष खासदार त्यांना समर्थन देतील.
नरेंद्र मोदी कॅबिनेटच्या काही नेमणुका करतील; बाकी नेमणुका पुढील सहा महिन्यांत होतील, असे जाहीर करतील.
डायरी क्रमांक 2 : नरेंद्र मोदींच्या भाजपाला 162 जागा मिळतील. म्हणजे आणखी 111 जागा पुरवणारे मित्रपक्ष त्यांना मिळवावे लागतील. जयललिता, ममता, मायावती, पटनाईक आदी पक्ष व नेते म्हणतील, की ते एनडीए ऊर्फ भाजपप्रणीत आघाडीला पाठिंबा द्यायला तयार आहेत; पण मोदींच्या नेतृत्वाखाली यायला तयार नाहीत. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांनी एनडीएचे चेअरमन या नात्याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी, असा प्रस्ताव पुढे येईल. अडवाणींच्या नेतृत्वाखाली पटनाईकांचा बीजेडी, नीतिशकुमारांचा जेडीयू, जयललितांचा अण्णाद्रमुक, इतकेच काय; ममतांचा तृणमूल काँग्रेसही यायला तयार होईल. मग खातेवाटपावरून थोडी खळखळ, थोडी बाचाबाची होईल; पण सरकार स्थापन होईल. मोदी समर्थक अस्वस्थ आणि संतप्त होतील, पण मोदींचा अश्वमेध 165च्या आत अडकल्यामुळे त्यांना हात चोळत बसावे लागेल. पण मोदींचे अनुयायी हात चोळत बसणारे अहिंसक वृत्तीचे नसल्याने, अडवाणींना पक्षातून अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ लागतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा एकदा मध्यस्थीसाठी राजकारणात उतरावे लागेल. मग मोहन भागवतांच्या मध्यस्थीने मोदींची समजूत काढण्यात येईल. जर अडवाणी सरकार दीड-दोन वर्षांत पडले किंवा काही अंतर्गत बदल करावे लागले, तर मोदींनाच पंतप्रधान केले जाईल, असे आश्वासन मोदींना दिले जाईल. मोदी त्यांची मोर्चेबांधणी सुरू करतील. खुद्द भाजपमध्ये मोदी पंतप्रधान न झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला जाईल. नागपूरच्या संघ कार्यालयातही मोदी पंतप्रधान न झाल्याने खासगीत समाधान व्यक्त केले जाईल. विशेष म्हणजे, धक्काग्रस्त काँग्रेसही अडवाणींना मनापासून शुभेच्छा देईल. त्यामुळे मोदींच्या तंबूत अधिकच अस्वस्थता येईल. अडवाणी हे मोदींना अभिप्रेत असलेला ‘काँग्रेसमुक्त देश’ करणार नाहीत आणि ते सोनिया-राहुल यांच्याशी जुळवून घेतील, या आशंकेने मोदी अडवाणींच्या विरोधात कारस्थाने करू लागतील. त्याच वेळेस ममता बंगालसाठी चाळीस हजार कोटींचे पॅकेज आणि रेल्वे व व्यापार मंत्रालय मागतील. जयललिता टेलिकॉम आणि उद्योग मंत्रालये मागतील. टेलिकॉम खाते मागून करुणानिधी-राजा प्रभृतींवर ‘सूड’ उगवणे, हा त्यामागे मुख हेतू असल्याची चर्चा मीडियात चालू होईल. करुणानिधी-जयललिता यांच्यातील तणाव आणि बिहारमध्ये लालू-नितीश यांच्यातील कलह, असे अंतर्गत संघर्ष उफाळू लागल्यामुळे काँग्रेसवाले ‘फुकटची’ करमणूक म्हणून त्याकडे पाहतील. आपल्या दारुण पराभवाने हादरलेले काँग्रेसवालेही आता स्वत:च्या बुरुजांवर हल्ले करू लागतील. काहींनी राहुलला, काहींनी डॉ. मनमोहन सिंग यांना, तर काहींनी सोनिया गांधींनाच पराभवासाठी जबाबदार धरल्यामुळे पक्षाच्या पायाखालची वाळू अधिकच घसरू लागेल. अडवाणी पंतप्रधान झाल्यास (म्हणजे मोदी न झाल्यास) शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्या सत्ताधारी आघाडीत सामील व्हायचे संकेत देईल. त्यामुळे महाराष्ट्र सरकार डळमळीत होईल आणि राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होऊ लागेल. महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी-सेना अशी आघाडी होण्याची चर्चा अडवाणींच्या आशीर्वादाने सुरू होईल.
डायरी क्रमांक 3 : भारतीय जनता पक्षाला एनडीएच्या माध्यमातून 273 जागा मिळविणे मुश्कील झाले, तर एक वेगळीच आघाडी निर्माण होईल. म्हणजे काँग्रेसप्रणीत यूपीए नाही आणि भाजपप्रणीत एनडीएही नाही, असा एक पर्याय निर्माण होईल. या आघाडीत डावे, मधले, अलीकडले, पलीकडले असे सगळे येतील. उदाहरणार्थ, जयललिता (30च्या आसपास), ममता (30च्या आसपास), मायावती (25च्या जवळ), मुलायम (20 किंवा तत्सम), डावे (30 वगैरे), लालूंची आरजेडी (10), बाकी नॅशनल कॉन्फरन्स, बिजू जनता दल, वायएसआर, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व जण मिळून (40) या सर्व पक्षांची काँग्रेसच्या मदतीने बांधलेली मोट, त्या 273 या ‘जादूई’ संख्येपर्यंत जाऊ शकतील. कुणी याला तिसरी आघाडी म्हणेल, कुणी चौथी, तर कुणी फक्त ‘बिगर काँग्रेस-बिगर भाजप आघाडी’ असे नाव देईल. पण या आघाडीत पंतप्रधानपदासाठी किमान पाच उमेदवार असतील. जयललिता, मुलायम सिंग, मायावती, शरद पवार, नवीन पटनाईक ते सर्व परस्परांचे प्रतिस्पर्धी असल्याने, त्यांच्या महत्त्वाकांक्षांचा घनघोर संघर्ष होऊन सरकार पडेल. (जसे देवेगौडांचे व इंद्रकुमार गुजराल यांचे 1997मध्ये पडले.) भाजप त्या आघाडीत सुरुंग लावू शकेल, काँग्रेस बेजबाबदारपणे वागून आघाडी क्षीण करू शकेल व त्या प्रादेशिक पक्षांमधले तणाव विकोपाला पोहोचतील. सर्व पक्ष सुरुवातीला म्हणजे किमान वर्षभर पुन्हा निवडणुका होऊ नयेत, म्हणून प्रयत्न करतील. कारण कुणालाच पुन्हा निवडणुकांत यश मिळेल, अशी खात्री देता येणार नाही. त्यांच्यापैकी कुणीही ‘आम आदमी पार्टी’प्रमाणे आटोपशीर व काटकसरीने निवडणूक लढवत नसल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला किमान 10 कोटी रुपयांची पुन्हा तजवीज करणे कठीण जाईल. परंतु लोकसभेत अशी अस्थिरता दोन-अडीच वर्षांपेक्षा जास्त राहू शकणार नाही. ज्याप्रमाणे 1996 ते 1998 या अडीच-तीन वर्षांच्या काळात तीन सरकारे आली, कोसळली (वाजपेयींचे 13 दिवसांचे, देवेगौडांचे 11 महिन्यांचे, गुजराल यांचे सहा महिन्यांचे) आणि पुन्हा निवडणुका आल्या. भाजपने एव्हाना राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली होती. त्या आघाडीला अटलबिहारी वाजपेयींचा उदारमतवादी चेहरा होता. त्यांना 182 जागा मिळून त्यांचे सरकार आले. म्हणजेच पुन्हा दोन-अडीच वर्षांत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यात काय होईल, हे त्या वर्षांच्या डायरीतच दिसेल.
डायरी क्रमांक 4 : या सर्व धामधुमीत ‘आम आदमी पार्टी’ काय व किती दिवे लावू शकेल? अरविंद केजरीवालांची आप भाजप आघाडीत, काँग्रेस आघाडीत वा तिस-या/चौथ्या आघाडीत सामील होणे शक्य नाही. म्हणजेच कोणत्याच सरकारला स्थिर होण्यासाठी जी सदस्यसंख्येची मदत लागेल, ती त्यांच्याकडून मिळणे शक्य नाही. खुद्द ‘आप’ला किती जागा मिळतील? त्यांची अपेक्षा आहे की ते भारतातील सर्व शहरे पादाक्रांत करतील. त्यांच्या या हिशेबाने त्यांना 75 जागा मिळायला हव्यात. पण त्यांना 35 वा 40 जागा मिळाल्या तरी ते लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष वा तिसरा सर्वात मोठा पक्ष (भाजप व काँग्रेसनंतर) होतील. पण त्यांची हवा दिल्लीच्या बाहेर फार गेली नाही वा गेली तरी त्या हवेचे जागांमध्ये रूपांतर झाले नाही, तर काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना ‘आप’ हे अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल. म्हणजे, ‘आधी उल्हास, त्यात फाल्गुन मास’ या म्हणीसारखी स्थिती होईल. कारण ‘आप’ दोन्ही पक्षांची मते खाईल आणि जागा जिंकल्या नाहीत तरी निवडणूक निकाल व लोकसभेतील संसदीय अंकगणित विस्कटून टाकू शकेल.
डायरी क्रमांक 5 : मोदींना 180हून अधिक जागा मिळाल्या नाहीत आणि अडवाणींनाही प्रादेशिक पक्षांची मोट बांधता आली नाही आणि काँग्रेसच्या मदतीने तिसरी आघाडीही निर्माण झाली नाही, तर कोण थोड्याफार प्रमाणात स्थैर्य देऊ शकेल? त्या वेळेस अनपेक्षितपणे व आकस्मिकपणे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मैदानात उतरतील. राष्ट्रपतिपदाचा राजीनामा देऊन पंतप्रधानपदाची वस्त्रे धारण करण्यासाठी सिद्ध होतील. मुखर्जींना ममता बॅनर्जी बंगाली म्हणून, तर मुलायम पर्याय म्हणून, शिवसेनासुद्धा मग मोदी नकोत म्हणून आणि डावे ‘सेक्युलर पर्याय’ म्हणून पाठिंबा देऊ शकतील. अशा रीतीने राष्ट्रपती आपल्या पदाचा त्याग करून पंतप्रधान होऊ शकतील का? राज्यघटनातज्ज्ञ म्हणतात, की ते अशक्य नाही! मुखर्जींचे बहुतेक राजकीय जीवन काँग्रेसमध्ये गेले असल्याने काँग्रेस त्यांना समर्थन देईल; पण तीच त्यांची डोकेदुखीही ठरेल! ही अर्थातच अखेरची शक्यता असेल!